हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक, मुकेश यांचा नातू आणि अभिनेता नील नितिन मुकेशला कन्यरत्न झालं आहे. मुंबईतील ब्रीच कॅडी रुग्णालयामध्ये नीलच्या पत्नीने रुक्मिणीने गुरुवारी एका मुलीला जन्म दिला.
रुक्मिणीने एका मुलीला जन्म दिल्यामुळे सध्या नीलच्या घरी आनंदाचं वातावरण पसरलं आहे. पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन येत असतं. त्यामुळे नील-रुक्मिणीदेखील आता हा नवा अनुभव घेण्यास सज्ज झाले आहेत.
‘हिंदुस्थान टाईम्स’नुसार, एप्रिल महिन्यामध्ये नीलने इन्स्टाग्रामवर तो लवकरच बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे मी आणि रुक्मिणी नवीन बाळाच्या आगमनासाठी सज्ज झालो असून आमच्यासाठी ही नवी सुरुवात असेल, असं नीलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
३४ वर्षीय नीलने २०१७ मध्ये रुक्मिणीबरोबर उदयपुर येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. विशेष म्हणजे त्यांचं लग्न हा चर्चेचा विषय ठरला होता. सध्या नील जरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसला तरी त्याचे काही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. ७ खून माफ, जॉनी गद्दार, आ देखें जरा, न्यू यॉर्क, प्लेयर्स आणि वजीर हे त्याचे काही गाजलेले चित्रपट आहेत.