कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय… त्यामध्ये विशिष्ट क्षेत्रात असणारी प्रतिष्ठा आणि त्यामुळे असलेली आयुष्यातील सुरक्षितता. या सगळ्या गोष्टी पायाशी लोळण घेत असताना तुम्ही त्या सोडून द्यायचा विचार कराल का? पण एक अवलिया आहे जो या आखलेल्या मार्गावर चालायचे सोडून त्याने स्वतःची वेगळी वाट धरली आहे. या वाटेवर चालणं सोपं नसलं तरी त्याला ती खडतर वाटच आपलीशी वाटत आहेत. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ‘टीबीझेड’ ज्वेलर्स अर्थात त्रिभूवनदास भिमजी झवेरी कुटुंबातील निश्चल झवेरी. निश्चलला संगीत क्षेत्रात काम करायचे आहे. नुकतेच त्याने जिया ओ जिया या सिनेमाला संगीत दिले असून आगामी बॉलिवूड सिनेमांसाठीही तो संगीतकार म्हणून काम करणार आहे. त्याला त्याचे काम फक्त बॉलिवूडपुरताच मर्यादीत न ठेवता म्युझिकवर अधिक लक्ष द्यायचे आहे. त्यामुळेच ज्या सिनेसृष्टीत चांगली संधी उपलब्ध होईल तिथे काम करण्याची त्याची पूर्ण तयारी आहे.

घरात लहानपणापासून त्याने सोन्याचे कोट्यांवधींचे व्यवहार होताना पाहिले. पण त्याचं मन सोन्यात रमण्यापेक्षा पियानोच्या बटणांवरच रमेली. अमेरिकेत इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत असताना निश्चलला हा आपला प्रांत नाही याची जाणूव झाली. त्यामुळे या शिक्षणात अधिक वेळ घालवण्यापेक्षा संगीतातच शिक्षण घेऊ असे त्याने ठरवले. दरम्यान अमेरिकेतील इंजिनिअरींगचे शिक्षण अर्धवट सोडून तो मायदेशी परतला. भारतात आल्यानंतर त्याने निश्चलने ए. आर. रेहमान अकादमीमधून पिआनोचे शिक्षण घेतले. याआधी त्याने भारतीय शास्त्रीय संगीताची रितसर तालीमही घेतली आहे. निश्चलने किराणा घराण्याचे उस्ताद मुबारक अली खान यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. यानंतर पुन्हा लॉस एंजेलिसला जाऊन ‘लॉस एंजेलिस म्युझिक अकादमी’मध्ये (लामा) म्युझिक प्रोडक्शनमध्ये पदवी संपादन केली.

निश्चलने जेव्हा संगीतात करिअर करण्याचा निर्णय घरच्यांना सांगितला तेव्हा झवेरी कुटुंबियांनीही त्याला संपूर्ण सहकार्य केले. निश्चलने सांगितले की, त्याच्या आई- बाबांनी, घराण्याकडून जे काही मिळालं त्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची शिकवण नेहमीच दिली. त्यामुळेच इंजिनिअरींगचे शिक्षण मध्यावर सोडून देतानाही झवेरी कुटुंबयांनी त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यामुळे संगीत क्षेत्रात शुन्यापासून सुरू करावे लागत असले तरी निश्चलची पूर्ण तयारी आहे. निश्चलचा गोरेगावमध्ये स्वतःचा ‘एन्जी’ स्टुडिओ आहे. नुकतेच निश्चलने ‘जिया ओ जिया’ सिनेमाला संगीत दिले असून अनेक ‘थम जा’, ‘राख जले’ आणि ‘अश्कों का कारवां’ ही गाणी गायली आहेत.
– मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com