ज्यांच्या खलनायकीला कसलीच तोड नव्हती, ज्यांना पडद्यावर खलनायकेचा दरारा निर्माण करण्यासाठी कधीच डायलॉगची गरज भासली नाही असे निळू फुले यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायक हा विषय आला की डोळ्यासमोर उभे राहतात ते सरपंच निळू फुले. त्यांच्या डोक्यावरील सावकारी टोपीला कधी आराम नव्हता ! असे हे अवघ्या महाराष्ट्राच्या ‘सरपंच’ असलेले आपले लाडके अभिनेते ‘निळू फुले’. नाटकापासून आपल्या अभिनयाला सुरवात करणारे नीलकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू भाऊ फुले यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांना प्रेक्षक निळूभाऊ नावानेच ओळखत होते. १९६८ मध्ये रिलीज झालेल्या ‘एक गाव बारा भानगडी’ चित्रपटातून त्यांनी फिल्मी करिअरची सुरवात केली. यानंतर मात्र या महान नटाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. यशाचा आलेख हा चढताच राहिला. मग त्यात त्यांनी १९७२ मध्ये केलेला ‘सखाराम बाईंडर‘ असो किंवा ‘सूर्यास्त‘ असो ! यासारख्या एकापेक्षा एक सरस असा भूमिका केल्या.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

२५ जुलै १९३१ रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. अगदी सर्व सामान्य कुटूंबात त्यांचं लहानपण गेलं. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत त्यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्यामुळे निळू फुलेंचं शिक्षण फक्त मॅट्रिकपर्यंतंच झालं. त्यानंतर निळूभाऊंनी पुण्यातील लष्करी महाविद्यालयात माळीकाम करायला सुरुवात केली. या माळीकामात निळूभाऊंचं मन इतकं रमलं की पुढे जाऊन त्यांना स्वतःची नर्सरी सुरु करायची होती. मात्र आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही.

निळुभाऊंचा पहिला पगार हा केवळ ८० रूपये इतकाच होता. त्या पगारातून निळूभाऊ १० रुपये राष्ट्रीय सेवा दलाला देत असत. १९५७ च्या सुमारास महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोर धरत होता. तेव्हा निळूभाऊंनी राष्ट्रीय सेवा दलालामार्फत एक वगनाट्य लिहिलं. ते वगनाट्य होतं. ‘येड्या गबाळाचं काम नव्हे!‘ यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. यानंतर निळूभाऊंनी माळीकाम सोडून दिलं आणि अभिनय क्षेत्राकडे त्यांनी त्यांचा मोर्चा वळवला.

Nilu-Phule-Death-Anniversary-dialogues

त्यानंतर ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘जैत रे जैत’, ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘वो 7 दिन’, ‘कुली’, ‘मशाल’, ‘सारांश’ असे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट गाजले. निळू फुले यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस ते ग्रे शेड अभिनेता बनले होते. एरवी ‘मास्तर’ या शब्दांत काय आहे? कुणीही म्हणावं असा शब्द. पण तोच शब्द जेव्हा निळू फुलेंच्या तोंडातून येतो, तेव्हा त्यातली खोली आणि त्या शब्दाला असलेल्या भयाचं वलयही स्पष्ट जाणवतं. निळूभाऊंच्या घोगर्‍या, बसक्या आवाजातून फुटणारा हा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणार्‍या तटस्थ प्रेक्षकाच्या मनालाही भयाच्या कवेत घेऊन यायचा. त्यांची बेरकी नजर प्रेक्षकांच्याही आरपार जायची. हीच नजर, सूचक हावभाव नि संवाद हे निळूभाऊंचं बलस्थान खरंच. पण तरीही त्यांच्यात असं काही तरी होतं, ज्यामुळे त्यांच्या खलनायकी भूमिका इतक्या नावाजल्या गेल्या.

‘खलनायक’ हा शब्द निळूभाऊंसाठी मोठीच मर्यादा घालून बसला. वास्तविक ‘सिंहासन’मध्ये पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारणार्‍या निळूभाऊंनी विविधांगी व्यक्तिरेखा बर्‍याच केल्या, पण त्यांच्यावर प्रभाव या खलनायकी व्यक्तीरेखांचाच जास्त पडला. त्याचा परिणाम त्यांच्यातल्या अष्टपैलू अभिनेत्याभोवती मर्यादांचे रिंगण आखण्यात झाला. तरीही त्यांच्या खलनायकी भूमिकांचा प्रभाव इतका का पडला हा प्रश्न उरतोच.

Nilu-Phule-Death-Anniversary-dialogues-Film

खऱ्या आयुष्यात अतिशय साधा आणि सरळ स्वभाव असलेले निळूभाऊ पडद्यावर मात्र ‘नायिकांवर’ अत्याचाराच्या भूमिका साकारू लागले. कारण ‘खलनायक’ या भूमिकेला न्याय देणं हे त्यांच्या इतकं कुणाला जमायचं नाही. अशाच वेळी निळूभाऊंचा ‘बाई वाड्यावर या…’ हा डायलॉग इतका काय गाजला की, जोवर मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी श्रोते आहेत तोवर हा डायलॉग कुणीच विसरणार नाही. निळूभाऊंच्या अशा नायक-नायिकांवर चित्रपटात केलेल्या अन्यायी भूमिकेमुळे चित्रपट चाहते त्यांचा तिरस्कार करू लागले. मात्र हीच त्यांच्या अभिनयाची पावती होती की जी प्रेक्षांकडून त्यांना शेवटपर्यंत मिळत गेली.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा निळूभाऊंच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर मात्र प्रेक्षकांना निळूभाऊ पुन्हा रंगमंचावर कधीच दिसले नाहीत. अखेर १३ जुलै २००९ रोजी निळूभाऊंनी शेवटचा श्वास घेतला आणि आपल्या सर्वांचा निरोप या महान कलाकाराने घेतला.