‘भूमिका साकारणे म्हणजे माझ्यातील ‘मी’चा शोध’

म्हटले तर तो समांतर, प्रायोगिक चित्रपट आणि रंगभूमीवरील बादशहा; पण त्याने व्यावसायिक हिंदूी चित्रपटांतूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.

म्हटले तर तो समांतर, प्रायोगिक चित्रपट आणि रंगभूमीवरील बादशहा; पण त्याने व्यावसायिक हिंदूी चित्रपटांतूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. वयाच्या ६४ व्या वर्षांतही उत्साह कायम. अखेर तो आला, त्याने पाहिले, तो बोलला आणि त्याने जिंकले..
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी लिहिलेल्या ‘अॅण्ड देन वन डे’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’च्या प्रायोगिक थिएटरमध्ये ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास रसिकांनी केवळ नसीरुद्दीन शाह यांच्यासाठी गर्दी केली होती. पुस्तक प्रकाशनानंतर अनिल धारकर यांनी शहा यांच्याशी संवाद साधला.
अभिनय प्रशिक्षण शिबिरे अर्थात ‘अॅक्टिंग स्कूल’विषयी विचारलेल्या प्रश्नांवर शहा यांनी ‘येथे प्रवेश घेणाऱ्यांना ही मंडळी ‘टीचिंग नव्हे तर फुलिंग करतात’ असे परखड मत व्यक्त केले. २५ हजार रुपयांपासून पुढे कितीही शुल्क यासाठी आकारले जाते. एका आठवडय़ात किंवा पंधरा दिवसांत अभिनय शिका, असा सांगून भुलविले जाते. प्रवेश घेणारे पैसे मोजून येथे आलेले असतात; पण त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. ‘अॅक्टिंग स्कूल’ हा आता धंदा झालेला आहे, असेही शाह यांनी सुनावले.
अभिनय म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल करणे, असे म्हटले जाते. हा ‘मोल्ड द पर्सनॅलिटी’चा प्रकार दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, शम्मी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी केला; पण मी तसे करत नाही. एखादी भूमिका साकारताना ते पात्र किंवा ती भूमिका माझ्यातील ‘मी’चा शोध घेत असते, असेही शहा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
रंगभूमी किंवा चित्रपट, कोणतेही माध्यम असू दे, कलाकाराने आपली भूमिका साकारताना ती अधिक वास्तव कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘स्पर्श’ या चित्रपटात मी अंध व्यक्तीची भूमिका केली होती. माझी ही भूमिका वास्तव वाटावी यासाठी मी अंध शाळेत जाऊन तेथील विद्यार्थी, प्राचार्य यांना भेटलो, बोललो, त्यांच्या हालचालींचे निरीक्षण केले आणि या अभ्यासातून ती भूमिका साकारली, असेही शाह यांनी सांगितले.
‘वेनस्डे’ हा चित्रपट माझ्यासाठी आनंददायी असल्याचे सांगतानाच त्यांनी आपला पहिला हिंदी चित्रपट ‘निशांत’ तसेच  ‘मंथन’, ‘जुनून’ हे समांतर तसेच ‘डर्टी पिक्चर’ आणि अन्य व्यावसायिक चित्रपटांबद्दलही काही आठवणी सांगितल्या. कलाकाराचा ‘परफॉर्मन्स’, शाळेतील काही आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. कुटुंबातील वडील, भाऊ, मुलगी तसेच जीवनातील काही गोष्टी आपण या पुस्तकात प्रांजळपणे सांगितल्या असल्याचेही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Naseeruddin shah launches book by shyam benegal

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या