रवींद्र पाथरे

१९९१ साली ‘चारचौघी’ हे प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर आलं आणि स्त्रीप्रश्नांचे अनेक कंगोरे उकलणारं हे नाटक त्यावेळी मराठी रंगभूमीवरील ‘मैलाचा दगड’ ठरलं. असंख्य पुरस्कार, चर्चा, वादविवाद, परिसंवाद यांनी या नाटकाने एक आगळा माहोल तयार केला होता. गंभीर विषयावरचं नाटक असूनदेखील धडाकेबाज प्रयोगांचा विक्रमही या नाटकानं केला. त्यानंतर आज सुमारे तीसेक वर्षांचा काळ लोटला आहे. स्त्री-प्रश्नांची व्याप्ती आणि परिघ बदलला आहे.. अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. स्त्रियांचे त्यावेळचे प्रश्न, समस्या काहीशा मागे पडल्या आहेत. ९१ सालीच देशात आलेल्या जागतिकीकरणाच्या परिणामी आजची स्त्री मुक्त, मोकळी, स्वतंत्र झाल्याचा भास निर्माण झाला आहे. काळाचा हा बदललेला संदर्भ लक्षात घेता ‘चारचौघी’ पुनश्च या काळात रंगमंचावर येणं कितपत सयुक्तिक ठरेल, हा प्रश्न सामाजिकदृष्टय़ा सजग असणाऱ्यांना पडणं स्वाभाविक म्हणता येईल. मात्र, नवा प्रयोग पाहताना आजही या नाटकातलं भोवंडून टाकणारं वास्तव कुठे बदललंय, हा प्रश्न पडतो. माणसाच्या जगण्यातील आधुनिकता ही केवळ तांत्रिक आणि भौतिक सुधारणांमध्येच झालीय. पण माणूस खरवडून काढल्यावर तो आतून फारसा बदललेला नाही हे लख्ख ध्यानात येतं. अन्यथा आज हे नाटक संदर्भहीन व्हायला हवं होतं. पण आजच्या पिढीलाही ते आपलं वाटत असेल तर काळ बदलला असला तरी माणसं, त्यांची मानसिकता आणि वृत्तीही बदललेली नाही, हेच वास्तव अधोरेखित होतं. त्यावेळी ‘चारचौघी’चा प्रयोग पाहिलेली मंडळी आज मौजूद आहेत. मात्र त्यांनाही काळाचा पट बदललेला असूनही नाटक जुनं वा संदर्भहीन झाल्यासारखं वाटत नाही, हे ‘माणूस’ म्हणून आपल्या प्रगतीचं लक्षण म्हणायचं की अधोगतीचं?

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

आज वरकरणी तरी स्त्री मुक्त झाल्यासारखी वाटते आहे. निदान उच्चभ्रू (बहुअंशी मध्यमवर्गीयही!) वर्गातली स्त्री आपलं स्वातंत्र्य, करीअर आणि आपलं स्वत्व याबद्दल जागरूक झालेली दिसते आहे. पण हे वरवर दिसणारं वास्तव खरं आहे का? समाजाची पुरुषप्रधान मानसिकता उणावली आहे का? की उलट कचकडय़ाचं स्वातंत्र्य देऊन पुरुष वेगळ्या मार्गाने स्त्रीचं शोषण करतो आहे? तिला स्वातंत्र्य मिळाल्याचं बेगडी समाधान देत, तिच्या कथित ‘धाडसा’ला प्रोत्साहन देऊन तिला गुंगी आणत तिचं शोषण करण्याचे नवे मार्ग या पुरुषप्रधान समाजाने शोधले आहेत.  

‘चारचौघी’तली बंडखोर आई आणि तिच्या तीन सुविद्य मुली (विद्या, वैजू आणि विनी) स्वतंत्र आयुष्यं जगत असल्याचा भास होत असला तरी पुरुषी मानसिकतेनं केलेली त्यांची कोंडी हा या नाटकाचा मध्यवर्ती विषय. आपल्याला आवडलेल्या विवाहित पुरुषाबरोबर प्रेमाचं नातं निर्माण करून त्यातून तीन मुलींना जन्म देणारी आणि त्यांचं स्वत:च्या हिमतीवर लालनपालन करणारी यातली आई प्रत्यक्षात मात्र समाजाच्या ‘व्यभिचारी’पणाच्या शिक्क्य़ातून कधीच बाहेर येत नाही. तिच्या या ‘कलंका’तून तिच्या मुलींचीही सुटका नाही. त्यांच्यावर लादला गेलेला ‘व्यभिचारी स्त्रीची मुलं’ हा ठपका त्यांच्याही आयुष्यात वादळं निर्माण करणारा ठरतो. त्यांना खाली मान घालायला लावतो.. त्यांची यात कसलीही चूक नसताना!

विद्या.. उच्चशिक्षित. सोशालॉजीची नामवंत प्राध्यापिका. परंतु आईच्या व्यभिचारीपणाच्या शिक्क्य़ामुळे तिचंही लग्न जमता जमत नाही. शेवटी कसंबसं लग्न होतं खरं; परंतु तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडून विद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. लहानग्या मिनूलाही तो तिच्यापासून तोडतो. तर वैजूचा नवरा दिसायला हॅंडसम.. पण नोकरीधंद्याच्या नावाने बोंब. वतनदार घराण्याची टिमकी मिरवीत खुशालचेंडू आयुष्य जगणारा. त्यापायी वैजूची होणारी भीषण फरफट!

विनीची आणखी तिसरीच तऱ्हा! तिला एकाच वेळी बुद्धिप्रामाण्यवादी प्रकाश आवडतो आणि मोकळ्या मनाचा, दिसायला देखणा, श्रीमंत विरेनही आवडतो. तिला या दोघांबरोबर एकत्रित सहजीवन जगावंसं वाटतंय. काळाच्या पुढचे तिचे हे विचार १९९१ साली (तीस वर्षांपूर्वी) जितके धक्कादायक होते; तितके आजही ते स्वीकारार्ह ठरलेले नाहीत. अशा या चौघींच्या आयुष्याच्या चार तऱ्हा! त्यांच्या निरनिराळ्या कारणांनी कोंडीत सापडलेल्या आयुष्यांशी त्या झुंजतात.. आपापल्या परीनं!

पण आजही या वास्तवात काही बदल झालेला आहे का? म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हळूहळू समाजात झिरपताना दिसते आहे खरी. ‘लिव्ह इन’चे दोन-तीन अनुभव घेऊन पुढे चौथ्याशी संसार थाटणारे तरुण-तरुणी या अनुभवांतून खरंच काही शिकून आयुष्यात सुखी होतात? की या अनुभवांतून त्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्रिभंग होऊन त्यांची आयुष्यं आणखीन भरकटतात? जीवनातलं वैय्यर्थ्य कळून ते जगण्यापासून विन्मुख होतात? आपल्याला आवडलेल्या विवाहित पुरुषापासून मुलं होऊ देणाऱ्या स्त्रियाही आढळतात हल्ली. पण अशा ‘दुभंग’लेल्या पुरुषापासून त्या सुखी होतात का? देखण्या नवऱ्याला ‘शोपीस’ म्हणून पदरी बाळगणाऱ्या स्त्रियाही आहेत. पण त्यातून संसारात सुख मिळतं? हे प्रश्न आजही कायम आहेत. आणि त्यांत नवनव्या प्रश्नांची भर पडते आहे.

लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आजच्या भोवतालच्या या सामाजिक वास्तवाचा विचार नक्कीच केलेला असणार. म्हणूनच बहुधा हे नाटक पुनश्च करताना त्यांना त्यात काहीही बदल करावेसे वाटले नसणार. लेखकाची वण्र्यविषयाच्या खोलात शिरण्याची सहज प्रवृत्ती नाटकात प्रकर्षांनं आढळते. आणि त्यातील उपहास व उपरोधाला प्रेक्षकांकडून मिळणारा बौद्धिक तसंच हशा व टाळ्यांचा प्रतिसाद नाटक आजच्या पिढीपर्यंतही पोचतं आहे याची ग्वाही देतं. नव्या ‘चारचौघी’चं हे खरं यश म्हणता येईल! धक्कातंत्र ही प्रशांत दळवींची खासियत. ती या नाटकातही जाणवते. पण हे धक्के सामाजिक प्रवृत्तीसंदर्भात आहेत. स्त्रीप्रश्नांचा इतका खोलात विचार मांडणारं आणि तरीही (बुद्धिगम्य) मनोरंजन करताना प्रेक्षकाला अंतर्मुखही करणारं ‘चारचौघी’सारखं दुसरं नाटक पाहण्यात नाही. 

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी तीस वर्षांपूर्वीचं हे नाटक पुनर्जीवित करताना त्यातल्या आशयातील टोकदारपणा बिलकूल हरवणार नाही याची काटेकोर दक्षता घेतली आहे. कलाकार निवडीपासूनच याची सुरुवात होते. त्या, त्या भूमिकेला न्याय देणारे कलाकार योजण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. मुक्ता बर्वे यांच्यासारखी मोठय़ा ताकदीची कलावंत विद्याच्या भूमिकेसाठी योजून त्यांनी अर्धीअधिक लढाई जिंकली आहे. यातल्या प्रत्येक पात्राच्या आयुष्यातील ताणतणाव नाटकभर जाणवत राहतो. त्याची गडद-गहिरी छाया त्यांच्या परस्परांतील नात्यावरदेखील पडली आहे. स्त्रीप्रश्नांच्या डोहात उतरणारं हे नाटक आपल्यासमवेत प्रेक्षकांनाही घेऊन उतरतं. त्यांना सजग करतं. विचार करायला भाग पाडतं. नाटकातून प्रगल्भता घेऊन प्रेक्षागृहाबाहेर पडणारा नाटकापूर्वीचा आणि ते पाहिल्यानंतरचा प्रेक्षक यांच्यात नक्कीच गुणात्मक फरक पडलेला जाणवतो. आणि हीच या नाटकाची ताकद आहे.

पूर्वी हे नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांना पुनरुज्जीवित प्रयोग पाहताना ‘त्या’ प्रयोगाशी याची तुलना करावीशी वाटत नाही, हे महत्त्वाचं आहे. त्याचं कारण नाटककर्त्यांचं शंभर टक्के योगदान! आईच्या भूमिकेतील रोहिणी हट्टंगडी समजून-उमजून केलेल्या बंडखोरीचा वस्तुपाठ समोर ठेवतात. त्यांचा संयमित, परंतु प्रसंगी तीव्रतेनं व्यक्त होणारा उद्रेक आईची डिग्निटी, पेशन्स आणि विचारांची ठाम बैठक दर्शवतो. मुक्ता बर्वे यांनी विद्याचं भयंकर घुसमटलेपण, उच्चविद्याविभूषिततेतून या कुतरओढीस मिळालेली समतोल विचारांची बैठक, मिनूतील गुंतणुकीमुळे भावनिक आवर्तात भिरभिरताना होणारी तिची घुसळण आणि तद्पश्चात स्वत्वासाठी लढाईला सज्ज झालेली तिच्यातली रणरागिणी.. ही सारी अवस्थांतरं मुक्ता बर्वे यांनी मनोकायिक अभिनयातून अत्यंत उत्कटतेनं व्यक्त केली आहेत. उच्चकोटीच्या अभिनेत्रीचं त्यातून दर्शन घडतं. वैजूचं देखण्या ‘शोपीस’(नवऱ्या)बरोबरचं फरफटलेपण कादंबरी कदम यांनी ज्या तीव्रतेनं दाखवलंय त्याला तोड नाही. पण तरीही आपणच घेतलेल्या निर्णयाचं निभावणं तिने पत्करलंय. धाकटय़ा विनीचं बुद्धिवादी प्रकाश आणि हरहुन्नरी, मोकळ्या मनाच्या विरेनमध्ये एकाच वेळी गुंतणं आणि त्यांच्यातील एकाच्याच निवडीचा पर्याय समोर आल्यानं ध्वस्त होणं- कन्व्हिन्सिंग केलंय पर्ण पेठे यांनी! खरं तर अशक्यकोटीतलं असं हे आव्हान!! तिच्या या जगावेगळ्या सहजीवनाच्या अपेक्षेचा प्रस्ताव अनुत्तरित राहिला तरी त्यातील तथ्यांशाचा विचार करण्याविना प्रेक्षकाची सुटका नाही. निनाद लिमये यांनी खुशालचेंडू, बिनडोक श्रीकांत मस्त वठवलाय. प्रकाशचं गंभीर, विचारी व्यक्तिमत्त्व श्रेयस राजे यांनी नेमकं उभं केलंय. तर विरेनचा दिलखुलासपणा, नव्या विचारांचं स्वागत करण्याची वृत्ती पार्थ केतकर यांनी हसतखेळत साकारलीय.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी चौघींचं अभिरुचीसंपन्न घर तपशिलांत उभं केलं आहे. रवि-रसिक यांच्या प्रकाशयोजनेतून घटना-प्रसंगांतील विविध मूड्स जिवंत होतात. अशोक पत्की यांचं संगीत नाटय़ांतर्गत ताणतणावांना उठाव देतात. प्रतिमा जोशी-भाग्यश्री जाधव यांची वेशभूषा आणि उलेश खंदारे यांची रंगभूषा नाटय़मूल्यांत भर घालणारी. 

आशयसंपन्न आणि अंतर्मुख करणारा सच्चा नाटय़ानुभव देणारं हे नाटक प्रत्येकानं आवर्जून पाहायलाच हवं.