करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन सृष्टीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. हे आर्थिक नुकसान लॉकडाउन उठवल्यावरही भरुन निघणार नाही. किंबहूना चित्रीकरणाची शैलीच पूर्णपणे बदलून जाईल असा दावा दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केला आहे.

PTIला दिलेल्या मुलाखतीत नितेश यांनी चित्रीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेवर गप्पा मारल्या. ते म्हणाले, “कुठल्याही चित्रपटाच्या किंवा मालिकेच्या चित्रीकरणात अनेकदा शेकडो लोक एकाच ठिकाणी हजर असतात. यामध्ये कॅमेरामॅनपासून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो. परंतु भविष्यकाळात ही गर्दी पाहायला मिळणार नाही. कारण अशा गर्दीत सोशल डिस्टन्सिंग नियम पाळणं शक्य होणार नाही. काही ठराविक लोक सेटवर हजर असतील आणि बाकिचे व्हर्चुअली कनेक्टेड असतील. दिग्दर्शक देखील व्हिडीओ कॉलव्दारे चित्रपटाचं दिग्दर्शन करताना दिसेल. पटकथा लेखक, संगीतकार, कॅमेरा टीम, एटिटर्स, टेक्निशियन यांच्यासोबत होणाऱ्या मिटिंग्स यापुढे व्हिडीओ कॉलव्दारे होतील. अशा प्रकारे संपूर्ण चित्रीकरणाची शैली बदलेल.” असा दावा नितेश तिवारी यांनी केला आहे.

नितेश तिवारी बॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर ‘चिल्लर पार्टी’, ‘पंगा’, ‘छिछोरे’, ‘दंगल’, ‘भूतनाथ रिटर्न’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. लॉकडाउनच्या निमित्ताने PTIशी केलेल्या चर्चेत त्यांनी चित्रपटांच्या भविष्यकाळाविषयी भाकित केले.