scorecardresearch

ना टय़ रं ग : वाकडी तिकडी फुल्टू कॉमेडी..

‘वाकडी तिकडी’ या नावावरून नाटक कशाबद्दल आहे याचा काही बोध होत नाही हे खरं, परंतु ते पाहिल्यावर मात्र ते खाशीच वाकडीतिकडी करमणूक करणारं असल्याची खात्री पटते.

रवींद्र पाथरे

‘वाकडी तिकडी’ या नावावरून नाटक कशाबद्दल आहे याचा काही बोध होत नाही हे खरं, परंतु ते पाहिल्यावर मात्र ते खाशीच वाकडीतिकडी करमणूक करणारं असल्याची खात्री पटते. श्रमेश बेटकर लिखित आणि श्रमेश बेटकर- अंशुमन विचारे दिग्दर्शित हे नाटक प्रारंभीच आपली पिंडप्रकृती स्वच्छपणे उघड करतं. एसटी स्टॅन्डवर संजय आपल्या दोन मित्रांची (अजय आणि विजय) वाट बघत असतो. ते दोघं आपल्याला या शहरात कुठं जागाथारा मिळेल काय हे पाहायला गेलेले असतात. दोन-तीन दिवस त्यांची ही मोहीम सुरू असते. पण अद्याप कुठेच आशेचा किरण दिसलेला नसतो. अजयच्या एका मित्राने त्यांची राहण्याची सोय करतो म्हणून म्हटलेलं असतं, पण ती महिन्यानं! तोवर करायचं काय, हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो. अशात अजय एक चांगली बातमी आणतो. त्याला एके ठिकाणी पेइंग गेस्ट ठेवण्याबद्दलची खबर मिळालेली असते. पण घरमालकांची एक अट असते : ते सेवाभाव म्हणून केवळ अपंगांनाच घरात ठेवू इच्छित असतात.

आता करायचं काय?

अजय म्हणतो, ‘नाटक करू यात. आपल्यापैकी एकानं मुका, एकानं बहिरा आणि एकानं आंधळ्याचं सोंग घ्यायचं.’ पण या गोष्टीला कुणी तयार होत नाही. कारण बिंग फुटलं तर सरळ जेलची हवा खावी लागणार. परंतु अजय त्यांना कसंबसं मनवतो. ते त्या घरी पोहचतात.. आणि त्यांच्या ‘नाटका’स सुरुवात होते. पण घरात पाऊल टाकल्याक्षणीच ‘नाटका’चे तीन तेरा वाजायला सुरुवात होते. अजयच्या हुशारीवर ते कसेबसे त्या संकटातून तगतात खरे, मात्र हे रोज कसं जमणार? शिवाय त्या घरात सचिन नावाचा एक पेइंग गेस्ट आधीच राहत असतो. (तो नॉर्मल असतो.) घरमालक आणि सचिन या दोघांना आपापल्या अपंगत्वाबद्दल सांगताना तिघंही घोळ घालतात. परिणामी घरमालक आणि सचिन या दोघांसमोर ते तिघं वेगवेगळ्या ‘भूमिके’त वावरतात. हे कमी म्हणून की काय, सुहानी नावाची मुलगी त्यांच्या अपंगत्वासंबंधात त्यांची मुलाखत घ्यायला येते. त्याने हा घोळ अधिकच वाढतो. या सगळ्या कसरतींमधून ते कसे सव्‍‌र्हाइव्ह होतात, हे पाहणं म्हणजे हे नाटक.. ‘वाकडीतिकडी’!

श्रमेश बेटकर यांनी या प्रसंगनिष्ठ विनोदी नाटकाची रचना लीलया केली आहे. तीन वेगवेगळ्या व्यक्तींसमोर आपल्या तिघांना तीन प्रकारच्या ‘भूमिका’ वठवायच्यात हे कुणाच्या लक्षात राहणं तसं अशक्यच. स्वाभाविकपणेच अजय, विजय आणि संजय क्षणोक्षणी उघडे पडतात. प्राप्त परिस्थितीतून सुटण्यासाठी त्या, त्या वेळी त्यांनी मारलेल्या उलटसुलट थापा, केलेल्या नाना कसरती यावर या नाटकाचा सगळा डोलारा उभा आहे. तशात त्या घरात एक इन्स्पेक्टर आणि दहशतवादीही शिरतात. त्यातून मग जी काही अभूतपूर्व गडबड-गोंधळ होतो, तो प्रत्यक्ष अनुभवणंच उचित होय. लेखकानं उतरवलेली धमाल विनोदी संहिता तितक्याच कौशल्याने रंगमंचावर आकारण्यात दिग्दर्शक श्रमेश बेटकर व अंशुमन विचारे शंभर टक्के यशस्वी झाले आहेत. नाटक क्षणभरही रेंगाळणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे. सिच्युएशनल कॉमेडी असलेलं हे नाटक कसदार कलाकारांनी तितक्याच तोलानं पेललं आहे. मुख्य म्हणजे विनोदी कलाकारांची फळी भक्कम असल्यानं अन्य कच्चे दुवे झाकले गेले आहेत. एक छान मनोरंजक नाटक सादर करण्यात संपूर्ण टीमचंच योगदान आहे.   

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी भला प्रशस्त बंगला कलाकारांना भरपूर बागडायला मिळेल अशा रीतीनं साकारला आहे. सत्यजीत रानडे यांचं संगीत आणि अमोघ फडके यांची प्रकाशयोजना नाटय़ाशयास पोषक अशीच. पल्लवी विचारेंची वेशभूषा आणि किशोर पिंगळे यांच्या रंगभूषेनं पात्रांना ‘चेहरे’ दिले आहेत.

अंशुमन विचारे यांचा मालवणी संजय नेहमीप्रमाणेच फर्मास. स्त्री-‘भूमिके’तही ते भाव खाऊन जातात. त्यांची विनोदाची सखोल जाण त्यातून जाणवते. उदय नेने (अजय) यांचीही विनोदाची समज आणि टायमिंग कम्माल! नाटक पुढे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सचिन वळंजूंचा सतत भांबावलेला विजय आपल्या वाटय़ाचे हशे वसूल करतो. मात्र, घरमालक झालेले अनिल शिंदे कायम वरच्या पट्टीतच का बोलतात, असा प्रश्न पडतो. अमिर तडवळकरांनी इन्स्पेक्टर साजनच्या रूपात आपल्या ताडमाड उंचीने आणि चमत्कारिक वागण्या-वावरानं गंमत आणली आहे. अजिंक्य नंदा (सचिन), नरेंद्र केरेकर (चोर) आणि हर्षदा बामणे (सुहानी) यांनी आपली कामं चोख वठवली आहेत. ‘वाकडी तिकडी’ हे नाटक डोक्याला कसलाही ताप न देता चार घटका करमणुकीची हमी देतं, हे मात्र निश्चित.     

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Natyarang wakadi tikdi fultu comedy drama crooked entertainment ysh

ताज्या बातम्या