दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांच्या १०० व्या ‘किंग १००’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात नागार्जुन यांची एक्स गर्लफ्रेंड, अभिनेत्री तब्बूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी तब्बूच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा पहिला लूक रिलीज केला. या चित्रपटात ती ‘महंती झाशी राणी’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘किंग १००’ च्या निमित्ताने नागार्जुन आणि तब्बू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत.
आता त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक असले तरी एकेकाळी हे दोघे आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले होते. दोघेही १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तरीही त्यांनी लव्ह स्टोरी अपूर्णच राहिली. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार नागार्जुन व तब्बू यांची पहिली भेट १९९६ साली ‘निन्ने पेल्लाडाटा’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटानंतरच त्यांच्यात जवळीक वाढू लागली.
तब्बू व नागार्जुन यांचे चित्रपट
नागार्जुन आणि तब्बूने पुढे १९९८ मध्ये ‘आविदा मा आविदे’ या चित्रपटात एकत्र काम केलं. दोघांचं नातं बहरलं आणि त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगू लागल्या. दोघे १० वर्षे नात्यात होते, असं म्हटलं जातं. पण दोघांनीही याबद्दल जाहीरपणे बोलणं टाळलं. नागार्जुन विवाहित असूनही तब्बूबरोबर रिलेशनशिपमध्ये होते.
नागार्जुन यांचं पहिलं लग्न लक्ष्मी दग्गुबाती यांच्याशी झालं होतं. मात्र, काही वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्य हा त्यांचा मुलगा आहे. यानंतर नागार्जुन यांनी १९९२ मध्ये अभिनेत्री अमला अक्किनेनीशी लग्न केलं. रिपोर्ट्सनुसार, तब्बू आणि नागार्जुन यांच्यातील जवळीक वाढली तेव्हाही नागार्जुन विवाहित होते. तब्बूला हे नातं पुढे न्यायचं होतं, पण नागार्जुन पत्नीला सोडायला तयार नव्हते, त्यामुळे हे नातं संपलं असं म्हटलं जातं.
नागार्जुन तब्बूबद्दल काय म्हणाले होते?
नागार्जुन आणि तब्बू यांच्या नात्याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले, पण दोघांनी एकमेकांना फक्त मित्र म्हटलं. २०१७ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन यांनी तब्बूला आपली खूप चांगली मैत्रीण म्हटलं होतं. जेव्हा जेव्हा तब्बूचा उल्लेख होतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं, असं ते म्हणाले होते. तर दुसरीकडे, तब्बूनेही करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नागार्जुन यांना आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक म्हटलं होतं.
नागार्जुन यांची पत्नी अमला अक्किनेनी आपली चांगली मैत्रीण असल्याचं तब्बूने एकदा म्हटलं होतं. तर तब्बू हैदराबादला आल्यावर आपल्या घरीच थांबत असल्याचं अमलाने म्हटलं होतं. पतीवर पूर्ण विश्वास असून अशा गोष्टींकडे लक्ष देत नसल्याचंही अमला म्हणाली होती.
