यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नेहमीप्रमाणे राजधानी दिल्लीत न होता गुजरातमधील एकता नगर (केवडिया) इथे आयोजित केला जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते राहुल ढोलकिया यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. “पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर नेण्यास माझी हरकत नाही, पण त्यासाठी गुजरातच का?” असा सवाल त्यांनी एक्सवर केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू किंवा हैदराबादसारख्या ठिकाणांना हा सन्मान का दिला गेला नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

“दिल्लीतच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्यात यावे, याबद्दल मी अजिबात आग्रही नाहीये. तसं मला विशेष प्रेमही नाही, पण हा सोहळा गुजरातला हलवण्यावर मी प्रश्न उपस्थित करतोय. गुजरातच का?” असं ढोलकिया यांनी मंगळवारी सकाळी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं. “जेव्हा तुम्ही दुसऱ्या शहरात किंवा राज्यात पुरस्कार देण्याची परंपरा मोडत आहात, मग ज्या राज्यांनी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिलं आहे, त्यांना हा सन्मान का दिला जात नाही? जसं की महाराष्ट्र, केरळ किंवा तामिळनाडू. अगदी हैदराबादसारखे शहरही यासाठी योग्य राहिले असते,” असं ते पुढे म्हणाले.

Rahul Dholakia questions National Film Awards being moved out of Delhi
राहुल ढोलकिया यांची पोस्ट (सौजन्य – एक्स)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आहेत राहुल ढोलकिया

राहुल ढोलकिया हे स्वतः राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आहेत. २००२ च्या गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या २००७ मधील ‘परझानिया’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला त्यांचा २०१७ मधील ‘रईस’ चित्रपटही गुजरातच्या पार्श्वभूमीवर आधारित होता.

गुजराती चित्रपटसृष्टी हा भारतीय सिनेमाचा एक महत्त्वाचा भाग असली तरी त्याचे केंद्र अहमदाबाद शहरात आहे, केवडियामध्ये नाही. याच धर्तीवर मुंबई आणि पुणे या शहरांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय सिनेमात खूप मोठे योगदान दिले आहे. दक्षिणेत केरळ हे मल्याळम सिनेमाचे, चेन्नई हे तमिळ सिनेमाचे आणि हैदराबाद हे शहर तेलुगू सिनेमाचे प्रमुख केंद्र राहिले आहे.

७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बदल

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात हा सोहळा पहिल्यांदाच दिल्लीबाहेर आयोजित केला जात आहे. १९५४ मध्ये पहिले राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीतील विज्ञान भवनात प्रदान करण्यात आले होते, तेव्हापासून आतापर्यंत तिथेच दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन केलं जातं. आता एकता नगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या केवडियामध्ये भारताचे पहिले गृहमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ नावाच्या या ५९७ फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

केवडिया इथे २२ सप्टेंबर रोजी ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. हे पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जातील. या सोहळ्यात मल्याळम सुपरस्टार मामूटी- ‘भ्रमयुगम’ चित्रपटातील भूमिकेसाठी आणि बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यन -‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील भूमिकेसाठी संयुक्तपणे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा पुरस्कार स्वीकारतील.