ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात क्रिस रॉकच्या कानशिलात लगावणाऱ्या विल स्मिथच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पत्नीच्या आजारपणीची खिल्ली उडवली म्हणून चिडलेल्या विल स्मिथनं कॉमेडियन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. ज्याची चर्चा जगभरात झाली. अर्थात या सर्व प्रकरणानंतर विल स्मिथनं क्रिसची माफी मागितली. मात्र त्याच्या या कृतीचे पडसाद वेगवेगळ्या स्वरुपात उमटताना दिसत असून आता विल स्मिथबाबत नेटफ्लिक्सनं मोठं पाऊल उचललं आहे.

९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथनं रागाच्या भरात केलेल्या या कृतीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रिपोर्टनुसार या घटनेनंतर नेटफ्लिक्सनं विल स्मिथच्याबाबत एक कठोर निर्णय घेत त्याचा आगामी चित्रपट ‘Fast and Loose’चं प्रोडक्शन थांबवलं आहे.

आणखी वाचा- सलमान- अक्षय- सैफ पोहोचले शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर, वाचा नेमकं काय घडलं

‘वॅराइटी’ने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्कर पुरस्कारांच्या एक आठवडा अगोदर दिग्दर्शक डेव्हिड लीच यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली होती. लीच यांनी हा प्रोजेक्ट सोडत रयान गॉसलिंग यांचा ‘Fall Guy’ हा प्रोजेक्ट निवडला. ज्याचं प्रोडक्शन येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान ऑस्कर सोहळ्यात घडलेल्या घटनेनंतर विल स्मिथनं ऑस्कर कमिटीचा राजीनामा दिला आहे आणि त्यानं होस्ट क्रिस रॉकची माफी देखील मागितली आहे.

आणखी वाचा- Video : अंकिता लोखंडे आहे गरोदर? कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्रीनं उघड केलं गुपित

अकादमीनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्मिथच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली असून येत्या १८ एप्रिलला होणाऱ्या आगामी बैठकीत विल स्मिथबाबत पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथनं पत्नी जॅडा पिंकेट स्मिथच्या केस गळतीच्या समस्येची खिल्ली उडवल्यानं चिडून क्रिस रॉकच्या कानशिलात लगावलं होतं. त्यानंतर त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना त्यानं प्रेक्षकांसमोर आपल्या या कृतीची माफी मागितली होती.