scorecardresearch

Premium

नाटय़रंग : करोनाची लोकनाटय़ीय त्रेधातिरपीट ‘ओक्के हाय एकदम!’

करोना आता लोकांच्या विस्मृतीत गेलाय. ती तीन वर्षे ज्या भयानक परिस्थितीत लोकांनी काढली ते पाहता इतक्या लवकर माणसं तो हाहाकार विसरतील असं वाटलं नव्हतं. पण काळच सगळ्या गोष्टींवर उतारा असतो म्हणतात त्याची प्रचीती इथेही आली.

Drama OK ahe ekdam
नाटय़रंग : करोनाची लोकनाटय़ीय त्रेधातिरपीट ‘ओक्के हाय एकदम!’

रवींद्र पाथरे

करोना आता लोकांच्या विस्मृतीत गेलाय. ती तीन वर्षे ज्या भयानक परिस्थितीत लोकांनी काढली ते पाहता इतक्या लवकर माणसं तो हाहाकार विसरतील असं वाटलं नव्हतं. पण काळच सगळ्या गोष्टींवर उतारा असतो म्हणतात त्याची प्रचीती इथेही आली. सावित्री मेधातुल यांनी यापूर्वी लोककलावंतांना घेऊन त्यांच्याच आयुष्याचं नाटक ‘संगीतबारी’ रंगमंचावर आणलं होतं. त्यांनी पुन्हा एकदा अशाच लोककलावंतांना घेऊन ‘ओक्के हाय एकदम!’ या नाटकात करोनाचा हाहाकार आणि त्यात त्यांची झालेली फरपट दाखवण्याचा घाट घातला आहे. करोनात माणसाचं जगणंच पणाला लागलेलं असताना मनोरंजन प्राधान्यक्रमात शेवटचंच असणार हे ओघानं आलंच. त्यातही लोककला ही तर आणखीनच उपेक्षित कला. तिचा नंबर शेवटचाच असणार. तर या करोनाकाळात चंद्रा नारायणगावकर हिचा तमाशा करोनाच्या चपेटय़ात आला आणि १८९ जणांचा मोठ्ठा बारदाना सांभाळायची पाळी तिच्यावर आली. सुरुवातीला हेही दिवस जातील या आशेवर गेले. पण करोनाचा कहर काही कमी होईना. दिवसेंदिवस त्यानं उग्रच रूप धारण केलं. त्यात सरकारची धरसोड धोरणं भर घालत होतीच.

swara bhaskar
“माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काम…”; स्वरा भास्करने शेअर केला प्रसूतीदरम्यानचा अनुभव; म्हणाली, “पिढ्यान् पिढ्या बायका..”
Parenthood, Child upbringing Parents responsibilities
पालकत्वः तुमची मुलं आहेत समाधानी?
Shani Gochar
शनिदेव दोन वर्ष मकरसह ‘या’ राशींच्या लोकांना देणार बक्कळ पैसा? साडेसातीपासून मुक्ती मिळून होऊ शकता लखपती
maharashtrachi hasya jatra fame samir choughule
“‘त्या’ स्किटमुळे धमक्यांचे फोन आले”, ‘हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंनी सांगितला अनुभव; म्हणाले, “लोकांच्या भावना…”

चंद्राबाई कितीही धीराची, खंबीर, कणखर बाई असली तरी शेवटी पैशाचं सोंग कुणालाच आणता येत नाही. हळूहळू फडातली बेकार झालेली माणसं आपापल्या गावाकडे परतू लागली. शेवटी १८९ मधली ८९ माणसं फडात उरली. तरी त्यांचं जेवणखान, बाकी गोष्टी सांभाळाव्या लागतातच. त्यासाठी सोननाणं, दागिने, टेम्पो वगैरे हळूहळू चंद्राबाईला विकावं लागलं. शेवटी अगदीच नाइलाज झाल्यावर चंद्राबाई महाराजांच्या दरबारी आपली हकिकत सांगायला पोहोचली. महाराजांनी तिचं म्हणणं ऐकलं. ते लोककलाकारांचं भीषण जगणं समजून घेण्यासाठी तिच्याबरोबर तमाशा फडात यायला राजी झाले. फडात आचाऱ्याचं काम त्यांनी पत्करलं. एवढय़ा कलावंतांना रोज जेवण घालणं किती मुश्कील आहे हे त्यांना कळून चुकलं.

चंद्राबाईने मधल्या काळात इतरांप्रमाणे ऑनलाइन कला सादर करण्याचा मार्गही चोखाळून पाहिला. पण त्यानं रसिकांचं समाधान होईना. शेवटी गावच्या सरपंचानं त्यांना तुमच्याकडे इतक्या मुली असताना तुम्हाला काय कमी आहे असं चंद्राबाईला बजावलं. तेव्हा ती खवळून उठली. महाराजांना तिनं आपली कथा-व्यथा सांगितली. पण यातून मार्ग कसा निघणार, हे कुणालाच सांगता येत नव्हतं. महाराजांची पोकळ आश्वासनं काही कामाची नव्हती. आजवर त्याचा अनुभव कलावंतांनी घेतलेला होताच. शेवटी महाराज कोणतंही आश्वासन न देता फडातून निघून जातात. आपला प्रेक्षक हाच खरा आपला मायबाप या निष्कर्षांवर चंद्राबाई येऊन पोहोचते. एव्हाना करोनाचा कहर कमी झालेला असतो. चंद्राबाई नव्या जिद्दीनं पुन्हा उभी राहते.. प्रेक्षकांच्या भरवशावर!

सावित्री मेधातुल यांनी करोनाचा कहर आणि त्यातली लोककलावंतांची फरपट, भयंकर जगणं संशोधित करून लेखक गणेश पंडित आणि सुधाकर पोटे यांच्याकरवी ते या लोकनाटय़ातून रंगमंचावर सादर केलं आहे. गणेश पंडित यांनीच या नाटकाचं दिग्दर्शनही केलं आहे. वगनाटय़ या फॉर्ममध्ये लोकांचे प्रश्न, समस्या रंजनाच्या पुडीतून मांडता येतात. त्यांची (जमलीच तर) उत्तरंही शोधता येतात. इथं तर लोककलावंतांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न नाटकात मांडलेला आहे.. अत्यंत पोटतिडकीनं! लोकनाटय़ाच्या फॉर्ममध्ये हसू आणि आसूच्या मिश्रणातून लोकरहाटी दाखवता येते. सावित्री मेधातुल यांनी या वगनाटय़ात हा प्रयत्न यशस्वीरीत्या हाताळला आहे. शासन, प्रशासन, त्यांची धोरणं, राजकारणी, त्यांची गणितं, त्यांचं राजकारण, व्यवस्था यांच्या भयावह खेळात सामान्य माणसांचं कसं भजं होतं हे हसत-खेळत ‘ओक्के हाय एकदम!’मध्ये नितळपणे दर्शवलेलं आहे. करोनासारख्या गंभीर समस्येवरचं हे नाटक; पण त्यातही विनोद, हशा, हसणं-बागडणं असं सगळं पेरत लेखक-दिग्दर्शकानं ते छान खेळवलं आहे.

मूळ मुद्दय़ावरून नाटक भरकटणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली आहे. गणेश पंडित हे अतिशय गंभीरपणे नाटक, सिनेमा या माध्यमांकडे पाहणारे दिग्दर्शक आहेत. त्यांनी एक वेगळा फॉर्म तितक्याच गांभीर्यानं पेलला आहे. त्यात मनोरंजनाचा तोलही सांभाळला जाईल हेही त्यांनी नीटसपणे पाहिलं आहे. मुळातले लोककलावंत आणि काही मुंबईचे कलाकार यांचा एकमेळ त्यांनी छान घातला आहे. सुमित पाटील यांनी तमाशातला रंगीत पडद्याचा सेट वास्तवदर्शी उभारला आहे. संगीतकार भालचंद्र पोटे, प्रकाश सानप आणि अजित फोंडके यांनी चंदन कांबळे व स्व. दत्ता महाडिक-पुणेकर यांच्या गीतांना न्याय दिला आहे. सीमा पोटे यांनी ती खणखणीतपणे सादर केली आहेत. अनिकेत जाधव (रंगभूषा), आकांक्षा कदम (वेशभूषा), विलास हुमणे आणि इमॅन्युअल बत्तीसे (प्रकाशयोजना) यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.

चंद्राबाईच्या भूमिकेत सावित्री मेधातुल यांनी तिचा ताठा, फडावरची हुकुमत, कलाकारांना सांभाळून घेतानाचा तोल, एवढा मोठा फड हाताळताना राखावयाचा संयम, कणखरपणा, जबाबदारी आणि माणुसकीचा गहिवर यांचं एक अतुल्य रसायन पेश केलं आहे. वैभव सातपुते यांनी महाराजांचं लवचीक व्यक्तिमत्त्व त्यांच्या सगळ्या लय, लकबींसह वठवलं आहे. भाषेवरची त्यांची हुकूमत तर लाजवाब. सीमा पोटे (शीतल) यांनी नृत्य आणि गाण्याची बाजू लावून धरलीय. सुधाकर पोटे यांचा प्रधानजी लोभस आहे. पंचू गायकवाड यांचा सफारी शाहीर यथातथ्य. विक्रम सोनवणे यांचा मॅनेजर मुसा लक्षवेधी. विनोद अवसरीकर, अभिजीत जाधव, भालचंद्र पोटे, चंद्रकांत बारशिंगे आणि प्रज्ञा पोटे यांनी आपल्या वाटय़ाच्या भूमिकांना न्याय दिलाय. एकुणात, हे वेगळ्या विषयावरचं आगळं वगनाटय़ प्रेक्षकांना खिळवून ठेवतं, हे नक्की. काली बिल्ली प्रॉडक्शन्स आणि भूमिका थिएटर्सची ही निर्मिती आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Natayrang corona folk drama okke hay ekdam ysh

First published on: 01-10-2023 at 04:01 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×