South’s Lady Superstar’s Luxury Home in Chennai : आपलं स्वत:चं घर असावं, असं अनेकांना वाटत असतं. अनेक जण त्यासाठी मेहनत करत असतात. अगदी सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद ठरत नाहीत. अनेक कलाकार मंडळींचे तर आलिशान घर, बंगले आहेत, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. अशातच आता लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीनंही नुकतंच कोट्यवधींच्या किमतीचं आलिशान घर खरेदी केलं आहे.

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिनं नुकतंच कोट्यवधींच्या किमतीचं आलिशान घर खरेदी केलं आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लेडी सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नयनतारानं दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार चेन्नईमध्ये हे नवीन आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. तिनं चेन्नईतील उच्चभ्रू पोएस गार्डन परिसरात ३१.५ कोटी रुपयांना एक आलिशान ड्युप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. प्रॉपर्टी नोंदणी कागदपत्रांनुसार ही माहिती Zapkey नं मिळवली आहे.

हे अपार्टमेंट तेयनमपेट येथील लेगसी या निवासी प्रकल्पाच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर आहे. कागदपत्रांनुसार या ड्युप्लेक्स अपार्टमेंटचं सुपर बिल्टअप क्षेत्रफळ १४,३६९ चौरस फूट आहे; तर जमिनीतील अविभाजित हिस्सा ५,३०८ चौरस फूट आहे. व्यवहाराच्या एकूण किमतीनुसार या प्रॉपर्टीची किंमत साधारणपणे प्रति चौरस फूट २१,९४६ रुपये इतकी ठरते.

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या माहितीनुसार या घराची खरेदी-विक्री नोंद (सेल डीड) १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली. या व्यवहारात Landmark Metro Projects Private Limited ही कंपनी विक्रेता म्हणून नमूद आहे. कागदपत्रांनुसार हे अपार्टमेंट अभिनेत्री नयनतारा आणि तिचे पती विग्नेश शिवन यांच्या संयुक्त नावावर आहे. या प्रॉपर्टीत नयनताराचा ९० टक्के हिस्सा आहे, तर विग्नेश शिवन (कागदपत्रांमध्ये विग्नेश्वर शिवकोलुंदू असे नाव नमूद) यांचा १० टक्के हिस्सा आहे. तसेच या अपार्टमेंटसोबत स्टिल्ट एरियामध्ये आठ राखीव कव्हर पार्किंग जागाही देण्यात आल्या आहेत.

रजनीकांत यांच्या शेजारी राहणार नयनतारा

पोएस गार्डन हा चेन्नईमधील सर्वांत प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू परिसरांपैकी एक मानला जातो. या भागात अनेक नामांकित व्यक्तींची घरं आहेत. त्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता-दिग्दर्शक धनुष ही मंडळी राहतात.

नयनताराची २०० कोटींची एकूण संपत्ती

या नव्या घराच्या खरेदीव्यतिरिक्त अभिनेत्री नयनताराकडे भारतभर अनेक प्रॉपर्टी आहेत. Magicbricks.com च्या माहितीनुसार हैदराबाद, चेन्नई व केरळमध्ये तिची घरं आहेत. केरळमधील तिचं पिढीजात घर राज्यातील सर्वांत आलिशान खासगी घरांपैकी एक मानलं जातं. तसेच हैदराबादमधील उच्चभ्रू बंजारा हिल्स परिसरात तिची दोन घरं असल्याचंही सांगितलं जातं. या प्रत्येक घराची किंमत साधारण १५ कोटी रुपये इतकी असल्याचं म्हटलं जातं. रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक गुंतवणुकींसह यशस्वी करिअरमुळे अभिनेत्री नयनताराची एकूण संपत्ती २०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती फायनान्शियल एक्स्प्रेसने दिली आहे.