scorecardresearch

नागराज मंजुळे पोलिसाच्या भूमिकेत

दिग्दर्शक, निर्माते, कवी, लेखक अशा अनेक क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करणारे नागराज मंजुळे अभिनयाच्या बाबतीतही आघाडीवर आहेत.

नागराज मंजुळे पोलिसाच्या भूमिकेत
नागराज मंजुळे पोलिसाच्या भूमिकेत

दिग्दर्शक, निर्माते, कवी, लेखक अशा अनेक क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करणारे नागराज मंजुळे अभिनयाच्या बाबतीतही आघाडीवर आहेत. ‘नाळ’ चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच त्यांनी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा नागराज मंजुळे स्वत:चीच निर्मिती असलेल्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नागराज या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या भूमिकेबद्दल सांगताना नागराज मंजुळे म्हणतात, ‘‘अभिनयाची आवड मला आधीपासूनच होती, पण छोटेखानी भूमिकेतून ती आवड जपत होतो. ‘नाळ’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा चांगली मोठय़ा लांबीची भूमिका करावी असे वाटत होते आणि या चित्रपटातील भूमिका वाटय़ाला आली. खरं तर ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटात सयाजी शिंदे साकारत असलेली डाकूची भूमिका मी करावी असा प्रस्ताव आला होता. मात्र, या भूमिकेसाठी सयाजी शिंदेच योग्य ठरतील असे मलाही वाटले आणि त्यांनी या चित्रपटात डाकूची भूमिका साकारली आणि मी रसिक प्रेक्षकांना पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे,’’ असा किस्सा मंजुळे यांनी सांगितला.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आजवर मराठी, हिंदीसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात पुन्हा एकदा ते वेगळय़ा भूमिकेत दिसणार आहेत. सयाजी शिंदे हे उत्तम नट तर आहेतच; पण त्याहूनही उत्तम ते व्यक्ती म्हणून आहेत, अशा शब्दांत मंजुळे यांनी सयाजी शिंदेंचे कौतुक केले. इतकी र्वष या क्षेत्रात अनेक चित्रपटांतून काम करत असूनही सयाजी यांना किंचितही अहंकार नसल्याचेही मंजुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हरहुन्नरी अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेता म्हणून नागराज मंजुळे आणि ‘सैराट’ फेम आकाश ठोसर या तिघांचं एकत्रित काम ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाचे कथानक पोलीस आणि डाकू यांच्याभोवती फिरताना दिसते. हेमंत जंगल अवताडे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्यासह अनेक चांगल्या कलाकारांची फौज आहे. नव्या वर्षांत प्रदर्शित होणारा हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेतून पाहता येणार आहे. याशिवाय, नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ या चित्रपटाचा पुढचा भाग ‘नाळ-२’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चैत्याची पुढची गोष्ट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 01:52 IST

संबंधित बातम्या