अनेकदा अभिनेता किंवा अभिनेत्री यांना अभिनय करण्याशिवाय दुसऱ्या गोष्टी फार काही येत नसतील असेल अनेकांना वाटत असते. पण बॉलिवूडमध्ये असा एक कलाकार आहे ज्याला अभिनयातलं कमी पण शेतीतलं त्याहून जास्त कळतं. त्याला शेतकऱ्यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल चिंता आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही तरी करण्याची इच्छाही त्याला आहे.
‘रमन राघव’ या त्याच्या सिनेमासाठी जेव्हा नवाज कान्स चित्रपट महोत्सवाला गेला होता तेव्हा तिथे फ्रान्सचे काही शेतकरीही आले होते. तेव्हा नवाजला त्यांच्याबरोबर फ्रान्सच्या ‘नीज’ या गावी जाण्याची संधी त्याला मिळाली. तिथल्या शेतीसाठी अत्याधुनिक सुविधा पाहून तो फार प्रभावीत झाला. ‘इथली सिंचन पद्धत त्याला फार आवडली. यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर जास्तीत जास्त ठिकाणी केला जातो. तो म्हणाला, मला ही सिंचनपद्धत फार आवडली. मी या तंत्रज्ञानाचा वापर माझ्या शेतीसाठी सुरु केला आहे. जर आपल्या शेतात या तंत्रज्ञानाचा उपयोग झाला तर ती आपल्या शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची क्रांती ठरेल.’

नवाज पुढे म्हणाला, ‘आपल्या देशात पाणी ही एक गंभीर समस्या बनली आहे. काही वर्षांपूर्वी पाण्याची पातळी ९० फूटांपर्यंत होती. पण, आता ती ३०० फूटांपेक्षाही खाली गेली आहे.’ नवाझ आपल्या गावच्या परिसराबद्दल बोलताना म्हणाला, माझ्या गावचा परिसर हा हरियाणा लगत आहे. इथे पाण्याची नेहमीच कमतरता असते. आता जर पाण्याची योग्य बचत केली नाही तर येणाऱ्या काळात पुढच्या पिढीला पाणीही मिळणार नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी भरपूर पाणी ठेवलेले. पण आपण मात्र त्याचे संवर्धन केले नाही. असेच चालू राहिले तर येणाऱ्या पिढीला आपण काय देणार?

नवाझुद्दीन सिद्दिकीची मुख्य भूमिका असलेला फ्रीक्री अली हा सिनेमा ९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अरबाज खान यांचीही मुख्य भूमिका यात आहे. सिनेमाची कथा ही गोल्फच्या अवती-भवती फिरणारी आहे. खेळाची आवड म्हणून क्रिकेटर, व्यवसायाने गँगस्टर आणि संधी मिळाल्यामुळे गोल्फपटू अशा वेगवेगळ्या भूमिका नवाजुद्दीन साकारताना दिसतो. अरबाज त्याच्या जवळच्या मित्राची भूमिका यात साकारत आहे. यात अॅमी जॅक्सन ही त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसेल.