‘केडी द डेव्हिल’ (KD The Devil) या चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे. या गाण्यात नोरा फतेही आणि संजय दत्त दिसत आहेत. या गाण्यातील अश्लील शब्दांमुळे सर्वत्र टीका होत आहे. या गाण्याचे गीतकार म्हणून रकीब आलम यांचं नाव आहे. रकीब यांनी या गाण्याचे बोल व त्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

एचटी सिटीशी बोलताना रकीब यांनी या गाण्याचे बोल आपण लिहिले नाहीत, असं स्पष्ट सांगितलंय. “हे गीत मी लिहिलेलं नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम यांनी ते मूळ कन्नड भाषेत लिहिलं होतं. मला हे गाणं लिहायला सांगितलं तेव्हा मी नकार दिला. असे अश्लील शब्द गाण्यात चालणार नाहीत आणि सेन्सॉर बोर्ड त्यावर आक्षेप घेईल, असं मी त्यांना बजावलं होतं,” असं रकीब म्हणाले.

मूळ कन्नड गाण्यात होते ते शब्द

नकार दिल्यावर त्यांनी भाषांतर करायला सांगितलं, असा दावा रकीब यांनी केला. “नंतर त्यांनी मला फक्त कन्नड शब्दांचे शब्दश: हिंदीत भाषांतर करून मागितले, जेणेकरून ते गाण्याच्या चालीत बसवता येतील. ‘चूसेगा’, ‘चाटेगा’ यांसारखे आक्षेपार्ह शब्द मूळ कन्नड गाण्यात होते,” असंही रकीब आलम यांनी नमूद केलं.

गाणं लिहिण्यास रकीब यांनी दिलेला नकार

रकीब आलम पुढे म्हणाले, “गाणी गाण्याच्या शेवटी असं समजतं की ते दारूच्या बाटलीबद्दल आहे, पण त्याआधीचे सर्व शब्द अत्यंत गलिच्छ आहेत. मी हे गाणं लिहिण्यास नकार दिला होता, मी का लिहेन असं गाणं? मी जेव्हा चांगली गाणी लिहितो, तेव्हा कोणी त्याची दखल घेत नाही. मी ‘पुष्पा’ चित्रपटातील सर्व हिंदी गाणी लिहिली आहेत. मी राम चरणच्या आगामी ‘पेड्डी’ चित्रपटासाठी ‘चिकरी चिकरी’ गाणं लिहिलं आहे. या चुनरी गाण्यामुळे मलाच लाज वाटतेय.”

वाद व टीका झाल्यानंतर निर्मात्यांनी युट्यूबवरून हे गाणं हटवलं आहे. रकीब आलम म्हणाले, “सोमवारी रात्री निर्मात्यांनी मला फोन केला आणि हे गाणं सभ्य शब्दांत पुन्हा लिहून देण्याची विनंती केली आहे. मी मंगळवारी सकाळी ते लिहून दिलं आणि त्याचं रेकॉर्डिंगही झालंय. लवकरच ते नवीन गाणं एका माफीनाम्यासह रिलीज केलं जाईल.”

गायक अरमान मलिकने या गाण्यावर टीका केली. “व्यावसायिक गाणी लिहिण्याची पातळी किती खाली घसरलीये,” असं अरमानने म्हटलं. तर, “सेन्सॉर बोर्ड चित्रपटांच्या नावावरून वाद घालते, पण अशा कचरा गाण्यांना परवानगी मिळते, आपला देश नक्की कुठे चाललाय?” अशी टीका दिग्दर्शक ओनीर यांनी केली आहे.