Neena Kulkarni 71st Birthday Celebration Video : मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कधी प्रेमळ आई तर कधी कणखर स्त्री अशा भूमिका साकारणाऱ्या नीना कुलकर्णी यांनी ७१ वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे रंगभूमीवरच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

नीना कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा रंगमंचावर प्रेक्षकांनी आणि त्यांच्या नाटकातील सहकलाकारांनी उत्साहामध्ये वाढदिवस साजरा केला. अनेक वर्षे रंगमंचावरील अभिनयामुळे प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या नीना कुलकर्णी यांच्यासाठी सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रेक्षकांनी आणि इतर सर्व कलाकरांनी नीना कुलकर्णींसाठी वाढदिवसाचे गाणे गाऊन उत्साहामध्ये वाढदिवस साजरा केला.

एवढं प्रेम अन् उत्स्फूर्त सदिच्छा – नीना कुलकर्णी

नीना कुलकर्णी या सध्या ‘असेन मी…नसेन मी…’नाटकाचे प्रयोग करत आहेत. त्यांच्याबरोबर शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांनीदेखील या नाटकात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या नाटकांचा युएस दौरा सुरू असून १५ ऑगस्ट रोजी नीना कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याबरोबर कॅप्शनमध्ये लिहिलं, एवढं प्रेम आणि एवढ्या उत्स्फूर्त सदिच्छा! कृतकृत्य झाले…,” अशा भावना नीना कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

नीना कुलकर्णींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सर्व प्रेक्षकांनी व कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने त्या आश्चर्यचकित झालेल्या दिसून आल्या. प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी त्यांच्यासाठी केक आणून रंगमंचावरच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अमृता सुभाष व शुभांगी गोखले यांनी त्यांना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नीना कुलकर्णी यांनी शेअर केलेला व्हिडीओ

दरम्यान, मराठी कलाविश्वामध्ये नीना कुलकर्णी यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विविध माध्यमांमध्ये त्यांनी काम केले असून हिंदी व इंग्रजी नाटकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्यांच्या ‘असेन मी…नसेन मी…’ नाटकाचे परदेशामध्ये प्रयोग सुरू आहेत.