देऊळ चित्रपट आणि त्यातला भाऊंचा शून्य मिनिटात येतो हा संवाद मीमकर्त्यांसाठी खपणीय असा. विकासाचं राजकारण करताना अध्यात्माची बैठक हवी असं सांगत गावातले तरुण आणि ज्येष्ठांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणारं भाऊंचं पात्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं. पत्नीबरोबर सागरगोटे खेळणारा नवरा, पक्षश्रेष्ठींपुढे शरण जाणारा नेता, गावाचं भलं व्हावं असा विचार करणारा राजकारणी अशी विविध रुपं नाना पाटेकरांनी भाऊच्या पात्रातून दाखवली होती. देऊळ चित्रपट प्रदर्शित होऊन आता दशकभराचा काळ लोटला पण त्यांचं पात्र आणि संवाद प्रेक्षकांना पाठ आहेत. नाना पाटेकरांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. देऊळ चित्रपटातले नानांची भूमिका यासंदर्भात अभिनेते, लेखक गिरीश कुलकर्णी यांनी आठवणी उलगडल्या. इसापनीती टॉक्सशी बोलताना गिरीश यांनी नानांबरोबरचा स्नेहबंध मांडला.
‘आपल्या पहिल्या चित्रपटात नाना असावेत असा अट्टाहास होता. वळूच्या वेळेस खूप प्रयत्न केले. पण तेव्हा काही ते बधले नाहीत. तेव्हा मीही ताठ्यात होतो. त्यावेळी ते म्हणाले तू संहिता ठेव. मी म्हणालो वाचून दाखवणार. असं ते होतं. नंतर मला चूक उमगली’, असं गिरीश यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, ‘देऊळसाठी मात्र मला तेच हवे होते. अट्टाहास होता. सहा महिने तंगवलं. पण मी पण सिंदबादच्या थेरड्यासारखा कल्पनेच्या पाठंगुळीवर बसून राहिलो. नानाच पाहिजेत असा हट्ट होता. मग ते शक्य झालं. कवितेवर अतिशय मनापासून प्रेम असलेला माणूस होता. नानांचं व्यक्तिमत्व बहुमुखी होतं. त्यांचे सगळे सिनेमा पाहिले होते. त्यांची नाटकं पाहिली होती. चित्रकलेचं ज्ञान होतं. साहित्याबद्दल नितांत प्रेम होतं’.
‘राजकीयदृष्ट्या सोयीस्कर नसलेलं सत्य ते समाजात उघडपणे बोलू शकत होते. असं धाडस असलेला कलाकार होता. अशी माणसं फारच कमी राहिली आहेत. त्यांचे काही हितसंबंध नव्हते. थेटपणाने सत्तेत किंवा कसंही- काहीही नव्हतं. त्यामुळे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये न्यायाला दिरंगाई होते. कुचराई होते. अशावेळेस सत्याकडे, अन्यायाकडे अतिशय नेमकेपणाने लक्ष वेधणारं काम त्यांनी केलं. नाम सारखं काम त्यांनी उभं केलं. त्यांचं लक्ष गेलं आणि चित्र बदललं’, असं गिरीश म्हणाले.
