आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या धमाकेदार टीझरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवून ठेवली होती. मात्र महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता या चित्रपटाचे शिर्षक गीत प्रदर्शित झाले आहे.

“खेळू झिम्मा गं…” हे या गाण्याचे बोल असून या मोन्टाज सॅान्गचे शब्द आणि चाल संगीतप्रेमींना थिरकवणारे आहे. ट्रेलरमध्येच या गाण्याची झलक आपण पाहिली आणि ऐकली आहे. हे उत्स्फुर्तदायी गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हे गाणे ऐकताना आपल्याला आपल्या सहलीची आणि मैत्रीची आठवण आल्यावाचून राहणार नाही.

अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे. ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.