या जीवघेण्या आजारामुळे नर्गिसने सोडला होता देश..

उपचारासाठी निवडला आयुर्वेदाचा नैसर्गिक मार्ग.

अभिनेत्री नर्गिस फाख्री गेल्या काही काळापासून भारतातून अचानक दिसेनाशी झाली होती. त्यामुळे ती भारत सोडून गेल्याच्या अनेक अफवांना उधाण आले होते. चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमांतून अर्ध्यावरुनच काढता पाय घेतल्यामुळे बी टाउनमध्ये अनेक चर्चाही रंगल्या होत्या. तथाकथित बॉयफ्रेंड उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यामुळे ती या ब्रेकअपमधून सावरण्यासाठी भारताबाहेर गेली आहे, असा तर्कही अनेकांनी लावला. पण, याबाबतचा सर्व खुलासा खुद्द नर्गिसनेच केल्यामुळे या सर्व अफवा होत्या हे आता स्पष्ट झाले आहे.
नर्गिसने ब्रेकअप मधून सावरण्यासाठी नाही तर, एका जीवघेण्या आजारावर उपचार करण्यासाठी परदेशी जाण्याचा मार्ग निवडला होता. ‘आर्सेनिक आणि लिड पॉइझनिंग’ झाल्यामुळे ती अमेरिकेला गेली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना ‘मी जेव्हा परत इथे आले, तेव्हा मला ही ‘आर्सेनिक आणि लिड पॉइझनिंग’ झाल्याचे कळले. हा आजार कशातूनही होऊ शकतो, अगदी पाण्यातून आणि खाण्यातूनही. डॉक्टरांना मला तपासून पाहिले, पण त्यानंतर ते सुद्धा धास्तावले. कारण, मला झालेला हा आजार थोड्या घातक पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे मी उपचारासाठी आयुर्वेदाचा नैसर्गिक मार्ग निवडला. सहा महिन्यांनंतर आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब केल्यानंतर मी जेव्हा पुन्हा या आजाराची चाचणी केली तेव्हा सारे काही ठीक होते. यामुळे माझे डॉक्टरही काहीसे थक्क झाले’, असे नर्गिस म्हणाली.
सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार नर्गिसच्या आईनेसुद्धा कर्करोगाशी लढा देण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा मार्ग अवलंबला होता. सहा महिन्यांतच त्यांना या रोगातून बऱ्याच प्रमाणात सावरता आले. दरम्यान या मुलाखतीमध्ये नर्गिस तिच्या रिलेशनशिप आणि लग्नाबद्दल उठणाऱ्या चर्चांविषयीसुद्धा बोलली. ‘मी लग्नाचा वगैरे काही विचार केलेला नाही. मला कोणाचीही गरज नाही, मी स्वतंत्र असून एक सुशिक्षित आणि कमावती महिला आहे. मी माझ्या आईची काळजी एकट्यानेच घेत आहे आणि सध्या मी मला हवे तसे वागू शकते ज्यासाठी मला इतरांच्या परवानगीची गरजही नाही ही महत्त्वाची बाब आहे’, असे स्पष्टीकरण नर्गिसने दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nargis fakhri left india for she had a life threatening illness