नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वाने एक नटसम्राट गमावला मात्र लाखो लोकांनी त्याहूनही काहीतरी अधिक गमावलं, ते म्हणजे आशेचा किरण. नाना पाटेकर केवळ उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर हजारो शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ते आधारही बनले होते. गेल्या दशकभरात ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून नाना यांनी ७७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत केली, ५१ हजार आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत केली आणि जवळपास ५ हजार विधवांना विधवा कल्याण योजनेच्या माध्यमातून आधार दिला.
टीव्हीवरील बातमीने बदलला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार याची सुरुवात २०१५ च्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पीक नुकसान आणि शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडल्यानंतर झाली. त्या वर्षी महाराष्ट्रात ३,२२८ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. यापैकी १,१३० आत्महत्या एकट्या मराठवाड्यात झाल्या होत्या. त्यावेळी नाना एक आलिशान कार खरेदी करण्याच्या तयारीत होते. मात्र, एका रात्री टीव्हीवर त्यांनी पाहिलेल्या एका घटनेने त्यांच्या आयुष्याचा उद्देशच बदलून टाकला. “नवीन गाडी खरेदी करण्यासाठी मी १.५ कोटी रुपये जमा केले होते. संध्याकाळी मी ड्रिंक घेत टीव्ही पाहत होतो. टीव्हीवर आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची मुलाखत दाखवत होते. त्या मृत व्यक्तीच्या दुःखापेक्षा त्यांच्या कुटुंबाची उपासमार मला जाणवत होती. त्यांच्या डोळ्यांत ते स्पष्ट दिसत होतं,” असं नाना यांनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
वृत्तांमधील प्रतिमांनी आणि त्यांच्या वेदनेने नाना अस्वस्थ झाले. त्यावेळी ते यापेक्षा खूप वेगळं आणि सुख सोयी असलेलं जीवन जगत होते. अचानक त्यांना सवय झालेल्या सुखसोयी निरर्थक वाटू लागल्या. “त्या घटनेने मला घाबरवलं आणि मी विचार करू लागलो, मला या गाडीची गरजच काय? त्यानंतर मी १,००० शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, माझ्या मित्राने पैसे देण्यापूर्वी पती गमावलेल्या महिलांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्या भेटीने माझं आयुष्यच बदलून टाकलं,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
अशी झाली नामची सुरुवात
या अनुभवातून नाना पाटेकर यांनी अभिनेता मकरंद अनासपुरेंबरोबर मिळून ‘नाम फाउंडेशन’ची सुरुवात केली. मात्र, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोरील मोठ्या समस्या केवळ १५ हजार रुपये देऊन सुटणार नाहीत, हे नानांच्या लवकरच लक्षात आलं. काही कुटुंबांना मदत करण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा उपक्रम पुढे मोठ्या चळवळीत बदलला. अवघ्या दोन महिन्यांत फाउंडेशनने ६० कोटी रुपये जमा केले. “आणि मदत करणारे हे काही मोठे उद्योगपती नाहीत, तर मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोक आहेत,” असं नाना यांनी सांगितलं.
२०१६ मध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत नाना यांनी या मदतीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सांगितलं होतं. “आम्ही नाम फाउंडेशनसाठी एक खातं उघडलं आणि एका दिवसात जवळपास ८० लाख रुपये जमा झाले. बाधित लोकांना मदत करण्याची लोकांची इच्छा नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांना फक्त आपले पैसे योग्य ठिकाणी जातील की नाही, याची खात्री नसते. मात्र, आता आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत, याचा त्यांना विश्वास आहे,” असं ते म्हणाले होते.
नाना यांनी केवळ शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी उभारला नाही, तर ते त्यांचा आवाज आणि प्रतिनिधीही बनले. अनेक शेतकरी आत्महत्या करण्यास का प्रवृत्त झाले, यामागची परिस्थिती काय होती, याबद्दलही ते सातत्याने बोलत होते. २०१६ मध्ये ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले होते, “जेव्हा मी शेतकऱ्यांकडे पाहतो, तेव्हा मला ते दिसत नाहीत, तर त्यांच्यात मला मी स्वतःच दिसतो. ते इतकं टोकाचं पाऊल का उचलतात, हे मला समजतं. त्यांच्या कुटुंबासाठी औषधं, मुलांसाठी अन्न, जनावरांसाठी चारा घेण्याचीही त्यांची परिस्थिती नसते. त्यांची निराशा आणि त्यांना वाटणारी लाज मला दिसते. एका पुरुषासाठी ही भावना अत्यंत वेदनादायक असते. त्याला वाटतं की आता काहीच उरलेलं नाही. तो स्वतःला असहाय्य समजू लागतो आणि त्याच वेळी त्याचा हात गळफासाकडे जातो.”
शेतकरी आत्महत्या आणि इतर संकटांकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या कल्याणाची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं. संजय घोडावत विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना नाना म्हणाले होते, “जेव्हा माणूस मृत्यूचं वास्तव स्वीकारतो, तेव्हा आयुष्य सुंदर होतं. शेतकरी आत्महत्या किंवा इतर संकटांकडे दुर्लक्ष करू नका. कठोर वास्तवाचा सामना करा. तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने उद्देशपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करता.” अभिनय क्षेत्रात काम करत असतानाही नाना पाटेकर ‘नाम फाउंडेशन’ आणि त्याच्या कार्याशी जोडलेले राहिले. यावर्षी मे महिन्यात नागपुरात झालेल्या जलक्रांती परिषदेत बोलताना त्यांनी या कामामुळे आनंदाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला, याबद्दल सांगितलं.
“नाम फाउंडेशनने मला दिलेला आनंद हा सिनेमातून मिळालेल्या सर्व पुरस्कार आणि पैशांपेक्षा मोठा आहे,” असं ते म्हणाले. ‘नाम फाउंडेशन’ने लष्कर आणि निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केल्यामुळेही ते चर्चेत राहिले. कलम ३७० हटवल्यानंतर नाना यांनी लष्कराबरोबर मिळून नियंत्रण रेषेजवळील दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक संधी सुधारण्याच्या उपक्रमांमध्येही सहभाग घेतला. नाना पाटेकर यांना अभिनयामुळे प्रसिद्धी, पुरस्कार आणि ओळख मिळाली. मात्र, सिनेमाच्या पलीकडे केलेल्या कामातून त्यांना त्याहूनही महत्त्वाची गोष्ट मिळाली आयुष्याला एक उद्देश मिळाल्याची भावना. त्यामुळे त्यांना केवळ अभिनेता म्हणून पाहणाऱ्या लाखो लोकांसाठी त्यांचं जाणं म्हणजे पडद्यावरचा एक परिचित चेहरा गमावणं एवढंच नाही. इतरांसाठी आपल्याला मिळालेल्या संधी आणि साधनांचा आधार बनवणाऱ्या एका व्यक्तीचा आधार गमावणं आहे.
