कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे विदर्भातील ६ जिल्ह्यांत ३१ जणांचे मृत्यू झाल्याचे गेल्याच महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील तपासणीत पुढे आले. हे प्रकरण राज्यभरात प्रचंड गाजले. यावरून राज्यातील काही मंत्र्यांनी त्यांची मतेदेखील मांडली. त्यानंतर आता अभिनेते नाना पाटेकर यांनी बोगस कीटकनाशकांची विक्री करणारे व्यापारी आधीच का पकडले जात नाहीत ? असा सवाल केला आहे.

वाचा : ‘दिल्लीतील प्रदूषणाने माझ्या आईचा जीव घेतला’

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ‘नाम फाऊंडेशन’द्वारे मदत करतात. शेतकऱ्यांच्या व्यथा समजणाऱ्या नानांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून बोगस कीटकनाशकांमुळे प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांसाठी ट्विट करत लिहिलं की, ‘अनधिकृत बोगस कीटकनाशकांची विक्री करणारे व्यापारी आधीच का पकडले जात नाहीत ? आता परवाने रद्द करून गेलेले जीव परत येणार आहेत का ? यांच्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे.’

वाचा : ‘लूजिंग माय रिलिजन’च्या ट्विटमुळे रणवीर ट्रोल

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सरकारच्या आदेशानंतरही बंदी असलेले कीटकनाशक विकणारे विक्रेते आणि कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर दया माया दाखवू नका, असे कठोर आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.