Nana Patekar Kargil War Experience : भारतीय सैनिकांचे शौर्य आणि त्यांची यशोगाथा अनेक चित्रपटांतून पडद्यावर मांडण्यात आली आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट निर्माण झाले, ज्यांनी सैनिकांचे आयुष्य आणि त्यांचा लढा पडद्यावर मांडला. काही कलाकारांना भारतीय जवानांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली; पण प्रत्यक्ष रणांगणावर देशासाठी सेवा करण्याचा मान फार थोड्यांना मिळाला आहे.
बॉलीवूडमध्ये असे एक अभिनेते आहेत, ज्यांना खरंच युद्धभूमीवर उतरून त्यांचे शौर्य दाखवण्याची संधी मिळाली होती. ते अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. मराठी आणि हिंदी सिनेविश्वामध्ये प्रभावी अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या नाना पाटेकर यांनी भारतीय सैन्यामध्ये जवान म्हणून कामगिरी बजावली आहे. अभिनय क्षेत्रात यशस्वी कारकीर्द सुरू असतानाही त्यांनी देशसेवेला प्राधान्य देत चित्रपटांचं काम काही काळासाठी बाजूला ठेवून देशसेवा केली होती.
नाना पाटेकर यांनी सांगितल्या कारगिल युद्धाच्या आठवणी
१९९९ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी झालेल्या कारगिल युद्धादरम्यान दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू होता. १९९९ मधील कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांनी भारतीय हद्दीतील काही उंच पर्वतीय भागांमध्ये घुसखोरी करून ताबा मिळवला होता. त्यांना परत हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने मोठी लष्करी मोहीम राबवली होती. याच काळात नाना पाटेकर यांनीही देशसेवेचा निर्णय घेतला होता. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती १६’ या कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर यांनी या युद्धाच्या आठवणी सांगितल्या होत्या.
अमिताभ बच्चन यांनी नाना पाटेकर यांची ओळख करून देताना ‘राइट लेफ्टनंट कर्नल ऑफ द इंडियन आर्मी’ अशी करून दिली. त्यावर अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, “आपला देश कठीण परिस्थितीत असताना काही काळासाठी अभिनय करणं थांबवलं होतं. त्यावेळी मला राष्ट्रीय कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळे मी देशसेवेला प्राधान्य देत सीमेवर गेलो होतो. त्यावेळी सैनिकांबरोबर राहून देशासाठी सेवा केली.”
आमच्या हातामध्ये कायम AK-47 बंदूक – नाना पाटेकर
पुढे ते म्हणाले, “मी मराठा लाइट इन्फंट्रीबरोबर होतो. तीन वर्षे मी तिथे सैनिकांबरोबर होतो. कारगिल युद्धाच्या वेळी जेव्हा मी सीमेवर जाणार होतो तेव्हा माझं वजन ७६ किलो होतं; पण मी परत आलो तेव्हा माझं वजन ५६ किलो झालं होतं. मी क्यूआरटी टीमचा एक भाग होतो. क्यूआरटी म्हणजे क्विक रिएक्शन टीम’ (त्वरित प्रतिसाद पथक). आमच्या हातामध्ये कायम AK-47 बंदूक असायची; पण तो एक खूपच वेगळा आणि अद्भुत असा अनुभव होता.”
नाना पाटेकर यांनी सिनेमांमध्ये साकारल्या प्रभावी अभिनय
नाना पाटेकर यांचा अभिनय आणि त्यांची इतर सामाजिक कामे यांमुळे ते प्रचंड लोकप्रिय आहेत. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ याचित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘वेलकम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या. त्याचबरोबर सिंहासन, देऊळ, नटसम्राट अशा मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी त्यांच्या अभिनयाचं वर्चस्व दाखवून दिलं आहे. त्यांच्या नटसम्राट या सिनेमातील गणपतराव बेलवलकर या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले नाना पाटेकर हे आता महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी सातत्याने मदतकार्य करीत आहेत.
