Narayan Rane Praise Marathi Actor For His Mimicry : मराठी नाटक, मालिका, सिनेमे तसेच रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजे दिगंबर नाईक. आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अनेक विनोदी कार्यक्रमांमधून त्यांनी प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. तसेच त्यांनी काही व्यक्तींच्या मिमिक्रीसुद्धा केल्या आहेत. ज्यामुळे त्यांचे खूप कौतुक झाले.

अशातच एका पुरस्कार सोहळ्यात दिगंबर नाईक यांनी नारायण राणे यांची मिमिक्री केली होती. ही मिमिक्री केल्यानंतर नारायण राणे यांनी दिगंबर नाईक यांचे कौतुक केले होते. नुकत्याच एका मुलाखतीत स्वत: दिगंबर यांनीच ही आठवण शेअर केली आहे.

“नारायण राणे यांची मिमिक्री केली अन्…”

राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात दिगंबर यांना अशी कुठली भूमिका आहे ज्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मला दिगंबर नाईक म्हणून ओळख मिळाली ती ‘घडलंय बिघडलंय’मुळे. तेव्हा झी गौरव सोहळ्यात मी नारायण राणेंची मिमिक्री केली होती. त्यामुळे मला आणखी लोकप्रियता मिळाली. माझ्या लोकप्रियतेत त्यांचा वाटा आहे. त्यामुळे मला लोक ओळखायला लागली.”

“नारायण राणेंनी मिमिक्री पाहून कौतुक केलं”

“एखाद्याने दम दिला असता. पण त्यांनी कौतुक केलं. आजही माझे त्यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. ते मला मानसपुत्र मानतात. तो माणूसच वेगळा आहे. काहीतरी गुण असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. बोलणाऱ्यांना काहीही बोलू दे; त्यामुळे काही फरक पडत नाही. नितेश आणि निलेश राणे यांच्याशीसुद्धा माझे चांगले संबंध आहेत. आजही ओळख आहे. पण ओळख आहे म्हणून रोज फोनवर वगैरे बोलतो असं नाही. पण कुठे कधी भेटलो तर चांगल्या गप्पा होतात” असंही ते पुढे म्हणाले.

यानंतर त्यांना एखाद्या राजकीय व्यक्तीची मिमिक्री करताना पोटात गोळा येतो, असं कधी झालं आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दिगंबर नाईक उत्तर देत म्हणाले, “माझ्या पोटात कधीच गोळा आला नाही किंवा मला भीतीही वाटली नाही. उलट मी बिनधास्तपणे मिमिक्री केली होती.”

दिगंबर नाईक यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी ‘फू बाई फू’ आणि ‘बिग बॉस मराठी’सारखे काही रिअॅलिटी शो केले आहेत. तसेच त्यांनी ‘गाव गाता गजाली’, ‘तिकळी’सारख्या मालिकांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांची ‘वस्त्रहरण’ या नाटकातली भूमिकाही विशेष लोकप्रिय आहे. आपल्या अभिनयासाठी ओळखले जाणारे दिगंबर नाईक त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही तितकेच लोकप्रिय आहेत.