ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट प्रदर्शित होणं हा एक इव्हेंट असतो. चित्रीकरणादरम्यानचे किस्से, तो मोठ्या पडद्यावरच पाहावा ही नोलनची प्रेक्षकांकडून अपेक्षा अशा अनेक गोष्टी त्याच्या प्रसिद्धीत अंतर्भूत असतात. आणि या वेळी तर होमरच्या ‘ओडिसी’लाच, म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीतल्या अभिजात साहित्यकृतीला त्यानं हात घातल्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे.

होमरचा महानायक ओडिसियस ट्रोजन युद्धात पराक्रम गाजवल्यानंतर घरी परत जाण्याचा प्रयत्न करतो. त्यात आलेले अडथळे आणि त्यांवर त्यानं कशी मात केली हे ‘ओडिसी’त आहे. ‘ओडिसी’शी परिचय होण्यासाठी ती वाचायलाच हवी असं नाही. विविध कसोट्यांशी सामना करून प्रगल्भ होत गेलेल्या त्याच्या नायकाचा प्रवास (‘हीरोज जर्नी’) इतर कथांद्वारेही आपल्यापर्यंत पोचलेला असतो. ‘स्टार ट्रेक,’ ‘स्टार वॉर्स,’ ‘हॅरी पॉटर,’ ‘ॲव्हेंजर्स’ अशा अनेक कथांवर ‘ओडिसी’चा प्रभाव आहे. नोलनच्या आधीच्या चित्रपटांवरही ‘ओडिसी’मधल्या कथनघटकांची छाया दिसते. त्याच्या ‘इंटरस्टेलर’ किंवा ‘इन्सेप्शन’मधले नायकही घरी परत जाऊ पाहतात. त्याचा ‘ओपनहायमर’ अशक्य ते शक्य करतो, पण प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राहतो. मग होमरच्या ह्या महाकाव्याला नोलननं पडद्यावर कसं आणलं आहे?

तीन तासांचा चित्रपट करूनही मूळ संहितेतले सगळे प्रसंग त्यात आणणं अशक्य आहे. त्यामुळे नोलन त्यात काटछाट करणार हे उघडच आहे. दिग्दर्शकाला अभिप्रेत अर्थानुसार बदल करण्याचं स्वातंत्र्यही असावंच. पण मग त्यातून मूळ साहित्यकृतीतला आशय कितपत पोचतो ह्याची चर्चा होणंही स्वाभाविक आहे. तसाच एक प्रयत्न ह्या लेखात आहे.

नोलनची आतापर्यंतची कारकीर्द पाहता मोठ्या पडद्यावरचा एक नेत्रदीपक आणि चित्तथरारक अनुभव तो साकारणार हे अपेक्षित होतं. ही अपेक्षा तो पूर्ण करतो. चित्रपटाचा आशय काही मुद्द्यांभोवती फिरतो : ओडिसियस आणि त्याची पत्नी पेनेलोपी यांची प्रेमकथा, ट्रोजन युद्धाचा ओडिसियसवर झालेला मानसिक आघात, घरी परत येण्यातल्या अडचणी, आणि परिस्थितीवश त्याच्या मुलाचं प्रगल्भ होत जाणं. एक अपवाद वगळता ही कथासूत्रं मूळ संहितेतली आहेत. मात्र, काही तपशील बदलल्यामुळे किंवा गाळल्यामुळे होमरच्या महाकाव्याचं रूपांतर म्हणून पाहताना काही गोष्टी खटकतात.

चित्रपटात देव जवळजवळ अनुपस्थित आहेत (अथीना ही देवता अधूनमधून येत राहते); पण मूळ संहितेत ओडिसियसला सुखरूप घरी आणण्यात देव वेळोवेळी निर्णायक भूमिका बजावतात. उदा. सुरुवातीलाच देवांची एक परिषद भरते. कॅलिप्सोच्या तावडीत काही वर्षं सापडलेल्या ओडिसियसला सोडवण्याचा निर्णय देव घेतात. त्यानुसार त्याला मुक्त करणं कॅलिप्सोला भाग पडतं. चित्रपटात ही परिषद नाही. त्यामुळे कॅलिप्सो ओडिसियसला स्वत:हून सोडते असं वाटतं. देवांच्या मर्जीनुसार ओडिसियसचा प्रवास न वळवल्यामुळे नोलनचा ओडिसियस चिवटपणे परिस्थितीशी झगडणारा, आणि घरी परतण्यासाठी धडपडणारा आधुनिक नायक वाटतो, पण तसं बघण्यातही अडचणी येतात. ट्रॉय नगराला घोडा भेट देण्याची आणि त्यात सैनिक लपवून नगर काबीज करण्याची कल्पना ओडिसियसची असते. त्याद्वारे आपण युद्ध तर जिंकलं, पण देवांचा राजा झीयसचा नियम मोडला असं मानणारा, युद्धातल्या संहारासाठी स्वत:ला जबाबदार धरणारा आणि त्याचा मानसिक आघात बाळगणारा ओडिसियस नोलन उभा करतो. मात्र, झीयसच्या नियमाचा असा अर्थ लावल्यामुळे वेगळीच अडचण उभी राहते : आपल्या आश्रयाला आलेल्या पाहुण्यांना यजमानांनी कसं वागवावं याबद्दल हा नियम सांगतो (आपल्याकडच्या ‘अतिथी देवो भव’शी ह्याचं साधर्म्य आहे). युद्ध करणार्‍या दोन पक्षांत पाहुणे-यजमान हे नातंच नाही. मुळात स्पार्टाची राणी हेलनला ट्रॉयचा राजकुमार पॅरिसनं पळवल्यामुळे युद्ध सुरू होतं. त्यामुळे युद्धसंहाराविषयीच्या अपराधगंडाला नोलननं लावलेलं हे तर्कशास्त्रच मोडून पडतं. युद्धविरोध हे एक आधुनिक नैतिक मूल्य आहे; पण देवांचे नियम मानणारा ओडिसियस धड आधुनिक नायकही होऊ शकत नाही.
नोलनला विशेष विनोदबुद्धी नाही ही आणखी एक अडचण आहे. मूळ महाकाव्यात पुष्कळ गंमत आहे. उदा. नोलनच्या आवृत्तीतला सायक्लॉप्सपासून सुटकेचा भाग एखाद्या हॉरर फिल्मसारखा आहे, पण होमरचा ओडिसियस फक्त तसा नाही. तो सायक्लॉप्सला दारू पाजून तर्र करतो, आणि आपलं नाव ‘नोबडी’ असं सांगतो. नंतर ओडिसियस आणि त्याच्या सैनिकांना सायक्लॉप्स गुहेत अडकवून त्यांचा चट्टामट्टा करू लागतो. गुहेतून सुटकेच्या प्रसंगात ओडिसियस त्याचा एकुलता एक डोळा फोडतो तेव्हाचा सायक्लॉप्सचा आकांत ऐकून त्याचे शेजारी हाळी देऊन विचारतात, ‘तुला कोणी दुखापत केली?’ त्यावर तो उत्तरतो, ‘नोबडी’. त्यामुळे त्याच्या मदतीला कुणीच धावून येत नाही. कथानकातले असे गंमतीशीर भाग नोलननं वगळले आहेत.

कथानकातले लैंगिक संदर्भही नोलन गाळतो. उदा. कॅलिप्सो, सर्सी अशा व्यक्तिरेखा चित्रपटात येतात, पण त्यांचे ओडिसियसशी लैंगिक संबंध असतात हे स्पष्ट होत नाही. होमरची कॅलिप्सो आपली लैंगिक भूक शमवण्यासाठी ओडिसियसला आपला गुलाम करून ठेवते. त्या बदल्यात ती त्याला अमरत्व देऊ करते. ‘मी चिरतरुण आहे, मग म्हातार्‍या पेनेलोपीकडे कशाला परत जातोस?’ हा तिचा प्रश्न आहे. ‘तू माझ्या पत्नीहून सुंदर आहेस, पण मला तिच्याचकडे जायचंय,’ म्हणत ओडिसियस अमरत्व नाकारतो. नोलन हे दाखवत नाही.

नोलनची कॅलिप्सो ओडिसियसला निरोप देताना सांगते की तू स्वत:ला समुद्राच्या भरवश्यावर सोड, मग आपोआप घरी पोचशील (आणि तसा तो पोचतोही). म्हणजे हा प्रयत्नवादी, झगडणारा, आधुनिकतावादी नायक राहात नाही, तर दैवाच्या बळावर घर गाठणारा नायक होतो. मग देवांना गोष्टीतून काढण्याचं प्रयोजनच उरत नाही.

ओडिसियसच्या सैनिकांना सर्सी डुक्कर बनवते हा भाग चित्रपटात येतो (हाच चित्रपटातला जरा हलकाफुलका भाग आहे), पण ओडिसियस वर्षभर तिच्याकडे राहतो आणि दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित होतात हे चित्रपटात नाही. नैतिकतेच्या पुरातन संकल्पना बाजूला ठेवून ओडिसियसला असा एकपत्नीव्रती दाखवायची गरज कळत नाही. मात्र त्यामुळे कॅलिप्सो, सर्सी ह्या (आणि इतरही अनेक) सशक्त स्त्री व्यक्तिरेखांवर चित्रपटात अन्याय झालेला आहे, आणि ओडिसियस खूप गंभीर झाला आहे.

गैरसोयीची होऊ शकेल तिथे नोलननं हिंसाही टाळली आहे. ओडिसियस काही परत येणार नाही असं म्हणत पेनेलोपीशी लग्न करण्यासाठी उतावळे झालेल्या पुरुषांना ओडिसियस मारतो हे नोलन दाखवतो, पण त्यानंतर ओडिसियसचा मुलगा टेलेमॅकसच्या ‘शौर्या’चा प्रसंग गाळतो. पेनेलोपीसाठी काम करणार्‍या काही गुलाम स्त्रिया ह्या विवाहोत्सुक पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवतात, आणि प्रासादातली खबरबात त्यांना देतात. ह्या विश्वासघातकी स्त्रियांना टेलेमॅकस जिवंतपणी लटकवून त्यांचे हालहाल करून मारतो. पित्यासारखा ‘लढवय्या पुरुष’ बनण्याच्या टेलेमॅकसच्या प्रवासातला हा एक स्वाभाविक टप्पा आहे, पण नोलनचा ओडिसियस धीरोदात्त नायक असल्यामुळे त्याचा वारसदार असं काही करत नाही.

ओडिसियसला ग्रासणारा युद्धसंहाराविषयीचा अपराधगंड चित्रपटात तीव्रतेनं जाणवतो. मूळ काव्यात आपल्याच शौर्याचं वर्णन ऐकून ओडिसियस ढसढसा रडतो, किंवा घरी जाण्याची तीव्र इच्छा होऊन रडतो, पण हे अश्रू ‘युद्धात शौर्य गाजवूनही आपली अवस्था किती केविलवाणी झाली आहे’ यासाठी ढाळले जातात. युद्धातल्या संहारासाठी आपण जबाबदार आहोत, तो आपण टाळायला हवा होता, आणि आता त्यापायी आपली संस्कृती (म्हणजे अवघं ब्रॉन्झयुगच!) लयाला चालली आहे असं नोलनचा ओडिसियस मानतो. हा मुद्दा मूळ काव्यात नाही. हा ओडिसियस नोलनच्या ‘ओपनहायमर’ किंवा तत्सम नायकांमधून प्रेरित दिसतो. त्यातून एक युद्धविरोधी, सद्यकालीन परिस्थितीशी नाळ जोडणारा चित्रपट तयार होतो, पण होमरच्या महाकाव्यापासून तो दुरावतो.

नोलनचा सिनेमात भव्यता आणि कारुण्य आहे, पण होमरची काव्यात्मता त्यात नाही. उदा. अधोविश्वात गेलेल्या ओडिसियसला ट्रोजन युद्धात हुतात्मा झालेला अकिलिस भेटतो. ‘वीरगती प्राप्त झाल्यामुळे तुझी कीर्ती दिगंत राहील,’ असं ओडिसियस त्याला सांगतो. पण ‘यापेक्षा मी साधा चाकर म्हणून शांततेतलं दीर्घायुष्य पसंत करेन’ असं अकिलिस म्हणतो. युद्धात धारातीर्थी पडणं म्हणजे पौरुषाचा कळस अशा कल्पनेत जिथले पुरुष जगतात (आणि मरतात) तिथे अकिलिसचं हे बोलणं ऐकून ओडिसियस अंतर्मुख होतो. अधोविश्वातच त्याला आपली आईही भेटते. आपण घरी येण्याची वाट बघतबघत आईचा मृत्यू झाला आहे हे तेव्हा त्याला कळतं. नोलनच्या अधोविश्वात हे दोघंही नाहीत. त्याऐवजी होमरच्या काव्यात नसलेलं सिनोनचं पात्र अधोविश्वात

ओडिसियसचा अपराधगंड वाढवतं, पण अकिलीस किंवा आईबरोबरच्या भेटीतली शोकात्म काव्यमयता त्यात नाही. अभिजात साहित्याचं अर्थनिर्णयन अनेक प्रकारे करता येतं, त्यामुळे नोलनसारखा कसलेला दिग्दर्शक ते आपल्या पद्धतीनंच करणार हे उघड होतं. मात्र, अपराधगंडानं पिळवटलेल्या नायकांचीच गोष्ट नोलन अनेक चित्रपटांत सांगत राहतो. आता त्यात तोचतोचपणा वाटतो. होमरचा ओडिसियस शतकानुशतकं बेस्टसेलर असलेल्या महाकाव्याचा नायक आहे. त्याला नानाविध पैलू आहेत, तो गुंतागुंतीचा आहे, आणि मनोरंजकही आहे. पण नोलन त्याला आपला नायक करतो तेव्हा ही व्यामिश्रता तर दूरच राहते, मूळ महाकाव्यातली मजाही हरवते, आणि ती एका उदासवाण्या नायकाची नको तितकी गंभीर ॲक्शन-पॅक्ड गोष्ट होते. आपण केलेल्या संहाराची शरम वाटणारा, पश्चात्तापदग्ध आणि आघातग्रस्त ओडिसियस चित्रपटात दिसतो; पण स्त्रियांना भुरळ पाडणारा, कठीण प्रसंगांत हुशारीनं वाटेल त्या बाता मारून बाजी जिंकणारा चित्ताकर्षक लढवय्या इथे अभावानंच दिसतो. व्हिएतनाम युद्धापासून ते ताज्या इराण युद्धापर्यंत अमेरिका आपल्या युद्धखोरीचं आणि अनैतिकतेचं दर्शन सातत्यानं घडवते आहे; त्यावर प्रायश्चित्त म्हणून नैतिक संदेश द्यायचा हॉलिवूडचा ध्यास अनेकदा दिसतो, पण नोलन एव्हाना पुरेसा महान दिग्दर्शक झालेला असल्याने त्याला ह्या चौकटीत अडकायची काहीच गरज नव्हती. अर्थात, एकदा मोठ्या बजेटचा सिनेमा करायचा ठरवला की गुंतवणुकीतून पुरेसा परतावा मागणार्‍या हॉलिवूडच्या बलाढ्य स्टुडिओंच्या कचाट्यातून सुटका नाही, हेही खरंच.

rabhijeet@gmail.com

(संदर्भ : मेरी बियर्ड आणि एमिली विल्सन ह्या विदुषींचं ‘ओडिसी’विषयीचं विवेचन.)