नीतू कपूरच्या भावनांचा बांध फुटला; म्हणाल्या, ‘ते शेवटपर्यंत…’

नीतू कपूर यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या अश्रुंना वाट मोकळी केली आहे

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ वर्ष जगाचा निरोप घेतला. ३० एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती समजताच संपूर्ण कलाविश्वावर एकच शोककळा पसरली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यामध्येच ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनीदेखील एक पोस्ट शेअर करत त्यांच्या अश्रुंना वाट मोकळी केली आहे.

ऋषी कपूर यांनी अचानकपणे घेतलेल्या एक्झिटमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. तर कपूर कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या घरातील एक हरहुन्नरी व्यक्तीने एक्झिट घेतली आहे. यामध्येच त्यांची उणीव सतत घरातल्यांना जाणवत असून नीतू कपूर यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत शेवटच्या दिवसांमध्ये ऋषी कपूर कसे होते हे सांगितलं आहे.

“आमचे ऋषी कपूर यांनी आज सकाळी ८.४५ वाजता या जगाचा निरोप घेतला. ते ज्या रुग्णालयात होते तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, ऋषी शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाशी हसून-खेळून बोलत होते. या दोन वर्षांमध्ये त्यांनी आजारपणातही कायम चेहरा हसरा ठेवला. त्यांचं लक्ष कायम त्यांच्या कुटुंबाकडे, मित्र-परिवार, खाणं-पिणं आणि चित्रपटांकडे असायचं. त्यांच्या आजारपणात जे-जे त्यांना भेटले त्या साऱ्यांना कायम आश्चर्याचा धक्का बसायचा. हा माणूस एवढ्या आजारपणातही कसा काय इतका आनंदी राहू शकतो, असा प्रश्न त्यांना पडायचा. ते आजारपणातही कधी उदास झाले नाहीत”, असं नीतू म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

पुढे त्या म्हणतात, “चाहत्यांकडून त्यांना जे प्रेम मिळायचं ते पाहून त्यांना कायम आनंद व्हायचा. ते कायम म्हणायचे, जेव्हा मी जगाचा निरोप घेईन तेव्हा माझ्या चाहत्यांना माझा हसरा चेहरा आठवावा. माझे अश्रू नाही. सध्या देशात ज्या घडामोडी घडतायेत त्यामुळे अनेक नियम करण्यात आले आहेत. मात्र प्रत्येकाने या नियम, अटींचं पालन करा. माझी सगळ्या चाहत्यांना एकच विनंती आहे, त्यांनी या नियमांचं पालन करावं”.

दरम्यान, ऋषी कपूर यांची ३० एप्रिल रोजी प्राणज्योत मालवली. मुंबईतील मरीन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोजक्या जणांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Neetu kapoor post after husband rishi kapoor death ssj