नुकत्याच जाहीर झालेल्या ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘भोंगा’ या चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. शिवाजी लोटन पाटील यांनी ‘भोंगा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाजी यांचा हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. याआधी त्यांना धग या चित्रपटासाठी २०१२ साली सर्वोत्तम दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. असे असतानाही आता भोंगा या चित्रपटाला वितरक मिळत नसल्याची खंत शिवाजी यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना व्यक्त केली आहे.

‘राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने भोंगा हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. मात्र चित्रपट बनवणे हा एक भाग असतो तर तो प्रदर्शित करणे त्याहून अवघड काम असते. मी चित्रपट बनवला आहे. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मात्र आता तो प्रदर्शित करण्यासाठी मी अनेकांच्या भेटी घेत आहे. त्यांच्याशी चर्चा करत आहे. चित्रपट बनवल्याचा मला आनंद आहे. मात्र वितकरकांच्या आर्थिक गणितांमुळे तो लोकांपर्यंत पोहचवणं खूप कठीण काम आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटाकडे लोक फारच वेगळ्या नजरेने बघतात,’ असं मत शिवाजी लोटन पाटील यांनी व्यक्त केलं आहे. पाहा त्यांची संपूर्ण मुलाखत…

दरम्यान, ‘भोंगा’ या चित्रपटाने मे महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्रराज्य सरकारच्या ५६ व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराबरोबरच एकूण पाच पुरस्कार पटकावले होते. सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शिवाजी लोटन पाटील), सर्वोत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक (शिवाजी लोटन पाटील) आणि सर्वोत्कृष्ट पटकथा (शिवाजी लोटन पाटील) या पाच पुरस्कारांचा समावेश होता.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या चित्रपटाची कथा शिवाजी लोटन पाटील आणि निशांत ढापसे यांनी लिहिली आहे. अमोल कागणे आणि दिप्ती धोत्रे या दोघांनी या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय सिनेमामध्ये कपिल कांबळे, श्रीपाद जोशी यांचाही अभिनय पहायला मिळणार आहे.