आजही चित्रपटसृष्टीमध्ये ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचं नाव आदराने घेतलं जातं. १३ जुलै २००९ रोजी निळू फुले यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर १४ वर्षांचा काळ लोटला तरी निळू फुले यांच्या आठवणी कायम आहेत. निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाक्षेत्रामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि आता त्या मराठीमधील एक उत्तम अभिनेत्री आहे. मराठी मालिकांमध्ये उत्तम काम करत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री गायत्री दातारच्या आईची भूमिका गार्गी फुले यांनी साकारली. आता अभिनयाबरोबरच गार्गी यांनी राजकारणात यायचं ठरवलं आहे. गार्गी फुले यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये गार्गी फुले यांनी पक्षप्रवेश केला आहे.
आणखी वाचा : विवेक ओबेरॉयमुळे अपूर्व लाखियाला पत्करावा लागला चित्रपटसृष्टीचा रोष; खुद्द दिग्दर्शकानेच केला खुलासा
‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार पक्षात प्रवेश केल्यावर गार्गी म्हणाल्या, “मला बऱ्याच दिवसांपासून अजित पवार यांच्यासह काम करायची इच्छा होती. या पक्षाचे विचार आणि माझ्या बाबांचे विचार फारच मिळते जुळते आहेत, त्यामुळे माझ्या वडिलांच्या विचारांना राष्ट्रवादी कॉँग्रेस न्याय देईल.” इतकंच नव्हे तर मुख्य प्रवाहात येऊन काम करण्यासाठी त्या फार उत्सुक आहेत.
गार्गी फुले यांनी स्त्रीमुक्ती या विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. अभिनयाचे संस्कार तर त्यांच्यावर वडिलांनीच केले आहेत. सत्यदेव दुबे यांच्याकडून गार्गी यांनी अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.