Nagarjuna Personal Life & Net Worth, Car Collection: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सुपरस्टार नागार्जुन २९ ऑगस्ट रोजी आपला ६७ वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या दुसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या नागार्जुन यांनी तेलगू सिनेमासह बॉलीवूडमध्येही आपली वेगळी छाप पाडली आहे. वैयक्तिक आयुष्यात दोन लग्ने, अभिनेत्री तब्बूबरोबर १० वर्षांचे बहुचर्चित अफेअर आणि हैदराबादमधील ४५ कोटींचा आलिशान बंगला यामुळे नागार्जुन नेहमीच चर्चेत राहतात. संपत्तीच्या बाबतीत नागार्जुन यांनी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि अक्षय कुमार यांनाही मागे टाकलं आहे.

नागार्जुन यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५९ रोजी चेन्नईत झाला. त्यांचे वडील अक्किनेनी नागेश्वर राव हे तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नागार्जुन यांनीही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि तेलुगू सिनेमाचे सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले.

नागार्जुन यांच्या करिअरची सुरुवात व चित्रपट

नागार्जुन २ वर्षांचे असताना ‘वेलुगू नीडालू’ (१९६१) या चित्रपटात झळकले होते. नंतर ८ व्या वर्षी त्यांनी ‘सुदिगुंडालू’ या चित्रपटात काम केलं होतं. नागार्जुन यांनी अण्णा युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला होता, पण शिक्षण मध्येच सोडून ते अभिनय क्षेत्रात आले. त्यांनी १९८६ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून अभिनयात पदार्पण केले. हिरो म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘विक्रम’ होता, तो सुपरहिट ठरला. मग १९९० च्या ‘शिवा’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि ‘खुदा गवाह’, ‘द्रोही’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘अंगारे’, ‘मिस्टर बेचारा’, ‘एलओसी कारगिल’ आणि ‘जख्म’ सारखे चित्रपट केले.

नागार्जुन यांचे दोन विवाह

नागार्जुन यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच लग्न करून संसार थाटला होता. त्यांचं पहिलं लग्न १९८४ मध्ये प्रसिद्ध अभिनेते व्यंकटेश यांची बहीण लक्ष्मी हिच्याशी झालं होतं. मात्र, १९९० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नागार्जुन आणि लक्ष्मी यांचा मुलगा नागा चैतन्य होय. घटस्फोटानंतर नागार्जुन यांनी १९९२ मध्ये अभिनेत्री अमला अक्किनेनीशी दुसरं लग्न केलं. अमला आणि नागार्जुन यांना अखिल अक्किनेनी हा मुलगा आहे. नागार्जुन यांची दोन्ही मुलं अभिनेते आहेत.

nagarjuna-birthday-net-worth-tabu-affair-lifestyle(1)
नागार्जुन व त्याची दुसरी पत्नी अमाला/ नागार्जुन व तब्बू (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

विवाहित असूनही तब्बूबरोबर १० वर्षे अफेअर

बॉलीवूड अभिनेत्री तब्बूबरोबर नागार्जुन यांनी १९९६ मधील ‘निन्ने पेल्लाडाटा’ आणि १९९८ मधील ‘आविडा मा आविडे’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. या दरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. त्यांचे हे अफेअर १० वर्षे चालले. पण, जेव्हा तब्बूला जाणवलं की नागार्जुन पत्नी अमला हिला घटस्फोट देणार नाहीत आणि तिच्याशी लग्न करणार नाहीत, तेव्हा ते वेगळे झाले. दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. लवकरच ते एकत्र एका सिनेमात झळकणार आहेत.

४५ कोटींचे घर, लक्झरी कार कलेक्शन

नागार्जुन अत्यंत आलिशान आयुष्य जगतात. ते आपल्या कुटुंबासह हैदराबादच्या पॉश परिसर असलेल्या जुबली हिल्स येथील आलिशान घरात राहतात. ४००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या घराची किंमत ४५ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरिज, ऑडी ए7, पोर्श केयेन, बीएमडब्ल्यू एम6 आणि डॅटसन 240Z यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

नागार्जुन यांची संपत्ती

‘मनी कंट्रोल’च्या रिपोर्टनुसार, नागार्जुन यांची एकूण संपत्ती ३,५७२ कोटी रुपये आहे. श्रीमंतीच्या बाबतीत ते अक्षय कुमार आणि सलमान खान यांनाही मागे टाकतात. अक्षयची नेटवर्थ २७०० कोटी रुपये आणि सलमानची संपत्ती २९०० कोटी रुपये आहे. नागार्जुन एका चित्रपटासाठी २० ते ३० कोटी रुपये मानधन घेतात. तर एखाद्या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारण्यासाठी ते १० कोटी रुपये घेतात.