‘रामायण’ पाहून कोणी ‘राम’ बनत नाही, की ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ पाहून कोणी ‘गांधी बनत नाही, असे वक्तव्य केले आहे बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने. सिरीयल किलर चार्ल्स शोभराज याच्या जीवनावर आधारित आगामी ‘मैं और चार्ल्स’ चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
झाले असे की, ‘मैं और चार्ल्स’ हा चित्रपट पाहून कोणी गुन्हेगारीकडे वळले तर? असा प्रश्न रणदीपला विचारण्यात आला होता. त्यावर रणदीप म्हणाला की, आम्ही या चित्रपटातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण केलेले नाही. हा चित्रपट पाहिल्यावर देशातील तरुण चुकीच्या मार्गाला जातील असे मला वाटत नाही. ‘रामायण’ पाहिल्यावर कोणी ‘राम’ बनलं नाही की, ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ पाहिल्यावर कोणी ‘गांधी’ बनलं नाही. मग हा चित्रपट पाहिल्यावर कसं कोणी चार्ल्स बनू शकेल?  ‘मैं और चार्ल्स’  चित्रपट केवळ मनोरंजनासाठी आहे. या आणि चित्रपट पाहून त्याचा आनंद घ्या.
रणदीपने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून, अगदी लहानपणापासून तो चार्ल्स शोभराज यांच्याबद्दल वाचत आलेला आहे. ‘मी १०-१२ वर्षांचा होतो तेव्हा वर्तमानपत्रात चार्ल्सबद्दल वाचले होते. तो फार ग्लॅमरसही होता. अमिताभ बच्चन यांनादेखील त्याचा फायदा झाला आहे. ‘डॉन’ चित्रपटातील “११ मुल्को की पोलीस मुझे ढूँढ रही है..” या डायलॉगची प्रेरणा शोभराज यांच्या जीवनामुळेचं मिळाली होती,’ असे रणदीप म्हणाला.
चार्ल्स शोभराज सध्या नेपाळ येथील तुरुंगात कैद आहे. १९७० साली त्याने केलेल्या खूनांची शिक्षा तो भोगतोय. चार्ल्सच्या आयुष्याची रंजक कथा दिग्दर्शक प्रावल रमण ‘मैं और चार्ल्स’ या चित्रपटाद्वारे ३० ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत.