Nana Patekar Son Malhar Patekar Break Silence on Tanushree Dutta comments : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत ‘दृष्ट व्यक्तीचं निधन’ असं म्हटलं होतं. यावर नाना पाटेकर यांचा मुलगा सुपुत्र मल्हार पाटेकरने मौन सोडलं आहे. “ज्या केसबद्दल लोक अजूनही बोलत आहेत, ती न्यायव्यवस्थेने आधीच निकाली काढली,” अशी प्रतिक्रिया मल्हारने दिली. तसेच ‘खामोशी’ चित्रपटापासून ते काश्मीरमधील शाळा अन् शेतकऱ्यांच्या मदतीपर्यंत नानांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला.

बाबांना न्यायव्यवस्थेने दोषमुक्त केलं – मल्हार पाटेकर

‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना मल्हार म्हणाला, “कोणाचंही नाव न घेता मला हेच सांगायचंय की, लोक विनाकारण जी केस पुढे आणत आहेत ती आधीच संपली आहे. न्यायव्यवस्थेने त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं, केस संपली आहे. तरीही लोक त्याबद्दल बोलत आहेत. अशा लोकांना मी काहीच बोलणार नाही, जे सत्य आहे तेच राहील, देव त्यांचं भलं करो, एवढेच मला त्यांना म्हणायचंय.”

नाना पाटेकर कमी चित्रपट का करत होते? मल्हारने सांगितलं कारण

नाना पाटेकरांनी गेल्या दीड दशकात अभिनय करणं कमी केलं होतं, त्यामागचं कारण सांगत मल्हार म्हणाला, “त्यांना एकाच पद्धतीचे चित्रपट करायचे नव्हते कारण ते सारखं सारखं तेच करतायत असं वाटत होतं. त्यामुळे त्यांना स्वतःच्या कथांवर काम करायचं होते. एक अभिनेता म्हणून स्वतःमध्ये सुधारणा करणं आणि पुढे जाणं यावर त्यांचा विश्वास होता आणि तेच त्यांच्या डोक्यात होतें. मला आठवतं की मला म्हणाले होते की, ‘काम नेहमी एकसारखं नसले पाहिजे’.”

पुढे मल्हार म्हणाला, “त्यांनी ‘खामोशी’ चित्रपट केला, कारण भारदस्त डायलॉग्स नसतील तरीही नाना उत्तम काम करू शकतात हे त्यांना दाखवायचं होतं. अलीकडच्या काळात समाजसेवेतून त्यांना शांतता आणि आनंद मिळत होता. काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्यासाठी ते काम करत होते आणि शेतकऱ्यांसाठी ते झटत होते आणि आता तेच माझेही मुख्य कर्तव्य आहे.”

तनुश्री दत्ताचे आरोप

अभिनेत्री, मॉडेल आणि माजी मिस इंडिया युनिव्हर्स राहिलेल्या तनुश्री दत्ताने २००९ मधील ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळ आणि धमकावल्याचा आरोप केला होता. तिच्या या आरोमांमुळे भारतात ‘मीटू’ (MeToo) चळवळ सुरू झाली होती. मात्र, नाना पाटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. पाटेकर यांच्याविरुद्ध २०१८ मध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता आणि पुराव्यांअभावी २०१९ मध्ये हा खटला बंद करण्यात आला होता.

नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ‘दुष्ट व्यक्तीचं निधन’ असं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, पण ती तिच्या वक्तव्यावर ठाम होती.