एफटीआयआय म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेले अभिनेते अनुपम खेर यांनी नुकतीच एफटीआयआयला सरप्राईज व्हिजिट दिली आहे. त्यांनी या भेटीबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच माहिती दिली नव्हती. मुख्य म्हणजे अध्यक्षपदी असलेल्या खेर यांनी एफटीआयआयच्या प्रांगणात विद्यार्थांशी मोकळेपणाने संवादही साधला. विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

खेर यांनी एफटीआयआयला जात असल्याचं कोणालाच कळू दिलं नाही. पण, त्यांनी ‘बॅक टू द फ्यूचर’ असं म्हणत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन लाइव्ह जात अनेकांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सुरुवातीला खेर नेमके कुठे जात आहेत याचा अंदाज आलाच नाही. पण, नंतर मात्र नेटकऱ्यांनी त्याची वाट ओळखत ते नेमके कुठे जात आहेत, याविषयी अचूक अंदाज बांधण्यास सुरुवात केली. १९७८ मध्ये ज्या ठिकाणी मी शिकलो होतो, ज्या संस्थेने माझ्या अभिनय कारकिर्दीचा पाया रचला होता त्याच ठिकाणी मी आज जात आहे, असं ते या व्हिडिओत म्हणाले.

एफटीआयआयच्या मुख्य सभागृहात खेर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांशी हितगुज केल्यानंतर खेर यांनी माध्यमांशीही संवाद साधला. त्यांची ही सरप्राईज व्हिजिट विद्यार्थ्यांसाठीही खूप खास होती. त्याविषयीच एक विद्यार्थी म्हणाला, ‘विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या, मागण्या आणि त्यांचे प्रश्न पटण्याजोगे असून त्याविषयी संचालकांशी चर्चा करत या समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. एका दिवसात सर्व समस्या, अडचणी मार्गी लागतील असं नाही. पण, आम्ही या साऱ्याकडे जातीने लक्ष देऊ, असंही ते म्हणाले.’

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’