Smita Patil Was most beautiful actress says Nawazuddin : विविध भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमधील वर्णभेदाबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. गेली २० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या या अभिनेत्याने त्वचेच्या रंगामुळे काही प्रोजेक्ट्ससाठी नकार मिळाल्याचंही सांगितलं होतं.

अलीकडील एका मुलाखतीत त्याने बॉलीवूडमधील सौंदर्याच्या ठराविक मापदंडांमध्ये आणि भेदभावाच्या वातावरणात स्वतःचा आत्मविश्वास कसा टिकवला, याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. तसंच, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यापेक्षा सुंदर व्यक्ती त्याने कधीच पाहिली नाही, असंही सांगितलं आहे. अभिनेता इंडस्ट्रीतील सुंदरतेच्या व्याख्येबद्दल आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलबद्दल काय म्हणाला सविस्तर जाणून घेऊयात…

७० आणि ८० च्या दशकातील सिनेमामुळे काही प्रमाणात बदल झाला. त्या काळात स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांसारख्या अभिनेत्री मोठे चेहरे म्हणून पुढे आल्या. तरीही मुख्य प्रवाहातील सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका करणारे कलाकार बहुतेक वेळा गोऱ्या रंगाचेच राहिले. इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारखे काही अपवाद त्यात पाहायला मिळाले. 

वर्णभेदाबद्दल काय म्हणाला अभिनेता?

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने आपण वर्णभेदाचा अनुभव घेतल्याचं सांगितलं आहे. मात्र, तरीही इंडस्ट्रीने आपल्याला स्वीकारलं, असंही त्यांने म्हटलं. हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाहीपेक्षा वर्णभेदाचा जास्त प्रभाव आहे, यालाही त्याने दुजोरा दिला. अभिनेता म्हणाला, “एक म्हण आहे, झुरळ मारलं तर लोक तुमचं कौतुक करतात. पण फुलपाखरू मारलं तर लोक प्रश्न विचारतात. अशी निवडक मानसिकता असते. भेदभावातही अशीच निवड दिसते. हे अनेक ठिकाणी आहे. सौंदर्य म्हणजे काय, हे कुणी ठरवू नये. प्रत्येक व्यक्तीला ते स्वतः ठरवू द्यावं.”

नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “आपल्या इथे ज्या अभिनेत्रीला सावळ्या वर्णाची मानलं जातं, तिला अनेकदा सामान्य समजलं जातं. पण पाश्चिमात्य देशांमध्ये तीच अभिनेत्री आकर्षक आणि वेगळी मानली जाऊ शकते. प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी वेगळी असते. पण त्याचा परिणाम संपूर्ण व्यवस्थेवर होता कामा नये. एखादी अभिनेत्री विशिष्ट दिसत असेल, तर तिला मुख्य भूमिकेसाठी घेतलं जात नाही. कथा ज्या पद्धतीने लिहिल्या जातात, त्यामुळेही असं होतं. गोऱ्या मुलीभोवती कथा लिहिल्या जातात. तसाच ब्रीफ दिला जातो. अनेक जण या समस्येशी झुंज देत आहेत.”

स्मिता पाटीलबद्दल काय म्हणाला नवाजुद्दीन?

नवाजुद्दीनने सांगितलं की, त्याच्या मते दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील या सर्वात सुंदर होत्या. तो म्हणाला, “सौंदर्याकडे पाहण्याचे अनेक पैलू असतात. कॅमेऱ्यात दिसणारं सौंदर्य वेगळंच असतं. माझ्या वैयक्तिक मतानुसार, स्मिता पाटील यांच्यापेक्षा सुंदर व्यक्ती मी कधीच पाहिली नाही. कॅमेऱ्याचं सौंदर्य वेगळं असतं आणि तेच टिपण्याची गरज असते.”