Nana Patekar on Sunetra Pawar: अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ ला विमान अपघातात निधन झाले. बारामतीत हा विमान अपघात झाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळत होता. २३ फेब्रुवारीला शोकसभा आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील नेते, उद्योगपती तसेच कलाकारांनी हजेरी लावली होती.

अभिनेते नाना पाटेकर या शोकसभेत भावूक झाले होते. एका मिनिटात त्यांनी त्यांचे भाषण संपवले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नाना पाटेकर यांनी भेट घेतली. त्यानंतर एका मुलाखतीत नाना पाटेकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

“सुनेत्रा पवार ज्या दु:खातून…”

एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “सुनेत्रा पवार ज्या दु:खातून जात आहेत, त्या दु:खाची आपण कोणीही कल्पना करू शकत नाही. आपल्यालाही दु:ख झाले आहे, पण त्यांचे दु:ख मोठे आहे, डोंगराएवढे आहे. ते दु:ख त्यांनाच सहन करावे लागेल. याबरोबरच त्यांना आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या असणार आहेत त्या सांभाळाव्या लागतील; पण यासाठी वेळ लागेल.”

अपघाताच्या तपासासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले, “मला सर्वकाही माहीत आहे असे तुम्हाला वाटते, त्यामुळेच तुम्ही मला असे प्रश्न विचारत आहात. पण, मी एक सामान्य माणूस आहे. ब्लॅक बॉक्स मिळाला आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, त्यातून सत्य समोर येईल.”

अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीबद्दल नाना पाटेकर म्हणाले, “जेव्हा दादा १९-२० वर्षांचे होते, तेव्हापासून ते माझे मित्र होते. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम सुरू केले, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. एखादा माणूस मोठा झाला की अनेकजण म्हणतात की आम्ही त्यांना ओळखत होतो, पण आता ते आपल्यात नाहीत, त्यामुळे अशा गोष्टी बोलण्यात अर्थ नाही. पण, त्यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली होती आणि ते या पदापर्यंत पोहोचले होते, त्यांचा तो प्रवास विलक्षण होता. मला त्यांची आठवण येईल, ते मला माझ्या लहान भावाप्रमाणे होते.”

दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना नानांनी तो त्यांचा निर्णय आहे असे म्हणत विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. ‘मला निर्णय घेता आला असता तर मी सांगितले असते, पण ते माझ्या हातात नाही’, असे नाना पाटेकर म्हणाले होते.

याआधी नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार पाटेकरने अजित पवार आणि नाना पाटेकर यांचे काही फोटो शेअर केले होते. अजित पवार यांनी नाना पाटेकर यांच्या फार्महाऊसला भेट दिली, तेव्हाचे हे फोटो होते.