बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आजवर अनेकदा घराणेशाहीवर वक्तव्य करत स्टार किड्सला फटकारले आहे. आता कंगना पाठोपाठ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माने स्टारकिड्सला सुनावले आहे. इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टारकिड्सवर तिने निशाणा साधला आहे. 'जर त्यांच्या नावातील आडनाव हटवले तर यांना कुणी पाहणार पण नाही' असे नियाने म्हटले आहे. नियाने नुकतीच आरजे सिद्धार्थ कननच्या शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान तिने स्टारकिड्स आणि तिच्या पदार्पणाबाबत काही गोष्टी सांगितल्या. गेल्या एक दशकापासून निया इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण तिला अद्याप कोणत्याही चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. चाहते देखील नियाला चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सिद्धार्थ कननशी बोलताना निया म्हणाली, 'कोणीही मला येऊन मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार नाही असे सांगून जाते. पण जेव्हा बॉलिवूडमध्ये एखादा स्टारकिड पदार्पण करतो तेव्हा त्याचा चेहरा पाहून तो पदार्पणास तयार असतो का? जे लोक मला पाहतात, त्यांनी कधी त्या स्टार किड्सला पाहिले आहे का? मला माफ करा, पण मला कोणी येऊन सांगू नका की मी बॉलिवूड पदार्पणसाठी तयार नाही' असे निया म्हणाली. पुढे निया म्हणाली, 'आपण सर्व पाहात आहोत की ती लोक कोण आहेत, त्यांच्यासाठी हे चांगले आहे. ते काम करत आहेत आणि त्यांच्याकडे चित्रपट देखील आहेत. पण जर तुम्ही यांचे आडनाव हटवले तर यांना लोक पाहतील का? मला माफ करा, पण हे सत्य आहे. ते चांगलं करत आहेत आणि हे त्यांच्यासाठी चांगले आहे.'