१९९० साली मनिरत्नम यांच्या ‘अंजली’ या चित्रपटात चार वर्षांच्या गोंडस मुलीने संपूर्ण भारताचे मन जिंकलं. ही मुलगी म्हणजे, बेबी शामली. तिने मानसिकदृष्ट्या विशेष मुलीची भूमिका अगदी सहजपणे साकारली होती. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वात लहान कलाकारांपैकी ती एक होती.
शामलीने केवळ दोन वर्षांची असताना अभिनयाची सुरुवात केली. ‘अंजली’मुळे तिला चांगलीच ओळख मिळाली. त्याआधी तिने मल्याळम चित्रपट ‘मलूट्टी’ (१९९०) मध्ये काम केले होते आणि त्यासाठी तिला केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. १९९० च्या दशकात ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय बालकलाकार बनली.
शामलीने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा चारही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम केले. ‘जगदेकवीरुडु अथिलोकसुंदरी’ (१९९०) या चित्रपटात तिने चिरंजीवी आणि तिची बहीण शालिनी यांच्याबरोबर काम केले. तसेच फाझिल यांच्या ‘हरिकृष्णन्स’ या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटात तिच्याबरोबर मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज मामूटी आणि मोहनलाल होते. कन्नड चित्रपटांमध्ये तिने विष्णुवर्धन आणि अंबरीश यांसारख्या कलाकारांबरोबर काम केले. ‘माथे हदितु कोगिले’ या चित्रपटासाठी तिला कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बाल अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
बालकलाकार म्हणून यश मिळवल्यानंतर पुढे नायिका म्हणून स्वतःला सिद्ध करणे अनेकांसाठी कठीण ठरते. शामलीच्या आयुष्यातही हे आव्हान आलं. अनेक वर्षे ती दक्षिणेतली सर्वाधिक लोकप्रिय बालकलाकार होती. पण नायिका म्हणून नवीन ओळख निर्माण करणे तिच्यासाठी आव्हानात्मक ठरलं.
२००९ साली तिने ‘ओये’ या तेलुगू चित्रपटातून मुख्य नायिका म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात तिच्याबरोबर सिद्धार्थ हा प्रमुख भूमिकेत होता. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा CineMAA हा पुरस्कार मिळाला. पण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही.
२०१० ते २०१५ या काळात शामलीने सिंगापूरला जाऊन शिक्षण आणि नोकरी करण्याचा मार्ग निवडला, यासाठी तिने अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या. नंतर २०१६ साली तिने ‘वीर शिवाजी’ या तमिळ चित्रपटातून पुन्हा इंडस्ट्रीत एन्ट्री केली. मात्र हा चित्रपटही फारसा चालला नाही. त्याचवर्षी तिने ‘वल्लीम थेटी पुल्लीम थेटी’ या मल्याळम चित्रपटात काम केले, पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही.
नंतर २०१८ मध्ये शामलीने व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये पदवी आणि लासाले कॉलेज ऑफ आर्ट्समधून येथून फिल्म स्टडीजमध्ये डिप्लोमा केला. यानंतर तिने पॅरिस कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये प्रशिक्षण घेतले. सिंगापूरमध्ये चायनीज इंक पेंटिंगचे शिक्षण घेतले आणि इटलीतील फ्लॉरेन्स येथे Accademia Riaci येथे ग्लास पेंटिंगचे विशेष प्रशिक्षण घेतले.
आज शामली तिच्या या कलांचं प्रदर्शन भरवते. २०२३ मध्ये तिने चेन्नईतील फोकस आर्ट गॅलरीमध्ये येथे ‘SHE’ नावाचे प्रदर्शन भरवले. तसेच वर्ल्ड आर्ट दुबई या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भाग घेतला. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे तेए तिच्या पेंटींग्स शेअर करत असते.
