नाटय़रंग : पण पुराव्याचं काय..? ; ‘सुंदरा मनात भरली’

शासन नावाच्या यंत्रणेला भ्रष्टाचाराची किड लागण्याची परंपरा आदिम काळापासूनच प्रचलित आहे.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

रवींद्र पाथरे
शासन नावाच्या यंत्रणेला भ्रष्टाचाराची किड लागण्याची परंपरा आदिम काळापासूनच प्रचलित आहे. परंतु तो सिद्ध होणार नाही याची खबरदारी ही यंत्रणा आणि त्यातले बाबूलोक नेहमी घेत असतात. त्यामुळे बहुतांश भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सुयोग्य पुराव्याअभावी आणि न्याय यंत्रणेकडून न्यायदानास झालेल्या प्रदीर्घ विलंबामुळे आरोपी निर्दोष सुटण्याचं प्रमाण मोठे आहे. काही आरोप खरेही असतात, परंतु त्याबाबतचे प्रत्यक्ष पुरावे देणे किंवा त्यासंबंधातील प्रत्यक्ष साक्षीदार न्यायालयात उभे करणे अवघड असते. त्यामुळे बऱ्याचदा असे गुन्हेगार राजरोस गुन्हे करूनदेखील समाजात वर मान करून फिरताना दिसतात. या वास्तवाकडे निर्देश करणारं संतोष पवार यांचं ‘सुंदरा मनात भरली’ हे नवं नाटक!

यात संतोष पवार यांनी स्वातंत्र्यापूर्वीची- सत्तर वर्षांपूर्वीची पाश्र्वभूमी घेतली आहे. (आजची सवंग राजकीय मंडळी उगा अंगावर यायला नकोत, म्हणून!) एका राजाच्या दरबारी असलेले भ्रष्ट आचारविचारांचे व्हॉईसराय, न्यायशास्त्री आणि कोतवाल हे संगनमताने राजनर्तिकेला पदावरून काढून टाकतात. कारण तिने त्यांच्या भ्रष्ट आचाराला साथ द्यायचं नाकारलेलं असतं. परंतु राजाही या अधिकाऱ्यांचंच म्हणणं ग्राह्य़ मानून तिच्या जागी नव्या राजनर्तिकेची (गुलाबबाई) नेमणूक करतो. परंतु हे बाईलवेडे दरबारी तिलाही आपल्या कह्य़ात घेण्याकरता लाळघोटेपणा सुरू करतात. राजाच्या डोकेबाज भालदाराला- गंगारामला हे बिलकूल खपत नाही. कारण राजनर्तकी गुलाबबाईनं त्याचाही कलिजा खल्लास केलेला असतो. गुलाबबाईही गंगारामची हुशारी व समंजसपणावर फिदा असते. गंगाराम राजाकडे दरबारी राजनर्तिकेला कसे त्रास देताहेत याबद्दल तक्रारी करतो.. परंतु व्यर्थ! गुलाबबाईही त्यांच्याविरोधात राजाकडे दाद मागते. पण राजा दोघांकडे प्रत्यक्ष पुरावे मागतो; जे असल्या प्रकरणांत देता येणं शक्यच नसतं. गंगाराम गुलाबबाईच्या साथीनं दरबाऱ्यांना रंगे हाथ पकडून देण्यासाठी जंग जंग पछाडतो.. पण रामा शिवा गोविंदा! राजावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. उलट, तो त्या दोघांनाच दरबारातून काढून टाकतो. दोघंही पार हताश होतात.

आता पुढे काय?
शेवटी गुलाबबाईच यावर एक जालीम उपाय योजते. तो काय, ते इथं सांगणं योग्य होणार नाही. ते प्रत्यक्ष नाटकात पाहणंच उचित.
लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांना खरं तर वर्तमान वास्तवावर नाटकात कोरडे ओढायचे आहेत, परंतु तसं प्रत्यक्षात करणं धोक्याचं असल्यानं त्यांनी ‘सुंदरा मनात भरली’चा काळ सत्तर वर्षे मागे नेऊन ठेवला आहे. इंग्रजांच्या काळातील संस्थानी राजवट त्यांनी त्याकरता योजली आहे. त्या काळातले दरबारी अधिकारी कुठल्याही काळात फिट्ट बसू शकतात, म्हणून ही युगत. सरळमार्गी माणसांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांबाबत ही माणसं शासन यंत्रणेकडे दाद मागू शकत नाहीत. कारण सत्ताधारी, धनदांडगे आणि सत्तेशी जवळीक असलेले लोक सत्ता व मत्तेचा वापर करून त्यांचा विरोध मोडून काढू शकतात. अशांच्या विरोधात साक्षी-पुरावे देणंही अवघड. त्यामुळे पीडितांनी अन्याय-अत्याचार मुकाटपणी सोसून गप्प बसायचं, एवढंच त्यांच्या हाती असतं.. मग काळ कुठलाही असो!

पण इथं संतोष पवार यांनी जशास तसं या न्यायानं या कठीण समस्येवर उत्तर शोधलं आहे. प्रश्नांचं कोडं घालून ते त्याच समीकरणानं सोडवण्यासारखाच हा प्रकार. तशात राजनर्तकीवरील अन्याय हा विषय असल्यानं नाचगाणी ओघानं आलीच.. ज्या पीचवर संतोष पवार नेहमीच ‘कम्फर्टेबल’ असतात! पवारांच्या सादरीकरणात वैचित्र्यपूर्ण पात्रं आणि त्यांच्या तितक्याच हास्यस्फोटक लकबी हा हुकमतीचा एक्का असतो. तो त्यांनी इथं मुक्तपणे वापरलाय. नाटकाची रचना साधी-सोपी. हाताळणी मात्र प्रेक्षकाला आवडेल अशी धमाल मनोरंजक. त्यामुळेच यातली पात्रं एन्ट्रीलाच प्रेक्षकांना कवेत घेतात. घंटागाडीसारखा आवाज काढत एन्ट्री घेणारा कोतवाल; पाप्याचं पितर, पण गमजा मात्र केवढय़ा तरी मारणारा न्यायशास्त्री; बिनडोक व्हॉईसराय, विशिष्ट टोनमध्ये बोलणारा मूर्ख राजा असा गोतावळा संतोष पवार यांनी यात निर्माण केला आहे. आणि त्यांच्या मूर्खपणातून सगळं रामायण घडवलं आहे. दिलखेचक लोकप्रिय गाणी आणि त्याला साजेशी घायाळ करणारी अदाकारी यांनी नाटकाचा ओघ सांभाळला आहे. दिग्दर्शकाची ‘ट्रीटमेंट’ ‘सुंदरा’मध्ये महत्त्वाची ठरली आहे. ती प्रेक्षकाला विचार करायला बिलकूलच उसंत देत नाही..

नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी राजाचा दरबार आणि रंगशाळा यथातथ्य उभी केली आहे. अशोक पत्कींचं शीर्षक संगीत लक्षवेधी. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून आवश्यक तो झगमगाट साकारला आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा नाटकातील उपरोध प्रकट करणारी.विशिष्ट हेल काढत बोलणारा राजा संदीप गायकवाड यांनी छान उभा केला आहे. घंटागाडी संगीताच्या तालावर एन्ट्री-एक्झिट घेणारा कोतवाल रामदास मुंजाळ यांनी धम्माल रंगवलाय. त्यांची मजेदार वेशभूषा त्यांना याकामी उपयोगी पडली आहे. पाप्याचं पितर वाटावं असा न्यायशास्त्री आणि त्याची फणीनं मिशीला भांग पाडायची लकब भन्नाट! प्रशांत शेटे यांनी त्याला ‘न्याय’ दिला आहे. ऋषिकेश शिंदे यांचा व्हॉईसराय दिसायला रुबाबदार; पण बिळबिळीत व्यक्तिमत्त्वाचा. स्मृती बडदे यांनी गुलाबबाईचा ठसका आणि नाचगाण्यांतील उत्तम अदाकारीचा छान प्रत्यय दिला. संतोष पवार यांचा डोकेबाज गंगाराम आणि दुसऱ्या अंकातील नृत्यनिपुण अदाकारा त्यांच्या अभिनयकौशल्याची चुणूक दर्शविणारी. संपूर्ण नाटकातील त्यांचा वावर, संवादफेकीतील लाजवाब टायमिंग आणि नाटक एकहाती उचलून नेण्याचं सामथ्र्य.. सगळंच प्रशंसनीय.

चार घटका मस्त करमणूक (आणि जमलाच तर काही बोध!) करणारी ही ‘सुंदरा’ मन प्रसन्न करते यात शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Natyarang evidence rule corruption tradition court amy

Next Story
‘राग्या’ रागसंगीताचे अभिजात रूप
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी