रवींद्र पाथरे

काळ हा निरंतर आहे. त्याला पृथ्वीतलावरील सजीवसृष्टी आणि निसर्गात घडणाऱ्या सुखद वा दु:खद घटनांशी काहीच देणंघेणं नसतं… नाही. अशा घटनांचं महत्त्व त्या- त्या व्यक्तीला आणि तिच्या निकटवर्तीयांनाच असतं. मात्र, सतत पुढे पुढे सरकणारा काळ हा त्यांच्या सुख-दु:खांवरचा जालीम उपायही आहेच. माणसं आघातांतून कालौघात सावरतात. जगण्याबद्दलचा हा निर्लेप, निर्विकार, तटस्थ विचार प्रत्येकाला माहीत असला तरी प्रत्यक्षात आयुष्य जगत असताना मात्र आपण त्यात इतके काही गुंतून गेलेलो असतो, की सहसा हा विचार आपल्या कधी मनातही येत नाही. त्यामुळेच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांचे परिणाम आपल्यावर होत असतात. दूरस्थ, तटस्थपणे आपण त्यांना सामोरे जाऊच शकत नाही. सई परांजपे लिखित-दिग्दर्शित ‘इवलेसे रोप’ हे नाटक माणसाच्या या अशा जगण्याचंच निदर्शक आहे. म्हटली तर ही नाटकातल्या माई (भानू)- बापू (माधव)ची गोष्ट आहे. म्हटली तर ती कुणाचीही असू शकते. माणसांच्या शाश्वत मूल्यांचीही ती गोष्ट आहेच. आज व्यक्तिवादानं एवढं टोक गाठलं आहे की कोणतंही नातं निर्माण होण्याआधीच ते कोमेजू लागतं. ते नीट फुलूच दिलं जात नाही… पिकण्याची तर गोष्टच सोडा. तेव्हा मग कधी कधी मागची पिढी आणि आजची पिढी यांची तुलना होते. या दोन पिढ्यांची मूल्यं, त्यांची संस्कृती, जगण्याची तऱ्हा यांची तुलना होत राहते. त्या अनुषंगाने मग एकत्र आणि विभक्त कुटुंबपद्धतीच्या फायद्या-तोट्यांचीही चर्चा होते. माणूस म्हणून एकमेकांना समजून घेण्या- न घेण्याचीदेखील चर्चा होते. अशा वेगवेगळ्या कोनांतून नेहमी माणसांतल्या नात्याकडे बघितलं जातं. ‘इवलेसे रोप’मधले आजच्या पिढीचे वैशाली आणि जगन्नाथ आपल्या आधीच्या पिढीतील माई आणि बापू यांच्या संसारात डोकावून बघतात तेव्हा त्यांना नेमकं काय आढळून येतं? माई आणि बापू आता वार्धक्याकडे झुकलेत. दोघंही व्याधींनी त्रस्त आहेत. पण त्यांचं परस्परांना समजून घेणं मात्र एखाद्या पक्व फळापरी जगन्नाथला वाटतं. खरं तर माई-बापूंचं आयुष्य तिऱ्हाईताला व्यर्थ गेल्यासारखंही वाटू शकतं. कारण त्यांच्या संसारात मुलंबाळं नाहीत. भविष्य नाही. त्यांच्या आयुष्याला काही ध्येय उरलेलं नाही. तरीही ते एकमेकांना धरून आहेत. काळ जरी त्यांच्यासाठी थांबलेला असला तरी ते मात्र त्यांच्या आयुष्याचं रहाटगाडगं इमानेइतबारे वाहताहेत. भूतकाळाच्या जखमा ते कुरवाळत बसलेले नाहीत. जगन्नाथ आणि वैशाली बाहेरगावी जाताना माई-बापूंकडे आपलं एक रोप सांभाळायला देतात. त्या रोपाचं संगोपन करता करता ती दोघं त्याच्यात कमालीची गुंतून जातात. इतकी, की ते दोघं परत आल्यावर त्यांना ते रोप परत द्यावंसं वाटत नाही. आणखीन थोडे दिवस आमच्याकडेच राहू द्यात ते रोप- अशी विनंती ते त्यांना करतात. त्यांचं त्या रोपातलं गुंतणं पाहून जगन्नाथ आणि वैशाली त्यांनाच ते रोप कायमस्वरूपी देऊन टाकतात तेव्हा त्यांना अपार आनंद होतो. आपल्या संसारवेलीवर कळी उमलली नसली तरी या रोपाला मात्र नवी कळी फुटू पाहतेय याचा त्यांना मनस्वी आनंद होतो. वैशालीलाही दिवस गेलेले असतात.पण हा आनंद फार काळ टिकत नाही. अचानक बापू भ्रमिष्टासारखे वागाय-बोलायला लागतात. आपला अंत आता जवळ आलाय हे बहुधा त्यांना कळून चुकतं…

Loksatta lokrang book raabun nirmiti karnarya poladi baya Stories of eight women of the Ghisadi community
घिसाडी जीवनाचं वास्तव
Parenting, control, freedom, ideal parenting, parent child relationship, discipline, authority, family dynamics, , communication, conflict, grandparent influence, parental boundaries, chaturang article,
सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा
Paranoid Personality Disorder, PPD, personality disorders, behavioral patterns, mental health, psychotherapy, DSM-5, family dynamics, trust issues, mental illness, symptoms, treatment, chaturang article,
स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?
rishi sunak, Narendra Modi, Rishi Sunak's Humble Resignation, Narendra Modi's Aggressive Approach, Narendra Modi s 400 seat announcement, Narendra modi loksabha performance, vicharmanch article,
या बाबतीत मोदींपेक्षा सुनक निश्चितच वरचढ ठरले!
Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
necessary to take different measures for the welfare of women farmers
सगळ्या बहिणींमध्ये ‘शेतकरी बहिणी’ जास्त लाडक्या असाव्यात…
Loksatta kutuhal Artificial Intelligence for Anomaly Detection in Financial Transactions
कुतूहल: वित्तव्यवहारांत विसंगती शोधक कृत्रिम बुद्धिमत्ता
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!

सई परांजपे यांनी आजवर नाटक, सिनेमा, सीरियल्समध्ये जीवनाकडे सकारात्मकदृष्ट्या, हसत-खेळत कसं बघावं हेच प्रामुख्यानं मांडलं आहे. परंतु या नाटकात पहिल्यांदाच त्यांचे नेत्र पैलतीरी लागलेले जाणवतात. तिथवरचा प्रवास कसा असावा याबद्दलचं त्यांचं हे चिंतन असावं असं वाटतं. नाटकात फारशा नाट्यपूर्ण घटना, घडामोडी नाहीत. उलट, एका सरळसोट आयुष्याचा लेखाजोखा यात त्यांनी मांडला आहे. त्या अर्थानं प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं नाट्यपूर्ण असं नाटकात काही नाही. तरीदेखील प्रेक्षक दोन म्हाताऱ्यांच्या या नाटकात नकळत गुंतत जातात. जयवंत दळवींच्या ‘संध्याछाया’मध्ये विदेशी गेलेल्या लेकरांची वाट पाहत कुढणारं, हतबल झालेलं वृद्ध दाम्पत्य दाखवलंय. पण या नाटकात तसं काही नाहीये. समोर येईल त्या आयुष्याला सामोरे जाणारे माई-बापू यात आहेत. आपला संसार फुलला, फळला नाही याची खंत त्यांना असली तरी ते तेवढंच धरून बसलेले नाहीत. वाट्याला आलेलं आयुष्य ते मन:पूत जगले आहेत. सारं काही भरून पावलंय अशी त्यांची धारणा आहे. मृत्यूला सामोरं जाताना जराही विषाद त्यांच्या मनात नाही. तरीही त्यांचं जाणं आपल्याला सुन्न करतं… अंतर्मुख करून जातं. आणि हेच या नाटकाचं मोठं यश आहे. या नाटकात घटना फारशा नाहीत. आहे ते एक थांबलेपण. भिंतीवरच्या घड्याळात कायम सात वाजलेले दिसतात. काळ गोठल्याचंच ते प्रतीक. माई-बापूंच्या आयुष्यात आता नव्याने काही घडणार नाहीए. त्यांना आहे ते दिवस ढकलायचे आहेत… पण ते आपल्याला त्रास करून न घेता! त्यांच्या आयुष्यात डोकावतात ते शेजारचे जगन्नाथ आणि वैशाली. या जोडप्याचं, त्यांच्यातल्या प्रेम, आपुलकी, सौहार्दाचं नातं समजून घेण्यासाठी. त्यामुळे हे दोघं यात एक प्रकारे नटी-सूत्रधाराची भूमिका निभावतात. माई-बापूची गोष्ट सांगतात… दाखवतात. तसं पाहता हे नाटक आहे माई-बापूंचंच. त्यांच्या हर्ष-खेदाचं. जगण्याचं. त्याचा आलेख सई परांजपे यांनी नाटकात रचलाय. छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांच्यातलं नातं कसं पक्व होत गेलंय याची झलक त्यात पाहायला मिळते. पन्नास वर्षांपूर्वी सुलभामध्ये (माईची बहीण) बापूंनी नकळत गुंतण्याचा प्रसंग आणि त्याबद्दल त्यांनी आयुष्यभर जोपासलेला अपराधगंड माई काना-मनाआड करते. कारण तिला ठाऊक आहे- या माणसाने अपराधगंडापोटी आपलं संपूर्ण आयुष्य कुरतडून घेतलंय. आता त्याला आणखीन काय ती शिक्षा करायची? ही समज तिला आहे. सई परांजपे अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्यातल्या हृद्या नात्यावर प्रकाशझोत टाकतात. एकमेकांचे गुणदोष मनाआड करण्यातच भलं आहे हे त्यांना कळून चुकलंय. माई-बापूंच्या या जगण्यातून जगन्नाथ वैशालीला काहीएक सांगू मागतोय. आजच्या आपल्या पिढीची मानसिकता कशी आहे आणि ती कशी असायला हवी, हे यातून तो दाखवू इच्छितोय. त्याचा हा हेतू साध्य होतो आणि त्यांच्यातील नात्याला बळकटी येते. सई परांजपे यांनी नाटकाचा आलेख नीटसपणे रेखाटलाय. फ्लॅशबॅकच्या आग्रहात नेपथ्यबदलात थोडा रसभंग होतो खरा, पण तो धकून जातो. यातलं रोपाचं प्रतीक खूप काही सांगून जाणारं आहे. माणसाच्या जगण्याचं श्रेयस आणि प्रेयस त्यातून आकळतं.

हेही वाचा >>>Video: ड्रेसची लुंगी करत सोनाली कुलकर्णीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

प्रदीप मुळ्ये यांनी माई-बापूंचं घर त्यांच्या काळासकट उभं केलंय. त्यातलं प्रतीकात्मक घड्याळ खूप काही सांगून जाणारं. विजय गवंडे (संगीत) रवी करमरकर (प्रकाशयोजना) यांनी नाटकातल्या काळाचं प्रयोजन सांभाळलं आहे. सोनाली सावंत (वेशभूषा) आणि सुरज माने- दुर्वेश शिर्के (रंगभूषा) यातल्या पात्रांना बाह्य रूपडं पुरवतात.

या नाटकात बापूंच्या भूमिकेत मंगेश कदम यांना त्यांच्या कारकीर्दीतली एक सर्वोत्तम भूमिका मिळाली आहे. आणि त्यांनीही ती चिरस्मरणीय केली आहे. त्यांचं पाय ओढत चालणं, डोकं, हातांची विशिष्ट हालचाल, बोलण्याचा टोन, मध्येच ट्रान्समध्ये जाणं, ऐकू येत नसल्याने काही गोष्टींकडे दुर्लक्ष होणं, काही वेळा जाणीवपूर्वक ते करणं… अशा अनेक लकबींतून त्यांनी बापूंना ‘आत्मा’ बहाल केला आहे. त्यांचा सरळमार्गी स्वभाव, खुला दृष्टिकोन, सुलभा प्रकरणातील अपराधगंड आणि नंतर स्वत:वरचा हळूहळू जात चाललेला ताबा त्यांनी सूक्ष्म तपशिलांनिशी दाखवला आहे. माईचा मनमोकळा स्वभाव, बापूंच्या बारीकसारीक बाबींत असलेलं तिचं लक्ष, त्यांच्याभोवतीच गुरफटलेलं तिचं आयुष्य, म्हातारपण सुसह्य करण्याचे तिचे मार्ग, बापूंचं हळूहळू विझत जाणं कळूनही न स्वीकारण्याचा माईचा अट्टहास या गोष्टी लीना भागवत यांनी सहजत्स्फूर्तरीत्या प्रकट केल्या आहेत. त्यांचीदेखील ही एक अविस्मरणीय भूमिका ठरावी. आजवर विनोदावरील आपली मास्टरी सिद्ध करणाऱ्या लीना भागवत यांनी ‘अधांतर’, ‘तन-मन’, ‘अशी पाखरे येती’नंतर आता ‘इवलेसे रोप’मध्ये आपल्या चतुरस्रा अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. मयुरेश खोले (जगन्नाथ) आणि अनुष्का गीते (वैशाली) यांनी नव्या पिढीचं मागील पिढीला समजून घेणं समंजसपणे दाखवलंय. सूत्रधाराच्या भूमिकेतही ते जेवढ्यास तेवढंच व्यक्त होतात. अक्षय भिसे यांचा दत्तूही चोख.

प्रेक्षकांचा बराच काळ पाठलाग करत राहील असं ‘इवलेसे रोप’ हे नाटक आहे यात काहीच शंका नाही.