Nandesh Umap On Heart Attack and Voice Recovery: नंदेश उमप हे लोकगीतांसाठी ओळखले जातात. पोवाडा, गवळण, गोंधळ अशा अनेक लोकगीतांमधून नंदेश उमप हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

आता नंदेश उमप त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतीच अल्ट्रा मराठी बझला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचा संघर्षकाळ सांगितला. या मुलाखतीत त्यांना विचारले की तुमच्या लोकगीतांमधून तुम्ही लोकांना प्रेरणा देता, त्यांना प्रोत्साहन देता; पण जेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष सुरू होता तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या कलेने तुमची कशी साथ दिली? यावर नंदेश उमप म्हणाले, “कलेने तर साथ दिली, पण त्याबरोबरच माझ्या आई-बाबांची पुण्याई होती आणि माझ्या रसिकांचे प्रेम होते, त्यांनी मला खूप समजून घेतले.”

” काही लोकांना माहीत होतं पण ते उघडपणे बोलत नव्हते. काही ठिकाणी कार्यक्रम चालू होते, काही ठिकाणी बंद होते. लोक अफवा पसरवतात की हे जास्त पैसे घेतात किंवा तो फ्री नाहीये; आपल्याला खाली खेचण्यासाठी बरीचशी लोकं काम करत असतात.”

“…तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं होतं.”

“२०१९-२० पासून जवळजवळ चार-पाच धक्के मला आतापर्यंत बसले. पत्नी सरिताची २०२२ पर्यंत खूप मोठी दोन ऑपरेशन झाली. २०२४ ला आईचे निधन झाले, त्यानंतर मला हृदयविकाराचा झटका आला होता. हे सगळं चालू असताना माझ्या कलेने मला त्यातून तारलं.”

पुढे ते म्हणाले, “गाणं हा माझा श्वास आहे, माझं गाणं कोणी बंद करू शकत नाही; कारण जेव्हा हृदयावर शस्त्रक्रिया झाली, तेव्हा दोन महिने माझा आवाज बंद होता, कारण आठवडाभर नळी टाकली होती. त्यानंतर जेव्हा ती नळी काढली तेव्हा तोंडातून आवाज निघत नव्हता, तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं होतं.”

“आता पुढे काय होईल असा विचार माझ्या मनात आला होता. पुढे गाईन की नाही माहीत नव्हतं. पण, मी एक ठरवलं होतं की मला जिवंत राहायचं आहे, खूप काम करायचं आहे. तसंच हेही ठरवलं होतं की मी पुन्हा एकदा गाणार आहे, माझे टाके सुकण्याची मी वाट पाहत होतो. दीड महिन्याने टाके सुकले, तोपर्यंत मी प्राणायम वगैरे करत होतो. टाके काढल्यानंतर जेव्हा मी दवाखान्यातून घरी आलो तेव्हा मी पहिल्यांदा तानपुरा सुरू केला. मी खर्ज्य लावायला बसलो, पण माझा खर्ज्य लागेना; तर तिथे मला थोडं निराश वाटलं पण मी प्रयत्न करत राहिलो.

पुढे ते म्हणाले, “मी तीन महिन्यांनी काळी पाच (गाण्यातील स्वराचा प्रकार)च्या सुरात पाच गाणी रेकॉर्ड केली. तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले होते. मी दीड-दोन महिने रियाज केला. माझा आवाज परत आला. मी पुन्हा एकदा उभा राहिलो. गाण्याने आणि कलेने मला ताकद दिली. महाराष्ट्राच्या कलेमध्ये खूप ताकद आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं”, असे म्हणत नंदेश उमप यांनी त्यांचा कठीण काळ सांगितला.