दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती’च्या निमित्ताने पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. मुंबईत हजारोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. एक ऑक्टोबर रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार असून, पोस्टरमधून त्याच्या लुकची प्रभावी झलकही समोर आली आहे.

संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत वरुणा मदनलाल राणा निर्मित या चित्रपटात नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय आणि ज्वलंत जीवनप्रवासाचे वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. वरुणा राणा लिखित व दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे यांच्या संवादांनी सजलेल्या या चित्रपटातून अन्याय आणि शोषणाविरुद्ध नामदेव ढसाळ यांनी उभारलेला लढा, त्यांच्या लेखणीतून पेटलेली क्रांती आणि समाजमनाला हादरवून टाकणारे विचार यांचा ठसा उमटणार आहे. संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. गीतकार इर्शाद कामील, गुरू ठाकूर यांनी गाणी लिहिली आहेत. ललित प्रभाकरचे नामदेव ढसाळांच्या रूपात रूपांतर प्रख्यात रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी केले आहॆ.

यावेळी दिग्दर्शिका वरुणा राणा म्हणाल्या, नामदेव ढसाळ हे केवळ व्यक्तिमत्त्व नव्हे, तर एक प्रक्षोभक विचार आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या कवितेतील विद्रोह आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारी त्यांची भूमिका पडद्यावर मांडणे हे मोठे आव्हान आहे. हा चित्रपट केवळ एका कवीची कथा नसून, तो एका चळवळीचा, एका विचारप्रवाहाचा आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा दस्तऐवज आहे. ‘ढसाळ’च्या माध्यमातून आम्ही त्यांच्या विचारांची ज्वाला आजच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत.

ललित प्रभाकर म्हणाला, ही भूमिका मिळाल्यावर सर्वात मोठं आव्हान होतं, नामदेव ढसाळांसारखं दिसणं. त्यासाठी दिग्दर्शिका वरुणा राणा आणि रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी अथक प्रयत्न केले. पहिल्या लुक ट्रायलला मल्लिका नामदेव ढसाळ यांनी “अगदी असाच दिसायचा नामदेव!” असं म्हटल्यावर आम्हाला मोठा दिलासा मिळाला. या भूमिकेमुळे त्यांच्या विचारांशी आणि संघर्षाशी अधिक जवळून परिचय झाला.

रंगभूषाकार श्रीकांत देसाई म्हणाले, ज्या चित्रपटाच्या संहिता मला भावतात त्या नक्की मला करायला आवडतात. वरुणा मॅडमना भेटलो त्यावेळी त्यांनी मला संहिता आणि दादांचे जुने फोेटो दाखवले. मुळात वरुणाजींनी ४-५ वर्षे ह्या विषयाचा अभ्यास केलाय. असे फार कमी दिग्दर्शक असतात. नामदेव ढसाळांना प्रत्यक्षात उतरवताना आव्हान तर होतेच पण ढसाळ म्हणजेच संघर्ष आणि हा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला नक्की आवडेल.

निर्माते संजय पांडेय

म्हणाले, पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पिडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पँथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या सर्व देश- विदेशातील चाहत्यांसाठी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हा चित्रपट ही पर्वणी असेल.