मुंबई-गोवा क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी आर्यन खानपाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांड्येच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवस एनसीबीने अनन्या पांड्येची ६ तास चौकशी केली. यानंतर एनसीबीने पुन्हा एकदा सोमवारी (२५ ऑक्टोबर) अनन्याला चौकशीसाठी बोलावलं आहे. एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. दरम्यान अनन्याने तिच्या मोबाईलमधील काही व्हॉटसअ‍ॅप चॅट्स डिलीट केले आहेत, असा संशय एनसीबीने व्यक्त केला आहे. त्यामुळे एनसीबीने तिचा मोबाईल फोन, लॅपटॉपसह ७ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चौकशीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले आहेत.

एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर ७ इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. या सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फॉरेन्सिक विभागाकडे चौकशीसाठी पाठवले गेले आहेत. फॉरेन्सिक विभागाकडून याचे विश्लेषण केले जाणार आहे. तिच्या मोबाईलद्वारे जुने चॅट्स तसेच इतर तपशील मिळतो का? याची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान अनन्याने चौकशीला येण्यापूर्वी काही मेसेज डिलीट केले आहेत, अशा संशय एनसीबीने व्यक्त केला होता. जर तिने हे मेसेज डिलीट केले असतील तर त्याचा तपास फॉरेन्सिक विभागाकडून केला जाईल. त्यासोबतच तिने जर काही फोन नंबर डिलीट केले असतील, तर तेही पुन्हा मिळवले जातील. त्यामुळे सध्या एनसीबी फक्त फॉरेन्सिक विभागाच्या अहवालाची वाट पाहत आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर येत्या सोमवारी अनन्याला या अहवालाच्या आधारे प्रश्न विचारले जातील, असं बोललं जात आहे.

सोमवारी पुन्हा चौकशी

मुंबई-गोवा क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. तर दुसरीकडे एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनन्या पांडेची ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. वडील चंकी पांडेंसोबत आलेल्या अनन्याची पहिल्या दिवशी गुरुवारी (२१ ऑक्टोबर) २ तास चौकशीनंतर, काल (२२ ऑक्टोबर) एनसीबीने पुन्हा ४ तास चौकशी केली.

अनन्या पांडेशी संबंधित ३ व्हॉट्सअॅप चॅट्स सर्वात महत्त्वाच्या ठरत आहे. 2018 ते 2019 च्या दरम्यान झालेल्या या चॅटमध्ये गांजाबाबत बोलणं झालंय. त्यामुळे एनसीबीने अनन्याचे दोन्ही फोन जप्त केलेत. एनसीबीकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर अनन्या गोंधळलेली पाहायला मिळाली. अनेक प्रश्नांची उत्तरं तर अनन्यानं व्यवस्थित आठवत नाही, असं म्हणत टाळले. एनसीबीने अनन्याला पुन्हा एकदा सोमवारी (२५ ऑक्टोबर) चौकशीसाठी बोलावलं आहे.