महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे सारस्वत खाद्यसंस्कृती. सारस्वतांकडे विविध पद्धतीचे मासे आणि मासांहाराचे प्रकार बनवले जातात. त्यांचं शाकाहारी जेवणसुद्धा अगदी चविष्ठ असतं असं म्हटलं जातं. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीसुद्धा याबद्दल सांगितलं आहे.
निवेदिता सराफ यांना अभिनयासह स्वयंपाकाची, बेकिंगचीही विशेष आवड आहे. त्या अनेकदा त्यांच्या रेसिपी व्हिडीओ शेअर करत असतात.अशातच आता नुकतंच त्यांनी एका सारस्वत पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या पदार्थाची रेसिपी सागंत त्या त्याचे पती अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी कोणता पदार्थ बनवतात आणि त्या स्वयंपाक करायला कोणाकडून शिकल्या याबद्दल सांगितलं आहे.
सारस्वत किचनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. यामधून त्यांनी त्या त्यांच्या जाऊबाई तसेच अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या आईकडून आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून त्या स्वयंपाक करायला शिकल्या आहेत असं सांगितलं आहे. प्रत्येकाकडून वेगवेगळे पदार्थ शिकत शिकत त्या स्वयंपाक करायला शिकल्या असं म्हणत त्यांनी त्यांच्या या आवडीबद्दल सांगितलं आहे.
निवेदिता सराफ यांच्या घरी बनतात हे सारस्वत पद्धतीचे पदार्थ
घरी कोणता सारस्वत पदार्थ हमखास बनवला जातो असं विचारल्यानंतर निवेदिता म्हणाल्या, “आता श्रावण आला आहे. जेव्हा गणेश चतुर्थी असते तेव्हा कैरीची उदडमेथी, आबंट बटाटा, सासव हे पदार्थ बनतात. फणसाचे काप असे शाकाहारी पदार्थ बनतात. त्यानंतर मांसाहारामध्ये कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण आमच्याकडे सगळ्यांना प्रचंड आवडतं. सुकटीची किस्मुर बनते, तशी ओल्या बांगड्याची किस्मुरही बनते कारण जरा सुखं मी अशोकला कमी खायला देते. निरफणसाचे, सुरणाचे काप हे मांसाहार न खाणाऱ्यांसाठी करायचे.”
निवेदिता सराफ यांना आवडतात हे पदार्थ
पुढे निवेदिता सराफ यांनी त्यांच्या आवडत्या पदार्थांबद्दल सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “मला कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, मुळा घातलेली कोलंबीची आमटी प्रचंड आवडते आणि कुठलाही फ्राय केलेला मासा, बांगड्याचं लोणचं मला आवडतं.”
निवेदिता पुढे म्हणाल्या, “मला नाचणीचं सत्त्व, काकडीचं धोंडस. आता गोड खायचं नाही म्हणून मी त्याची इडली करते. रेसिपी तशीच आहे फक्त आलं वगैरे घालून त्याच्या इडल्या करते. सारस्वत पद्धतीचे सगळे पदार्थ आवडतात.” पुढे त्यांनी त्यांच्या माहेरी कोणते पदार्थ बनतात याबद्दलही सांगितलं आहे. याबद्दल त्या म्हणाल्या, “आमच्याकडे गोड्या वटाण्याची आमटी, भोपळ्याचे घारगे असे पदार्थ बनतात.मी आयुष्यात पहिल्यांदा भोपळ्याचे घारगे बनवले होते. मला लहानपणी पुरणाची पोळी आवडायची नाही. मग माझी आई बर्फीची पोळी करायची.”
