मुंबई : सध्याच्या डिजिटलच्या युगात मराठी प्रेक्षकांनाही डिजिटल मनोरंजनाची सवय लागलेली आहे. मात्र, त्या तुलनेत ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अजूनही मराठीतला दर्जेदार आशय उपलब्ध होत नाही, अशी खंत अनेकदा प्रेक्षकांकडून व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर नवनवीन मराठी कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्याच्या उद्देशाने ‘स्टेज’ या नव्याकोऱ्या ओटीटी माध्यमाची घोषणा नुकतीच करण्यात आली.
अंधेरीतील वेदा कुणबा थिएटरमध्ये पार पडलेल्या एका सोहळ्यात ‘स्टेज’ या मराठीतील अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा नुकतीच करण्यात आली. या सोहळ्याला ‘स्टेज’चे सह-संस्थापक प्रवीण सिंघल, ‘स्टेज’ ओटीटी मराठी आशय विभाग प्रमुख राजेश पाठक यांच्यासह मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. अभिनेते-दिग्दर्शक अनंत महादेवन, अभिनेता चिन्मय मांडलेकर, क्षितीश दाते, श्रेया बुगडे, ऊर्मिला जगताप, पुष्कर जोग, निशा परुळेकर यांच्यासारखी नामवंत कलाकार मंडळी यावेळी उपस्थित होती. यावेळी ‘स्टेज’वर दाखवल्या जाणाऱ्या मराठी कलाकृतींची घोषणाही करण्यात आली. २०१९ मध्ये स्थापन झालेले ‘स्टेज’ हे भारतातील पहिले बोलीभाषा आधारित ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हरयाणवी, राजस्थानी, भोजपुरी आणि गुजराती भाषेनंतर आता ‘स्टेज’च्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना त्यांच्या मातीतील, त्यांच्या बोलीभाषेतील दर्जेदार आणि कौटुंबिक आशय पाहायला मिळणार आहे.
‘आम्ही मराठीत प्रवेश करीत असल्याचा खूप आनंद आहे. आपल्याला बोलीभाषेतून गोष्टी सांगायला, पाहायला आणि ऐकायला आवडतात. घरी जेव्हा आपण कुटुंबीयांसोबत बोलतो तेव्हा कोणताही आडपडदा नसतो. अशाच प्रकारे कोणताही आडपडदा न ठेवता जेव्हा रसिकांशी भेट घेतली जाते तेव्हा त्यात एक आपलेपणा जाणवतो. आपल्या संस्कृतीसाठी काहीतरी करायला हवे या विचारातून आम्ही ‘स्टेज’ची स्थापना केली. इतर भाषांमध्ये यशस्वी झाल्यानंतर मराठीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास खूप संघर्षमय आहे’ असे ‘स्टेज’चे सह-संस्थापक प्रवीण सिंघल यांनी सांगितले. १ मेपासून ‘स्टेज’ ही नवीन ओटीटी वाहिनी सुरू झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘आजच्या डिजिटल युगात ‘स्टेज’ हे खऱ्या अर्थाने मराठीतील विविध बोलीभाषांमधील कलाकृतींसाठी व्यासपीठ देणार आहे. महाराष्ट्रातील विपुल साहित्य, कथाकार, रंगकर्मी यांच्यासाठी स्टेज हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे’ असे ‘स्टेज’चे मराठी आशय विभागप्रमुख राजेश पाठक यांनी सांगितले. या नव्या व्यासपीठावर ‘इलू इलू १९९८’, ‘सखे गं साजणी’, ‘डेटिंग सेटिंग’, ‘प्लस मायनस’, ‘प्रेमाचा तमाशा’, ‘पहिलं प्रेम’, ‘माझीवाली लव्हस्टोरी’ अशा नवीन कलाकृती पाहायला मिळणार आहेत. ‘डेटिंग सेटिंग’मध्ये क्षितीश दाते आणि श्रेया बुगडे मुख्य भूमिकेत आहेत.
