ना टय़ रं ग : वर्तमानावर कलात्मक भाष्य

माणसाला जगण्यासाठी भाकरी गरजेची असली तरीही त्याचं आयुष्य सुंदर, उदात्त, उन्नत करण्याकरता फुलाचीही (कलेचीही!) तितकीच आवश्यकता असते.

‘अडलंय का?’

रवींद्र पाथरे

माणसाला जगण्यासाठी भाकरी गरजेची असली तरीही त्याचं आयुष्य सुंदर, उदात्त, उन्नत करण्याकरता फुलाचीही (कलेचीही!) तितकीच आवश्यकता असते. फूल न मिळाल्यानं त्याचं काही अडत नसलं तरी ते नसेल तर माणूस आणि पशुपक्ष्यांच्या आयुष्यात फारसा फरक उरत नाही. कला आणि कलावंत माणसाचं उन्नयन करीत असतात.. समृद्ध जगण्यासाठीचा ऑक्सिजन माणसाला पुरवीत असतात. हे त्रिकालाबाधित सत्य असताना कला आणि कलावंतांना दुय्यम लेखून त्यांचं अस्तित्व संपवायला आपण आज निघालो आहोत. अशानं आपलं आयुष्य शुष्क, कोरडं आणि संवेदनाहीन बनेल यात शंका नाही. त्यातून भावभावना हे जे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे, तेच नष्ट होईल. आजच्या व्हच्र्युअल जगात मटेरियलॅस्टिक अ‍ॅप्रोचमुळे माणसाचं यंत्रात रूपांतर झालेलं आहे. सर्वव्यापी हपापलेपण हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण. माणसातलं ‘माणूसपण’ विझू विझू होत चाललं आहे. पण ना त्याला याची जाणीव आहे, ना समाजधुरिण म्हणवणाऱ्यांना! या सगळ्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारं एक नितांतसुंदर नाटक नुकतंच पाहण्यात आलं.. ‘अडलंय का?’ ते केवळ कला आणि कलावंत यांवरच भाष्य करीत नाही, तर वर्तमानावरदेखील परखड कोरडे ओढतं. आज जगभर उजव्या विचारसरणीनं हैदोस घालायला सुरुवात केली आहे. हुकूमशहा हिटलरच्या कथित ‘राष्ट्रवादी’ विचारांशी साम्य दर्शविणाऱ्या नेत्यांकडे जगाचं नेतृत्व गेलेलं दिसतं आहे. भारतही यास अपवाद नाही. धार्मिक धुव्रीकरण, कथित राष्ट्रवादाचा उदोउदो, अल्पसंख्याकांचं दमन, जगण्याच्या मूलभूत प्रश्नांना भिडण्याऐवजी भावनिक मुद्दे उपस्थित करून, लोकांना धर्माध अफूची गोळी देऊन सतत गुंगीत ठेवण्याचं चाललेलं कारस्थान, दामटून खोटा प्रचार करत लोकांना (सं)भ्रमित करणं.. अशा विलक्षण प्रदूषित वातावरणात आपण जगतो आहोत. लोकांना कायम भ्रमित विश्वात (व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी) गुंतवून आपला कार्यभाग साधणारे सत्ताधारी हे आपलं आजचं भीषण वास्तव आहे. त्याकरता खोटा इतिहास उत्खनित/ प्रसारित केला जातो आहे. याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना खऱ्या/खोटय़ा ‘प्रकरणां’त गुंतवून त्यांना संपवण्याचं, त्यांचा आवाज बंद करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आज अत्यंत दुर्मीळ प्रजाती झालेल्या समाजातील जागल्यांच्या विरोधात लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना हास्यास्पद ठरवलं जात आहे. आणि आपण सारेच हताश व हतबल होऊन हे सगळं समोर घडताना पाहतो आहोत. नव्हे, या षडयंत्राचा नकळत एक भाग बनतो आहोत. 

या पार्श्वभूमीवर ‘नाटक कंपनी’ निर्मित ‘अडलंय का?’ हे नाटक डोळ्यांत झणझणीत अंजन घालून आपल्याला जागं करू पाहत आहे. ग्लानी आलेल्या समाजाला झडझडून जागं करण्याचं काम कलेतून हे नाटक करते. चार्ल्स लेविन्स्की या जर्मन लेखकाच्या ‘द ऑक्युपेशन’ नाटकाची ही भारतीय आवृत्ती. मॅक्समुल्लर भवन, पुणे आणि स्वीस कौन्स्युलेट जनरल, मुंबई यांच्या सहयोगाने ते मंचित झालं आहे. शौनक चांदोरकर यांनी त्याचं भाषांतर केलं आहे. तर पर्ण पेठे, अतुल पेठे आणि निपुण धर्माधिकारी यांनी त्याची रंगावृत्ती सिद्ध केली आहे. निपुण धर्माधिकारी यांनीच ते दिग्दर्शित केलं आहे. 

जर्मनीतलं एक शहर. तिथल्या एका कॉर्पोरेट फर्मला प्रस्तावित ‘डील’साठी फोन जातो. कंपनीतील तरुण कन्सल्टंट पॉला त्यानुसार बिझनेस मीटिंगकरता दिलेल्या पत्त्यावर हजर होते. तो पत्ता निघतो एका थिएटरचा. तिला याची कल्पना नसते. स्वाभाविकपणेच तिला आश्चर्य वाटतं. एका थिएटरमध्ये आणि बिझनेस मीटिंग? पण आलोच आहोत तर मीटिंग करणं भाग आहे. तिथं अल्ब्रेश्ट नावाची व्यक्ती विचित्र पद्धतीनं तिचं स्वागत करते. ज्या पद्धतीनं तिचं स्वागत होतं त्यावरून तिला काहीच अर्थबोध होत नाही. अल्ब्रेश्ट हे थिएटर आपल्याला विकत घ्यायचंय असं पॉलाला सांगतो. ती म्हणते, ‘हे थिएटर नगरपालिकेचं आहे. आम्ही फक्त सल्लागार फर्म आहोत.’ पॉलाच्या फर्मने थिएटरच्या अनुदानात २० टक्के कपातीचा सल्ला नगरपालिकेला दिलेला असतो. त्यामुळे अल्ब्रेश्ट संतप्त झालेला असतो. एका तऱ्हेनं थिएटर बंद पाडण्याचीच ही चाल आहे हे त्याच्या लक्षात येतं. म्हणूनच त्याने या फर्मला आपल्याला हे थिएटर विकत घेण्यात रस आहे असा प्रस्ताव पाठवलेला असतो. फर्मला थिएटर विकण्याचे अधिकार नाहीत हे त्यालाही माहीत असतं. पण फर्मच्या खांद्यावर बंदूक ठेवून नगरपालिका थिएटर बंद करू इच्छित असते. तेव्हा संबंधित फर्मलाच घोळात घेऊन थिएटर वाचवण्याचा अल्ब्रेश्टचा प्रयत्न असतो. तो हरतऱ्हेनं पॉलाला मनवायचा प्रयत्न करतो. परंतु ती बिलकूल बधत नाही. आपल्या निर्णयावर ठाम असते.

त्या दोघांतली बौद्धिक व मानसिक जुगलबंदी म्हणजे हे नाटक होय! अल्ब्रेश्टला पॉला विचारते, ‘तुम्हाला कशासाठी हे थिएटर विकत घ्यायचंय?’ तेव्हा तो म्हणतो, ‘वेश्यालयासाठी! त्यामुळे नगरपालिकेला त्यास अनुदान देण्याची गरज भासणार नाही; वर जीएसटीचं भरपूर उत्पन्नही मिळू शकेल.’ नगरपालिकेच्या कारभारावर आणि तिच्या धोरणांवर यापेक्षा मर्मभेदी टीका ती काय असू शकते? अशा अनेक मुद्दय़ांवर निरनिराळ्या क्लृप्त्या योजत अल्ब्रेश्ट पॉलाचं ब्रेन वॉशिंग करत राहतो. परंतु ती आपल्या निर्णयावरून किंचितही मागे हटत नाही. अल्ब्रेश्ट ‘नाटक’ करतो आहे, आपल्याला ‘खेळवतो’ आहे हे ध्यानी आल्यावर तर तिचा ठामपणा अधिकच पक्का होत जातो. हळूहळू तिलाही त्याच्या या ‘खेळा’त रस निर्माण होतो. ती त्याच्याहीपेक्षा वरचढ चाली रचते. पण अल्ब्रेश्ट हा हाडाचा कलावंत असतो. तो प्रत्येक वेळी नवी चाल रचून पॉलाचा पाडाव करण्याचा आपला प्रयत्न सोडत नाही. पण पॉलाही त्याला पुरून उरते. शेवटी अल्ब्रेश्ट जीवनमरणाचा ‘खेळ’ करून बघतो. तेव्हा मात्र तिच्यातील भावनाशील स्त्री जागी होते. 

पॉलाच्या कंपनीतील कट थ्रोट कॉम्पिटिशनमुळे तिच्याही नोकरीवर कायम टांगती तलवार असते. आणि तिचा भूतकाळ तिच्या भविष्याला आकार देत असतो. अल्ब्रेश्टला जेव्हा याची जाणीव होते तेव्हा मात्र त्याच्यातला कलावंत शरमेनं खाली मान घालतो. तिला शरण जातो.

एव्हाना दोघांनाही आपलं प्राक्तन काय आहे, हे कळून चुकलेलं असतं. दोघांनाही एकमेकांबद्दल सहअनुभूती निर्माण झालेली असते. पॉला त्याच्यासमोर दोन पर्याय ठेवते. एक- थिएटर बंद करण्याचा. आणि दुसरा- पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या धोरणांचा स्वीकार करून त्यांच्या अटी-शर्तीनुसार कला सादर करण्याचा! अल्ब्रेश्ट दोन्हीस नकार देतो. त्याला त्याचं स्वातंत्र्य व कला प्राणांपेक्षाही प्रिय असते. पॉलालाही आपण कुठल्या ज्या भ्रमित विश्वात जगतो आहोत त्याचा साक्षात्कार होतो. आणि तीही नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेते.. (अर्थात हीसुद्धा एक फॅन्टसीच असू शकते!)

हे नाटक विचारांचं नाटक आहे. परंतु तरीही ते प्रथम ‘नाटक’ आहे, त्याचा ‘अग्रलेख’ झालेला नाही. याचं श्रेय नाटक सादर करणाऱ्या सगळ्या मंडळींना द्यावं लागेल. नाटकाची पार्श्वभूमी जरी परदेशी असली तरी नाटकातलं वास्तव भारतातील सद्य:परिस्थितीलाही तितकंच चपखल लागू पडतं. किंबहुना, ते इथल्या परिस्थितीवरचंच परखड भाष्य आहे. प्रारंभी हे नाटक कशाबद्दल आहे याचा नीटसा अंदाज येत नाही. त्यामुळे काहीसं चाचपडल्यासारखं होतं. परंतु ते जसजसं पुढे सरकतं, तसतसा त्यातला टोकदार आशय समोर येत जातो. असं असूनही यातलं नाटकपण किंचितही उणावत नाही. सर्वसामान्य माणसं, त्यांची कलेप्रतीची उदासीनता, वर्तमान राजकीय-सामाजिक परिस्थिती, असंस्कृत व अविचारी नेते, कॉर्पोरेट कल्चरची ‘वापरा व फेकून द्या’ नीती, सर्वंकष अमानुषता अशा अनेक गोष्टींबद्दल हे नाटक बोलतं.. व्यक्त होतं. आणि असं असूनही त्यातलं ‘नाटय़’ दशांगुळं वरच राहतं. लेखन, रंगावृत्ती, दिग्दर्शन, सादरीकरण, कलावंतांचा अभिनय या साऱ्यांचाच अत्युच्च दर्जा हे ‘अडलंय का?’चं वैशिष्टय़! गेल्या कित्येक वर्षांत विचारप्रवृत्त करणारं, तरीही नाटकपणाची कास न सोडलेलं असं नाटक पाहण्यात नाही.

अतुल पेठे यांच्याबाबतीत म्हणायचं झालं तर हे काही अंशी त्यांच्याच आयुष्यावर बेतलेलं नाटक तर नाही ना, असा संशय यावा इतपत त्यांची अव्यभिचारी नाटय़निष्ठा आणि त्यांच्या विचारांची सावली नाटकभर पसरलेली दिसते. त्यांच्या अभिनय कारकीर्दीतील निश्चितच ही एक संस्मरणीय भूमिका ठरावी. अल्ब्रेश्टची भावनिक व कलात्मक भावआंदोलनं त्यांनी ज्या नजाकतीनं पेश केलीयत त्यास त्रिवार ‘हॅट्स ऑफ’!  पर्ण पेठे यांनी पॉलाच्या भूमिकेत त्यांच्याशी तोलामोलाची जुगलबंदी पेश केली आहे. नाटक आणि वैचारिक भूमिकेप्रती कमालीची निष्ठा बाळगणाऱ्या आपल्या पित्याला पॉला साकारून त्यांनी एक प्रकारे मानवंदना दिली आहे. बाप-बेटीची ही जुगलबंदी लोभस तर आहेच; त्याहूनही अधिक ती वैचारिकतेचा वारसा पुढे नेणारी आहे. पॉलाच्या मानसिकतेत हळूहळू होत गेलेली स्थित्यंतरं पर्ण पेठे यांनी उत्कटतेनं अभिव्यक्त केली आहेत. त्यांच्या संवादफेकीतले बदलणारे आरोह-अवरोह याचं प्रत्यंतर देतात.

निपुण धर्माधिकारी यांच्या सर्वस्पर्शी दिग्दर्शकीय कौशल्यानं नाटकाने दृक्-श्राव्य-काव्याची उंची गाठली आहे. नाटकातील नाटकपण हरवू न देता वर्तमान वास्तवावर भाष्य करण्याची कसरत त्यांनी लीलया केली आहे. ठाय लयीत नाटक आकारत नेत, त्यातील विचारांना कवेत घेत ते मंचित करण्याचं शिवधनुष्य त्यांनी सहजगत्या पेललं आहे. कसं? ते प्रत्यक्ष प्रयोगात पाहणं उचित ठरेल! एका उत्कट, विचारप्रवण, कलात्मक आणि तरीही रंजक अशा नाटकाचा आस्वाद घ्यायचा असेल तर ‘अडलंय का?’ पाहायला पर्यायच नाही. 

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Natyarang artistic commentary present live man life is beautiful art artist man ysh

Next Story
“पृथ्वीराज चौहान राजपूत सम्राट नाही…” गुर्जर संघटनेच्या दाव्यामुळे अक्षय कुमारचा चित्रपट वादात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी