अभिनेता नील नितीन मुकेश सध्या त्याच्या ‘जुनून’ या पहिल्या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या नील नितीन मुकेशने जवळजवळ दोन दशके यात घालवली आहेत. यशाव्यतिरिक्त,त्याने या वर्षांत वाईट दिवसदेखील पाहिले आहेत. त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, बॉलीवूडमधील वातावरण आजकाल खूप टॉक्सिक बनले आहे. लोक खूप निराश झाले आहेत.
दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नील नितीन मुकेश म्हणाला, “जेव्हा एखादा चित्रपट शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर चांगला चालत नाही, तेव्हा लोक उत्सव साजरा करतात. आजकाल इतरांना अपयश आलेले पाहून लोकांना आनंद होतो. जेव्हा तुम्ही अशा वातावरणात असता तेव्हा पुढे जात राहण्याशिवाय आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसतो. जर तुम्ही प्रयत्न करीत राहिलात, तर तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही.”
वातावरण कसे टॉक्सिक झाले आहे?
याबाबत उत्तर देताना नील म्हणतो, “हेच घडत आहे आणि परिस्थिती अशा पातळीवर पोहोचली आहे, जिथे सगळं टॉक्सिक वाटतं. मी हे खूप वेळा पाहिलं आहे आणि आजही पाहत आहे. माझ्यासाठी ही इंडस्ट्री एका कुटुंबासारखी आहे. किमान मला तरी पूर्वी असेच वाटत असे. जर आपण कोणासोबत काम करीत असू, तर आपण एकाच गटाचा भाग नाही का? एकमेकांच्या कामाचं कौतुक करणं आपलं कर्तव्य नाही का? पण आता तुमच्या कामाचं कौतुक करायला फोन येत नाहीत, फक्त तुमच्या जवळच्या व्यक्तीनं फोन केला तरच. पण, कोणीही तुमच्या तोंडावर कौतुक करणार नाही”.
नील हा गायक नितीन मुकेश यांचा मुलगा व दिग्गज गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलने ‘विजय’ चित्रपटात बालकलाकार म्हणून राजेश खन्ना आणि अनिल कपूरबरोबर काम केले होते. 1989 मध्ये गोविंदा आणि कादर खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जैसी करनी वैसी भरनी’ या चित्रपटातही तो दिसला होता. २००७ मध्ये ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटातून नील नितीन मुकेशने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०२४ मध्ये त्याला ‘हिसाब बराबर’मध्ये पहिले होते.
‘है जुनून’ वेब सीरिजचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करीत आहेत. या वेब सीरिजमध्ये नील नितीन मुकेशव्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिसदेखील आहे. १६ मे पासून जिओ हॉटस्टारवर त्याचा प्रीमियर होईल.