ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला. आता नाना या आरोपांवर काय बोलणार, त्यांची बाजू कशी मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. अशातच त्यांनी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा होते. या कार्यक्रमात नाना तनुश्रीबाबत काय बोलतील याकडेच सर्वांची नजर होती. पण गुरुवारी प्रसारित झालेल्या भागात नानांनी त्यावर भाष्य केलं नाही. सूत्रसंचालन करत असलेल्या मकरंद अनासपुरेनं मात्र अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दलचा प्रश्न आवर्जून विचारला. माधुरीवर नानांचं एकतर्फी प्रेम होतं याची कबुली त्यांनी याआधीही बऱ्याच मुलाखतींमध्ये दिली होती.
नितीन गडकरींना विविध राजकारण्यांविषयी आवडणारी आणि न आवडणारी गोष्ट विचारल्यानंतर मकरंद नानांकडे वळला. ‘माधुरी दीक्षित यांच्यासोबत तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?,’ असा फिरकीचा प्रश्न मकरंदनं विचारला. त्यावर नानांनीही किती उशिरा हा प्रश्न विचारलास असं उपरोधिकपणे म्हटलं. त्यासोबतच त्यांनी चतुराईने या प्रश्नाचं उत्तर टाळलं. ‘मला काय वाटतं त्याला काय अर्थ राहिला आहे. झालं की सगळं बोलून त्याच्याबद्दल. आता आपण यांचं ऐकुया,’ असं म्हणत नाना गडकरींकडे वळले.
आज होणार यांच्यांत चर्चा आणि बाहेर पडणार खमंग किस्से. पाहा #AssalPahuneIrsalNamume गुरू-शुक्र. रात्री 9.30 वा. फक्त #ColorsMarathi वर.@nanagpatekar @nitin_gadkari pic.twitter.com/gqMTQE6Dzl
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 5, 2018
नाना आणि माधुरी दीक्षित यांना ‘मोहरे’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘वजूद’ यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं. याआधी २०१३ मध्ये ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितवर माझं एकतर्फी प्रेम असल्याची कबुली दिली होती.