Nana Patekar KBC Viral Video: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी अधिक चर्चा होतेय. तसंच, त्यांनी आयुष्यभर सोसलेल्या कष्टांचाही उल्लेख सातत्याने केला जातोय. अत्यंत गरिबीतून स्थिरस्थावर झालेल्या नाना पाटेकरांना त्यांच्या परिस्थितीची जाण होती, हे त्यांचे काही जुणे व्हिडिओ पाहिलं की लक्षात येतं. कौन बनेगा करोडपतीमधील त्यांचा असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय, यामध्ये तुटपुंज्या रकमेवरही त्यांची कशी गुजराण होत होती, याविषयी त्यांनी सांगितलं आहे.
नाना पाटेकरांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून कमर्शिअल आर्ट्स केलं आहे. त्यानंतर ते एका जाहिरात कंपनीत नोकरीला होते, असं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. ते पुढे म्हणाले, “नाटक करायचं की नोकरी करायचा असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा मी नोकरी सोडली. थिएटर करत राहिलो. तेव्हा गरिबी होती. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे डीन होते हनुमंते म्हणून. त्यांनी आम्हाला काही सरकारी कामं दिली. त्यातून पैसे मिळत होते. झेब्रा क्रॉसिंग रंगवायचेही काम करायचो. त्याचे १५ रुपये मिळायचे. पण कधी कोणासमोर हात पसरले नाहीत. जे काम मिळत गेलं ते करत गेलो. “
चार-आणे माझा पॉकेटमनी
ते पुढे रोजच्या दिवसाच्या उदरनिर्वाहाविषयी म्हणाले, “चार-आणे माझा पॉकेटमनी होता. वर्तमानपत्रात चपाती गुंडाळून घेऊन जायचो. पंधरा पैशांची उसळ मिळायची. पाच किंवा दहा पैशांमध्ये दोन केळी मिळायची. २५ पैशांत आमचा उदरनिर्वाह व्हायचा. काही मुली असायच्या, त्यांना रिगलमध्ये वगैरे चित्रपट पाहायला जायचं असायचं. मग त्यांचा होमवर्क आम्ही करायचो. त्याबदल्यात ते आम्हाला भजी किंवा कॉफी द्यायचे.”
३५ रुपये पगार अन् एकवेळचं जेवण
नाना पाटेकर इयत्ता नववीत शिकत असताना त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे त्यांना तेव्हापासूनच नोकरी करावी लागली. त्याबाबत ते म्हणाले की, “मी नोकरी करू लागलो. शाळेतून दीड वाजता यायचो, काहीतरी खाऊन पुन्हा निघायचो. ८ किलोमीटर चालत जायचो आणि ८ किलोमीटर चालत यायचो. सिनेमाचे पोस्टर्स रंगवायचं काम होतं. महिन्याला ३५ रुपये मिळायचे आणि एकवेळचं जेवण मिळायचं. संध्याकाळी जेवताना मला वाटायचं की आई, बाबांनी खाललं असेल का? पण मलाच इतकी भूक लागायची की मी सगळं खाऊन टाकायचो.”
