निलेश साबळे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून त्याने अनेक वर्षे प्रेक्षकांना पोट धरुन हसवलं. आता गेल्या काही दिवसांपासून तो प्रेक्षकांना टीव्हीवर जरी पाहायला मिळत नसला तरी येत्या काळात अभिनेता लवकरच नवीन कलाकृतीमधून मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. याचदरम्यान निलेश साबळेने अभिनेता रितेश देशमुख ज्याच्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ हा शो निर्माण झाला त्याच्याबरोबर काम करण्याबद्दल आणि त्याच्याबद्दल भाष्य केलं आहे.
निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’मार्फत मराठीसह हिंदीतीलही अनेक मोठ मोठ्या सेलिब्रिटींबरोबर संवाद साधला आहे, काम केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे रितेश देशमुख. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने रितेशबद्दल बोलताना त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. यावेळी त्याने रितेश देशमुखलाही कॉमेडी खूप आवडतं आणि त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे.
रितेश देशमुखबद्दल निलेश साबळे काय म्हणाला?
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्याला रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटामुळे ‘चला हवा येऊ द्या’ची सुरुवात झाली याबद्दल संवाद साधत असताना असताना त्याला रितेशने कधी एकत्र काम करण्यासाठी विचारणा केली का, यानिमित्त कधी त्यांने किंवा तू फोन केलेला का असा प्रश्न विचारल्यानंतर निलेश साबळे म्हणाला, “नाही. तसा फोन नाही झाला. कधीतरीच फोनवर बोलणं होतं त्यांना काही आवडलं तर ते आवडलं डॉक्टर मला ते तुम्ही छान केलं असं फोन करुन बोलतात किंवा मला कधी काही शुभेच्छा द्यायच्या असतील तर फोन करतो”.
रितेशबद्दल बोलताना निलेश साबळे पुढे म्हणाला, “पण मी जर असं काही विचारलं तर कदाचित ते हो म्हणतील. कारण त्यांना एकतर कॉमेडी खूप आवडतं आणि त्यांची विनोदबद्धी कमाल आहे. त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं तर होईलही.” निलेश साबळेने पुढे सांगितलं की ‘चला हवा येऊ द्या’ ही कल्पनाच त्यांची होती. त्यामुळे आम्ही एकत्र काम केलं तर नक्कीच त्यांना ते आवडेल.
दरम्यान, निलेश साबळेने या मुलाखतीत येत्या काळात लवकरच त्याचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचं बरचसं काम झालेलं आहे आणि या चित्रपटात लोकप्रिय कलाकार असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
