scorecardresearch

“आज बाळासाहेब असते तर…,” क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

“आज बाळासाहेब असते तर…,” क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
"तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे…तुम्ही कधीच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे," असेही तिने या पत्रात म्हटले.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला होता. यानंतर आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. “एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय, तुम्ही योग्य तो न्याय करा,” अशी विनंती क्रांतीने उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.

क्रांती रेडकरचे संपूर्ण पत्र

माननीय उद्धव ठाकरे साहेब,

“लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये हे त्या दोघांनी शिकवलं…तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे…लढते आहे… सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत…

मी एक कलाकार आहे…राजनीती मला कळत नाही…आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लक्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे….विनोद करुन ठेवला आहे.

आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं….एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजाकारणांच किती नीच स्वरुप आहे, हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात…त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो…

तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आमि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे…तुम्ही कधीच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे… म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय….तुम्ही योग्य तो न्याय करा, अशी विनंती.”

आपली बहिण
क्रांती रेडकर

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडले आहेत. याप्रकरणी वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंच्या कुटुंबावर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. याप्रकरणी क्रांतीने पत्रकार परिषदे घेत आरोप आणि ट्विटरवरील पोस्टवर आक्षेप नोंदवला होता.

ट्विटरवरुन काल नबाव मलिक यांनी समीवर वानखेडेंचा जन्मदाखला आणि पहिल्या लग्नाचा फोटो पोस्ट केला होता. मात्र यावरुन क्रांतीने कालच सोशल मीडियावरुन स्पष्टीकरण दिलं होतं. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता क्रांती संतापली. आज काल बायका पण असं वागत नाहीत. हे किचनमधील पॉलिटिक्स, चोमडेपणा केल्यासारखं आहे. एक ट्विटरसारखं माध्यम आहे तर उद्या कोणीही उठून काहीही लिहील. आम्ही तुमचा सन्मान करतो. तर तुम्ही तसं वागा, असा खोचक सल्ला क्रांतीने नबाव मलिक यांना दिला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या