‘प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ’ असं सांगणार्‍या अभिनेत्री निर्मिती सावंत आपल्या माहेरी म्हणजेच रंगभूमीवर परतल्या आहेत. ‘नाटक म्हणजे माझं माहेर. मधल्या काळात चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने नाटक करायला वेळ मिळत नव्हता. आता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी या दोन कलाकारांचं निर्माता म्हणून नाटकाशी जोडलं जाणं, अष्टविनायक या निर्मितीसंस्थेबरोबर असलेले अनेक वर्षांचे ऋणानुबंध आणि कलाकार-तंत्रज्ञांची जमून आलेली उत्तम भट्टी या वेडेपणाच्या जोरावर ‘लाडकी विहीण योजना’ रसिकांना नक्कीच खुश करेल’, असं आश्वासनही निर्मिती सावंत यांनी दिलं आहे.

अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंट निर्मित ‘लाडकी विहीण योजना’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले. आहे, तर दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. ‘अष्टविनायक’ संस्थेचे निर्माते दिलीप जाधव यांच्यासोबत नाटक करताना अनेकवेळा त्यांच्याकडे दिग्दर्शन आणि निर्मितीची इच्छा व्यक्त केली होती. योग्यवेळी तुला संधी देईन, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

आज या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी मला ही संधी दिली, असं सांगत पंचशील एन्टरटेन्मेटच्या वतीने अभिनेता प्रसाद ओक यांनी अष्टविनायकच्या दिलीप जाधव यांचे आभार मानले. तर प्रसादबरोबर सहनिर्माता असलेल्या अभिनेता स्वप्नील जोशीनेही अष्टविनायक म्हणजे उत्तम आणि सकस नाटक हे अधोरेखित होतं, अशा शब्दांत कौतुक करत निर्माता म्हणून ‘लाडकी विहीण योजना’ या नाटकाशी जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

 ‘मी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शोधात असतो. या नाटकाची  संहिता मला दमदार वाटली. मी खात्रीने सांगू शकतो की हे नाटक दोनशेहून अधिक प्रयोगांची मजल मारेल’ असा विश्वास निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केला. ‘पहिलं सगळं प्रत्येकासाठी नेहमीच खास असतं. एवढ्या सगळ्या मातब्बर मंडळींसोबत माझं पाहिलं व्यावसायिक नाटक येतंय याहून स्पेशल काही असू शकत  नाही, अशी भावना लेखक प्रथमेश शिवलकर यांनी बोलून दाखविली. तर दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनीही या नाटकामागे भक्कमपणे उभ्या असलेल्या मंडळींचं कौतुक केलं.

निर्मिती सावंत यांच्यासोबत स्नेहा रायकर, पूर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कर्‍हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकार मंडळी यात आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग गुरुवारी, ५ मार्च रोजी दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे,  ६ मार्चला दु. ४. ०० वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे,  शनिवार, ७ मार्चला दु. ४. ०० वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे तर  रविवार, ८ मार्चला दु. १. ०० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे होणार आहेत.