Naseeruddin Shah : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रोखठोक अंदाजामुळे ते कायमच चर्चेत असतात. आता मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र एक दिवस आधीच त्यांचं नाव पाहुण्यांच्या यादीतून काढण्यात आलं. याबाबत नसीरुद्दीन शाह यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि आयोजकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच सरकारवरही टीका केली आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

नसीरुद्दीन शाह यांनी या संपूर्ण प्रकरणावर इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहून आपले मत मांडलं आहे. या लेखात त्यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उत्सुक होते, कारण विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची त्यांना संधी मिळणार होती. उर्दू विभागाने १ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र ३१ जानेवारीच्या रात्री त्यांना कळवण्यात आले की आता त्यांना कार्यक्रमाला येण्याची गरज नाही. यामागे कोणतेही कारण देण्यात आले नाही, तसेच माफीही मागण्यात आली नाही किंवा दिलगिरीही व्यक्त करण्यात आली नाही. नसीरुद्दीन शाह यांनी आरोप केला की, नंतर विद्यापीठाने उपस्थितांना सांगितले की त्यांनी स्वतः येण्यास नकार दिला होता, जे पूर्णपणे खोटे होते. विद्यापीठाकडे खरं बोलण्याचं धाडस नाही असा टोलाही शाह यांनी लगावला.

मी त्यांना आव्हान देतो..

नसीरुद्दीन शाह म्हणाले, विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ते देशविरोधी वक्तव्य करतात, असे सांगितल्याने त्यांना कार्यक्रमाला येण्यास नकार देण्यात आला. यावर शाह म्हणाले, “जर त्या अधिकाऱ्यांना असे वाटत असेल, तर मी त्यांना आव्हान देतो की माझे एक तरी वक्तव्य दाखवावे, ज्यात मी देशाबद्दल वाईट बोललो आहे.” ते पुढे म्हणाले, “मी सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका करतो आणि पुढेही करत राहणार. जे मुद्दे मला आणि माझ्यासारख्या लोकांना त्रास देतात, त्यावर मी आवाज उठवत आलो आहे.”

तिरस्कार अखेर किती काळ चालणार?

हा तिरस्कार अखेर किती काळ चालणार? “हा तो देश नाही, जिथे मी मोठा झालो आणि ज्यावर प्रेम करायला मला शिकवण्यात आलं. आज सर्वत्र नजर ठेवली जाते, विचारांवर पहारा आहे आणि तिरस्काराचं वातावरण आहे. जो तिरस्कार पूर्वी दोन मिनिटांचा होता, तो आता २४ तासांचा झाली आहे,” असे त्यांनी म्हटले. जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘1984’ या कादंबरीचा उल्लेख करत त्यांनी आजची परिस्थिती त्यासारखीच असल्याचा सांगत आज एखाद्या मोठ्या नेत्याचं कौतुक न करणंही देशद्रोह मानलं जात नाही का? प्रश्न उपस्थित केला. कामाच्या आघाडीवर पाहिल्यास, नसीरुद्दीन शाह गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांनी एका शायरची भूमिका साकारली होती. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अस्सी’चा समावेश आहे.